रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 31 डिसेंबर 2023 (14:35 IST)

भीमा कोरेगावची लढाई नेमकी आहे तरी काय?

koregaon bhima
भीमा कोरेगाव इथं 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या हिंसाचाराला आता 6 वर्षं पूर्ण होतील. या संपूर्ण प्रकरणावरून अनेक वाद विवादही उद्भवले. पण इतिहासाचा महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या कोरेगाव लढाईचं सत्य आहे तरी काय? याचा घेतलेला हा आढावा.
 
1 जानेवारी 2018 ला कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाजवळ विजय दिवस साजरा करण्यासाठी दलित समाजाचे लोक जमले असताना या कार्यक्रमाला गालबोट लागलं आणि काही हिंसक घटना घडल्या होत्या.
 
या घटनांची सुरुवात पुण्याजवळच्या कोरेगाव भीमा, पाबळ आणि शिक्रापूर इथून झाली. या गावांमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला.
 
राज्यभरात दुसऱ्या दिवशी याचे पडसाद उमटले. प्रकाश आंबेडकर यांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.
 
1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैनिकांदरम्यान झालेल्या युद्धाला 200 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भीमा कोरेगावमध्ये हजारो नागरिक जमले होते.
 
ब्रिटिशांनी या युद्धात विजय मिळवला होता. ब्रिटिशांच्या विजयाचा जल्लोष दलित समाज साजरा करतो. कारण ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर महार समाजाचे सैनिक होते. त्याकाळी महार समाजातील लोकांना अस्पृश्य मानण्यात येत असे.
 
हे युद्ध कोरेगावची लढाई या नावानं प्रसिद्ध आहे. जाणकारांच्या मते, दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं 28 हजारांचं सैन्य पुण्यावर हल्ला करण्यासाठी सज्ज होतं
 
आक्रमणादरम्यान त्यांच्यासमोर ब्रिटिश सैन्याची कुमक असलेली तुकडी उभी ठाकली. या तुकडीत 800 सैनिकांचा समावेश होता. पेशव्यांनी कोरेगावस्थित ईस्ट इंडिया कंपनीवर आक्रमणासाठी 2000 सैनिकांचा समावेश असलेली फौज पाठवली होती.
 
फ्रान्सिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडियाच्या कंपनीच्या या तुकडीनं 12 तास खिंड लढवली आणि मराठ्यांना जिंकू दिलं नाही. यानंतर मराठ्यांनी निर्णय बदलला आणि ते परतले, असा उल्लेख तत्कालीन इतिहासावरच्या पुस्तकांत सापडतो.
 
कारण जनरल जोसेफ स्मिथ यांच्या नेतृत्वाखालील मोठं सैन्य दाखल झालं, तर त्यांचा सामना करणं अवघड ठरेल याची जाणीव झाल्यानं मराठा सैन्याने परतण्याचा निर्णय घेतला.
 
ईस्ट इंडिया कंपनीच्या या तुकडीत भारतीय वंशाचे काही सैनिक होते. यापैकी बहुतांशीजण महार समाजाचे होते. हे सगळेजण बॉम्बे नेटिव्ह इन्फॅन्ट्री विभागाशी संलग्न होते. म्हणूनच ही घटना दलित चळवळीच्या इतिहासातला महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचं दलित कार्यकर्ते मानतात.
 
मराठ्यांशी टक्कर
जेम्स ग्रांट डफ यांनी आपल्या 'ए हिस्टरी ऑफ द मराठाज' या पुस्तकात या लढाईचा उल्लेख केला आहे. रात्रभर चाललेल्या लढाईनंतर नव्या वर्षाच्या सुरुवातीला सकाळी दहा वाजता ईस्ट इंडिया कंपनीचं सैन्य भीमेच्या किनाऱ्यावर पोहोचलं.
 
तिथे त्यांनी 25 हजार मराठ्यांना रोखलं. ते नदीच्या दिशेने मार्गक्रमण करत राहिले. ते नदी पार करतील असं पेशव्यांच्या सैन्याला वाटत होतं. पण ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीनं वाटेतल्या गावावर कब्जा केला आणि त्याचं रुपांतर गढीत केलं.
 
हेन्री टी प्रिंसेप यांनी 'हिस्टरी ऑफ द पॉलटिकल अँड मिलिट्री ट्रान्जॅक्शन्स इन इंडिया' या पुस्तकात या लढाईचा संदर्भ आहे. महार समाजातल्या माणसांचा समावेश असलेल्या ईस्ट इंडिया तुकडीच्या धाडसाचं वर्णन या पुस्तकात आहे.
 
कॅप्टन स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सैन्याची तुकडी पुण्याच्या दिशेनं जात असताना त्यांच्यावर आक्रमणाची शक्यता होती.
 
उघड्या मैदानात सैन्य अडचणीत सापडू नये यासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीनं कोरेगावला आपला बालेकिल्ला म्हणून तयार केलं. मोकळ्या ठिकाणी सैन्य राहिलं असतं तर मराठ्यांकडून मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं असतं.
 
विविध इतिहासकारांच्या मते या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीच्या 834 पैकी 275 सैनिकांनी जीव गमावला किंवा ते जखमी झाले किंवा बेपत्ता झाले. यामध्ये दोन अधिकाऱ्यांचादेखील समावेश होता. इन्फन्ट्रीचे 50 जण मारले गेले तर 105 जण जखमी झाले.
 
ब्रिटिशांच्या मते, पेशव्यांच्या 500 ते 600 सैनिकांनी या लढाईत जीव गमावण्याची तसंच जखमी झाल्याची शक्यता आहे.
मराठ्यांविरुद्धची नव्हे तर ब्राह्मणांविरुद्धची लढाई'
 
साहित्यिक आणि समीक्षक प्राध्यापक ऋषीकेश कांबळे लढाईची दुसरी बाजू मांडतात. कांबळे यांच्या म्हणण्यानुसार, महार समाजाचा समावेश असलेल्या तुकडीनं मराठ्यांना नाही तर ब्राह्मणांना नमवलं होतं.
 
"ब्राह्मणांनी जबरदस्तीनं अस्पृश्यता लादल्यानं महार समाज नाराज होता. ही अनिष्ट पद्धत बंद करण्याबाबत महार समाजानं ब्राह्मणांना सांगितलं. मात्र त्यांनी ऐकलं नाही. या कारणामुळेच महार समाजानं ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीत सामील होण्याचा निर्णय घेतला," असं कांबळे सांगतात.
 
ते पुढे म्हणाले, "ब्रिटिश सैन्यानं महार समाजातील व्यक्तींना लष्करी प्रशिक्षण दिलं आणि पेशव्यांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. मराठा शक्तीच्या नावावर ब्राह्मणांची पेशवाई होती, त्याविरुद्धची ही लढाई होती. महारांनी या लढाईत ब्राह्मणांना हरवलं. ही लढाई महार समाजाची मराठ्यांविरुद्धची लढाई कधीच नव्हती."
 
"महार आणि मराठा यांच्यादरम्यान मतभेद किंवा संघर्ष कधीच नव्हता. इतिहासात अशा वादावादाची उदाहरणंही नाहीत. ब्राह्मणांनी अस्पृश्यतेची प्रथा बंद केली असती तर ही लढाई कदाचित झालीच नसती," असं कांबळे आवर्जून नमूद करतात.
 
"मराठ्यांचं नाव घेतलं जातं कारण मराठ्यांचं राज्य पेशवाईत ब्राह्मणांच्या हाती होतं. ही लढाई म्हणजे पेशव्यांची शेवटची मोठी लढाई होती. ब्रिटिशांना त्यांना नमवायचं होतं. म्हणूनच ब्रिटिशांनी महार समाजातील व्यक्तींना हाताशी घेतलं आणि पेशवाई संपुष्टात आणली."
 
Published By- Priya Dixit