1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
  4. असा बालगंधर्व पुन्हा न होणे

असा बालगंधर्व पुन्हा न होणे

26 जून 1888 रोजी सरस्वतीने आपल कंठातील एक हिरा रसिकांसाठी जगाच रंगभूमीवर पाठवला. तो हिरा म्हणजे नाराण श्रीपाद राजहंस, बालगंधर्व!

बालगंधर्वाचा जन्म चिखलठाणे, तालुका पलुस (जि. सांगली) येथे झाला. बालगंधर्वाचे स्वर्गी गान ऐकून त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षीच लोकमान्य टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी दिली. बालगंधर्वाचे आगमन रंगभूमीवर नवे पर्व, नवे युग निर्माण करणारे ठरले. बालवयात बालगंधर्वानी रंगभूमीवर ठेवलेल्या पावलांची झळाळी इतकी विलक्षण व तेजोमय होती की, या पावलांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. बालगंधर्वाची परीस्थिती साधारण असल्याने बालगंधर्व राजर्षी शाहू महाराजांच आश्रयाला आले.

शाहूमहाराजांच्या दिव्दृष्टीला या मुलाच्या गळ्यातील असामान्यत्वाचा साक्षात्कार झाला पण नारायण कानाने थोडा अधू होता. त्याच्या कानावर उपचार करावेत म्हणून त्याला महाराजांनी मिरजेस पाठविले. त्याच वेळी मिरज येथे किर्लोस्कर नाटक मंडळींचा मुक्काम होता. तेथेही नाराणास त्यांनी पाठविले. हेतू हा की औषधोपचाराबरोबर नाटक मंडळीत गायनाचे संस्कारही होतील. आणि एक चमत्कार झाला! किर्लोस्कर कंपनीत मुख्य स्त्री भूमिकेत नारायणाला उभे करायचे ठरले व तो शकुंतलेच्या भूमिकेत रंगभूमीवर उभा राहिला. त्याचे रंगभूमीवरचे गायन, सौंदर्य व अभिनय पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. त्यावेळेपासूनच बालगंधर्वाच्या यशाची कमान चढू लागली व शेवटर्पत चढतच गेली.

बालगंधर्वाचे सुरूवातीचे शिक्षण मेहबूब खान व नंतर देवगंधर्व भास्करबुवा बखले याच्यांकडे  झाले. अभिनयाचे शिक्षण प्रसिद्ध नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांनी दिले. घरात संगीताचे संस्कार होतेच. वडील श्रीपादराव सतार वाजवीत व काका गणपतराव पखवाज वाजवीत. भास्करबुवा बखले यांनी बालगंधर्वाच्या गळ्याच्या गुणधर्म ओळखून त्यांच्या गळ्यातील लयाचा वचिकपणाचा पुरेपूर वापर करून त्यांना संगीताची तालीम दिली. रंगभूमीवर रसाविष्कार कसा पाहिजे, स्वरांचा वापर करून लयीचा झोत कसा पेलायचा, विवादी स्वरांचा वापर कोठे व कसा करायचा व सोबत अभिनयही कसा संयत असावा हे सर्व भान भास्करबुवांनी नारायणरावांना शिकविले.

‘स्वयंवर’नाटकापासून भास्करबुवांची गायकी बालगंधर्वांच्या गळ्यातून ऐकू येऊ लागली. त्यानंतर मानापमान नाटकातील गाणीही बरीच गाजली. या  नाटकाच्या वेळी गोविंदराव टेंब्यांनी त्यांना मार्गदर्शन केले. पूरव थाटाचे, हलके फुलके परंतु स्वर विलासाला अनुकूल असे संस्कार केल्यानंतर बालगंधर्वांच्या गळ्यातून जे रसायन बाहेर पडे ते अलौकिक असे! बालगंधर्वांनी मेहनतीने स्वत:चा बाज तयार केला. त्यांच्या गाण्याचे ठेके गंधर्व ठेके म्हणून प्रसिद्ध झाले. यमन, भूप, बिहाग, पहाडी, काफी, भीमपलासी हे राग बालगंधर्वाच गायकीमुळे घराघरात आणि स्वंपाकघरातही पोहोचले. 125 वर्षांपूर्वी स्त्रिा रंगभूमीवर काम करत नसत त्या काळात रंगभूमीवरील त्यांच्या स्त्री भूमिका जनमानसात रूजल्या, तरुण वर्गाचे सुद्धा ते लाडके बनले. नाटकातील त्यांचे वावरणे, साडी नेसण्याची पद्धत, केशरचना, दागदागिने यांची ओढ स्त्री वर्गाचे आकर्षण ठरले होते. त्यांचे अनुकरण स्त्रिया करीत.

बालगंधर्व नाटय़संगीताबरोबर अभंग गायनही करत. किर्लोस्कर नाटक मंडळीत मतभेद होऊन बालगंधर्वानी स्वत:ची नाटक मंडळी 5 जुलै 1913 रोजी स्थापन केली. या नाटक मंडळीने सर्व ऐतिहासिक नाटके रंगमंचावर वैभवशाली स्वरूपात सादर केली. परिपूर्ण गाणे, परिपूर्ण अभिनय असे एकाच व्यक्तीत आढळणे दुर्मीळ परंतु बालगंधर्व त्याला अपवाद ठरले. म्हणूनच ‘झाले बहु होतीलही बहु पण या सम हा’असे सार्थ वर्णन फक्त बालगंधर्वांनाच शोभले. 15 जुलै 1967 रोजी हा रंगभूमीवरील तेजस्वी तारा अस्ताला गेला.