मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 27 डिसेंबर 2023 (20:23 IST)

कर्णधारापेक्षा १० पट मानधन; हैदराबाद संघ

आयपीएल स्पर्धेसाठीचा लिलाव काही दिवसांपूर्वी दुबईत आयोजित करण्यात आला होता. या लिलावात मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीच्या जोडगोळीने विक्रमी कमाई केली. या दोघांसह अनेक खेळाडूंसाठी कोटीच्या कोटी उड्डाणं बोली लावण्यात आली. लिलावानंतर प्रत्येक संघाचे चित्र स्पष्ट झाले आणि असंख्य गमतीजमती समोर आल्या आहेत.

लिलावानंतर मात्र सनरायझर्सने कर्णधाराची स्थिती केविलवाणी केली आहे. लिलावात सनरायझर्स संघव्यवस्थापनाने तब्बल 20 कोटी 50लाख रुपये खर्चून ऑस्ट्रेलियाचा वर्ल्डकपविजेता कर्णधार पॅट कमिन्सला ताफ्यात दाखल करुन घेतले. कमिन्सच्या नेतृत्वातच ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, ॲशेस, वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. कर्णधार म्हणून त्याने प्रत्येक फॉरमॅटमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. गोलंदाज म्हणूनही त्याने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.

कमिन्ससाठी हैदराबादने निम्मी पाऊण तिजोरी खर्च केली. कमिन्स सनरायझर्सचा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू असणार आहे. सनरायझर्सचा कर्णधार एडन मारक्रमला 2 कोटी 60 लाख रुपये मानधन मिळते. कर्णधाराच्या तुलनेत कमिन्सला 10 पट मानधन मिळणार आहे. कमिन्स ऑस्ट्रेलियासाठी टेस्ट आणि वनडे अशा दोन प्रकारात खेळतो. वेगवान गोलंदाज असल्याने त्याला दुखापती होण्याची शक्यता अधिक असते.

त्यामुळे कमिन्ससाठी वर्कलोड मॅनेजमेंट हा मुद्दा कळीचा ठरतो. खर्च केलेली रक्कम पाहता सनरायझर्स कमिन्सची कर्णधार म्हणून नियुक्ती करु शकते. पण तो सगळे सामने खेळू शकेलच असं नाही.

तूर्तास तरी सनरायझर्स कर्णधारपदाबाबत घोषणा केलेली नाही. मानधन यादीनुसार कमिन्स आणि मारक्रम यांच्यादरम्यान 11 खेळाडू आहेत. सोप्या शब्दात सांगायचं तर अंतिम अकरातील सहकाऱ्यांपेक्षा कमी मानधन कर्णधाराला मिळणार आहे.

2015 ते 2021 या कालावधीसाठी डेव्हिड वॉर्नर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार होता. युवा भारतीय खेळाडूंसाठी वॉर्नरचा अनुभव मोलाचा ठरला. आंतरराष्ट्रीय अनुभवी खेळाडू आणि युवा खेळाडू यांची मोट बांधत वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्सने 2016 मध्ये जेतेपदावर नाव कोरले. सनरायझर्स आणि वॉर्नर हे नातं घट्ट झाले. हैदराबादमध्ये आणि एकूणच देशभरात वॉर्नरचे प्रचंड चाहते आहेत.
Edited By-Ratnadeep Ranshoor