बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (18:11 IST)

'बाप बीप बाप'मधून सुटणार वडील-मुलाच्या नात्यातील गुंता?

वडील -मुलाचे नाते हे नेहमीच तणावपूर्ण आणि संवेदनशील राहिले आहे. मुलाची आईसोबत जितकी जवळीक, मैत्रीपूर्ण नाते असते, तितकीच भीती, दरारा वडिलांबाबत असतो. एकमेकांमध्ये सुसंवाद नसतो, अनेकदा एकमेकांविषयी प्रेम असूनही ते व्यक्त करण्यासाठी दोघेही संकोच करतात. अशाने त्यांच्या नात्यातील दरी अधिकच खोल होत जाते. अशा या गुंतागुंतीच्या नात्यावर भाष्य करणारी 'बाप बीप बाप' वेबसीरिज 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर ३१ ऑगस्टपासून आपल्या भेटीला येत आहे. अमित कान्हेरे दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये शरद पोंक्षे, शिल्पा तुळसकर, पर्ण पेठे, तेजस बर्वे, उदय नेने हे मुख्य भूमिकेत आहेत. 
नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून वडील - मुलाचे अवघड नाते यात दिसत आहे. लॉकडाऊन आधी कधीच एकत्र वेळ न घालवलेल्या वडील-मुलाला जेव्हा लॉकडाऊनमुळे नाईलाजास्तव एकमेकांबरोबर वेळ घालवावा लागतो तेव्हा नक्की काय होते? या काळात नात्यातील संवाद गवसतो का? त्यांच्या नात्याचा हा गुंता सुटतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वरील 'बाप बीप बाप' मध्ये मिळणार आहेत. अमित कान्हेरे यांनी हा विषय अतिशय छान पद्धतीने हाताळला आहे. थोडेसे अबोल, संकोच असलेले हे नाते उगीचच गंभीर न करता अतिशय गोड आणि हलक्या फुलक्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडले आहे. या वेबसीरिजचे लेखन प्रतिक उमेश व्यास आणि अमित कान्हेरे यांनी केले असून संवाद योगेश जोशींनी लिहिले आहेत तर छायाचित्रणाची धुरा विशाल सांघवाई यांनी सांभाळली आहे. 
'बाप बीप बाप' बद्दल 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण आणि आशयपूर्ण कन्टेन्ट देण्याचा आमचा कायमच प्रयत्न आहे. वेगवेगळे विषय हाताळल्यानंतर आता एक कौटुंबिक वेबसीरिज घेऊन आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आलो आहोत. लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी काही सकारात्मक गोष्टीही नक्कीच घडल्यात. सतत कामामध्ये व्यस्त असलेली नाती या काळात उमलली व बहरलीसुद्धा. कुटुंबाने एकत्र वेळ घालवला. यात अनेक नाती घट्ट झाली. त्यापैकीच एक मुलाचे आणि वडिलांचे. वडील-मुलाचे संवेदनशील नाते 'बाप बीप बाप' या वेबसीरिजमध्ये अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. ही वेबसीरिज प्रत्येक वडील आणि मुलाच्या हृदयाला स्पर्श करून त्यांच्या नात्याला नवी संजीवनी देईल, याची मला पूर्ण खात्री आहे.''