मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (08:12 IST)

AfgvsNew: भारतीय संघाचं विश्वचषकातून पॅकअप; न्यूझीलंडचा अफगाणिस्तानवर विजय

ट्वेन्टी20 विश्वचषकात न्यूझीलंडच्या अफगाणिस्तानविरुद्ध विजयासह भारतीय संघाचं ट्वेन्टी20 विश्वचषकातून पॅकअप झालं आहे.
 
अफगाणिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला असता तर भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळू शकला असता मात्र न्यूझीलंडने कोणताही चमत्कार घडू न देता शिस्तबद्ध खेळ करत बाजी मारली.
 
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण न्यूझीलंडने टिच्चून मारा करत अफगाणिस्तानच्या डावाला सातत्याने खिंडार पाडलं.
 
नझीबुल्ला झाद्रानने 61 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 73 धावांची खेळी केली. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने कोणाचीही साथ मिळू शकली नाही.
 
न्यूझीलंडने नेहमीप्रमाणे अफलातून क्षेत्ररक्षण करत झेल टिपले आणि धावाही रोखल्या. न्यूझीलंडतर्फे ट्रेंट बोल्टने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
 
प्रत्युत्तरादाखल खेळताना केन विल्यमसन (40*), डेव्हॉन कॉनवे (36*) आणि मार्टिन गप्तील (28) यांच्या संयमी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने 8 विकेट्स राखून लक्ष्य गाठलं.
 
ट्रेंट बोल्टला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
 
न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान या सामन्याला अभूतपूर्व महत्त्व येण्याला एक खास कारण होतं.
 
ट्वेन्टी20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवांमुळे भारताच्या सेमी फायनलच्या आशा गणितीय समीकरणांवर केंद्रित झाल्या. अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडला मोठया फरकानेन नमवत भारताने रनरेट कमालीचा सुधारला. अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवावं अशी अपेक्षा होती.
 
तसं झालं तर पाकिस्तान आणि भारत सेमी फायनलसाठी पात्र ठरतील. न्यूझीलंड जिंकलं तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवल्यानंतरही भारताला नामिबियाला मोठ्या फरकाने हरवावं लागेल. अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडविरुद्धचा फॉर्म लक्षात घेता ते अवघड नाही. म्हणूनच अफगाणिस्तान संघाच्या विजयासाठी भारतीय चाहते प्रार्थना करत आहेत. यासंदर्भात असंख्य मीम्स सोशल मीडियावर फिरू लागले होते.
 
स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पहिल्या गटाचं वर्णन ग्रुप ऑफ डेथ असं करण्यात आलं. मात्र त्या गटात चित्र तुलनेनं सोपं होतं. त्या गटातून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
 
भारतीय संघाचा समावेश असलेल्या गटातून पाकिस्तानने 4 सामने जिंकत सेमी फायनल गाठली आहे. दुसऱ्या संघाचा निर्णय आज होईल. सामना दोन संघांमध्ये होणार असला तरी भवितव्य तीन संघांचं ठरणार आहे.
 
पाकिस्तानविरुद्ध अनपेक्षित पराभव
50 ओव्हर तसंच ट्वेन्टी20 विश्वचषकात भारतीय संघाने नेहमी पाकिस्तानला हरवलं होतं. पण यंदा काहीतरी वेगळंच घडलं. पाकिस्तानने पहिल्याच लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताला नमवण्याचा पराक्रम केला.
पाकिस्तानच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर भारतीय संघाला 151 धावांचीच मजल मारता आली. कर्णधार विराट कोहलीने 57 धावांची खेळी केली. ऋषभ पंतने 39 धावा करत त्याला चांगली साथ दिली.
 
प्रत्युत्तरादाखल खेळताना बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान जोडीने एकही विकेट न गमावता पाकिस्तानला दणदणीत विजय मिळवून दिला. बाबरने 52 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 68 धावांची खेळी केली. रिझवानने 55 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 79 धावा केल्या. पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात पराभूत होण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ होती.
 
किवींविरुद्धही पराभवच
न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी अक्षरक्ष: गुडघे टेकले. भारताला 110 धावांचीच मजल मारता आली. न्यूझीलंडतर्फे ट्रेंट बोल्टने 3 तर इश सोधीने 2 विकेट्स घेतल्या.डॅरेल मिचेल (49) आणि केन विल्यमसन (33) यांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने 8 विकेट्सनी दिमाखदार विजय साकारला. या पराभवासह भारताच्या सेमी फायनलच्या आशा अंधुक झाल्या.
 
अफगाणिस्तानविरुद्ध दमदार विजय
नेट रनरेट सुधारण्याच्या दृष्टीने मैदानात उतरलेल्या भारताने अफगाणिस्तानला चीतपट केलं. भारताने 210 धावांचा डोंगर उभारला. लोकेश राहुलने 48 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 69 तर रोहित शर्माने 47 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांसह 74 धावांची खेळी केली.
ऋषभ पंतने 13 चेंडूत 27 तर हार्दिक पंड्याने 13 चेंडूत 35 धावांची वादळी खेळी केल्या. अफगाणिस्तानला 144 धावांचीच मजल मारता आली. भारतातर्फे मोहम्मद शमीने 3 तर रवीचंद्रन अश्विनने 2 विकेट्स घेतल्या.
 
स्कॉटलंडचा धुव्वा
अनुनभवी स्कॉटलंडचा धुव्वा उडवत भारताने रनरेटच्या बाबतीत मोठी आघाडी घेतली. भारताने स्कॉटलंडचा डाव 85 धावातच गुंडाळला. मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. अवघ्या 6.3 ओव्हर्समध्ये हे लक्ष्य गाठल्याने भारत नेट रनरेटच्या बाबतीत गटात दुसऱ्या स्थानी पोहोचला.
 
भारतीय संघाने सुरुवातीच्या दोन पराभवातून बोध घेत चांगलं पुनरागमन केलं आहे.  मात्र सेमी फायनलच्या भारतीय संघाच्या आशा अफगाणिस्तानच्या विजयावर केंद्रित झाल्या आहेत.
 
मोहम्मद नबी, रशीद खान आणि मुजीब उर रहमान या तीन फिरकीपटूंचा सामना करताना न्यूझीलंडला अडचणी येऊ शकतात असं अनेक माजी खेळाडूंनी म्हटलं आहे. अफगाणिस्तान जिंकल्यास मला आश्चर्य वाटणार नाही असं माजी खेळाडू गौतम गंभीरने म्हटलं आहे.
 
न्यूझीलंडल स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध जिंकतानाही संघर्ष करावा लागला होता. हे लक्षात घेता न्यूझीलंडसाठी हा अवघड सामना ठरू शकतो. ट्वेन्टी20 प्रकारात न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान पहिल्यांदाच आमनेसामने येत आहेत.
 
दुसरीकडे अफगाणिस्तान राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमुळे वेगळ्याच स्थितीत आहे. स्पर्धा सुरू होईपर्यंत अफगाणिस्तान खेळणार का याविषयी संभ्रमावस्था होती. तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर हजारो नागरिकांनी देश सोडला.
 
तालिबान सरकारने अफगाणिस्तान क्रिकेटला पाठिंबा दिला आहे. मात्र रशीद खानने नेतृत्व सोडलं. यानंतर मोहम्मद नबीकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं.
 
विश्वचषकादरम्यान अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार अशगर अफगाणने निवृत्ती स्वीकारली आहे. मायदेशात घडामोडी घडत असल्या तरी खेळावरचं आमचं लक्ष कमी झालेलं नाही हे दाखवण्यासाठी अफगाणिस्तानचा संघ आतूर आहे.