गोलंदाज धवल कुलकर्णीने विजयासोबतच आपल्या १६ वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीला निरोप दिला
अंतिम फेरीत अजिंक्य रहाणेच्या संघाने विदर्भाचा १६९ धावांनी पराभव केला आणि या विजयासह मुंबईचा अनुभवी खेळाडू निवृत्त झाला. स्टार गोलंदाज धवल कुलकर्णीने विजयासोबतच आपल्या १६ वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीला निरोप दिला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे फायनलची शेवटची विकेट घेत कुलकर्णीने विदर्भाचा डाव गुंडाळला. मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून धवलचा विशेष गौरव करण्यात आला. कुटुंबियांच्या उपस्थितीत क्रिकेटमधून निवृत्त होत असणारा धवल भावनिक झालेला पाहायला मिळाला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आपल्या खास मित्रासाठी, मुंबईचा योद्धा अशी पोस्ट लिहिली.
रणजी करंडक फायनलच्या पाचव्या दिवसातील १३५ व्या षटकातील तिसरा चेंडू धवलच्या कारकिर्दीतील शेवटचा चेंडू होता आणि या शेवटच्या चेंडूवर त्याने उमेश यादवला बोल्ड केले. ५३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या विदर्भाचा दुसरा डावा ३६८ धावांवर गडगडला. मुंबईकडून तनुष कोटियनने ४, तुषार देशपांडे व मुशीर खान यांनी प्रत्येकी २, तर शाम्स मुलानी व धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. धवलने अंतिम फेरीत एकूण चार विकेट घेतल्या. या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने चार सामन्यांच्या ८ डावात एकूण ११ बळी घेतले.
Edited By - Ratnadeep Ranshoor