गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 25 सप्टेंबर 2022 (16:37 IST)

दीप्ती शर्माने केलेला रनआऊट 'रडीचा डाव', मग बेन स्टोक्सच्या बाबतीत वेगळा न्याय?

भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत 16 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने अनुभवी गोलंदाज झूलन गोस्वामीला विजयी निरोप दिला. 20 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीसह निवृत्त होणाऱ्या झूलनची शेवटची मॅच एका रनआऊटमुळे वादग्रस्त ठरली आहे.
 
भारतीय संघाला 169 धावांची मजल मारली. दीप्ती शर्माने 68 तर स्मृती मन्धानाने 50 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून केट क्रॉसने 4 विकेट्स घेतल्या. प्रत्युतरादाखल खेळताना इंग्लंडने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. पण इंग्लंडच्या चार्लीन डीन आणि फ्रेया डेव्हिस या जोडीने चिवटपणे खेळ करत विजयाच्या आशा पल्लवित केल्या.
 
118/9 अशी स्थितीतून डीन-डेव्हिस जोडीने संयमाने खेळ करत 153 पर्यंत मजल मारली. दीप्ती शर्मा टाकत असलेल्या 44व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर डेव्हिस स्ट्राईकवर होती. चेंडू टाकत असताना नॉन स्ट्रायकरला उभी असलेली डीन क्रीझबाहेर असल्याचं लक्षात आल्याने दीप्तीने अंपायर्ससमोरच्या स्टंप्सवरील बेल्स उडवत तिला रनआऊट केलं.
 
विजय समोर दिसत असताना रनआऊट झाल्याने डीनच्या डोळ्यात अश्रू तरळले. लॉर्ड्सच्या बाल्कनीत असलेल्या इंग्लंड संघातील सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते.
 
आयसीसीने काही दिवसांपूर्वीच जारी केलेल्या नियमानुसार अशा पद्धतीने रनआऊट करणं नियमांच्या चौकटीत असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यापूर्वी या प्रकाराला मंकडेड म्हटलं जायचं.
 
दीप्तीने केलेल्या रनआऊटसह भारताने तिसरी वनडे जिंकली आणि मालिकेत निर्भेळ यश साजरं केलं. पण सामना संपताच 'स्पिरीट ऑफ द गेम'ची चर्चा सुरू झाली. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने दीप्तीने केलेल्या रनआऊटचं समर्थन केलं.
 
याआधीही अशा पद्धतीने रनआऊट करण्यात आलं, तेव्हा तेव्हा वादाला तोंड फुटलं होतं. काहीजण अशा पद्धतीने बाद करणं खेळभावनेला धरून नसल्याचं म्हणतात. इंग्लंडचे आजी-माजी खेळाडू, जाणकार यांनी दीप्ती आणि पर्यायाने भारतीय संघावर अशा पद्धतीने रनआऊट केल्याप्रकरणी टीका केली.
 
इंग्लंडच्या आजी- माजी खेळाडूंनी अशा पद्धतीने सामना जिंकणं हा रडीचा डाव असल्याचं म्हटलं. इंग्लंडच्या चाहत्यांचा गट बार्मी आर्मीनेही दीप्ती शर्माच्या रनआऊटवर टीका केली होती.
 
2019 मध्ये आयपीएल स्पर्धेत रवीचंद्रन अश्विनने जोस बटलरला अशा पद्धतीने बाद केलं होतं. त्यावेळी अश्विनने स्पिरीट ऑफ द गेम दाखवलं नसल्याची टीका झाली होती. अश्विनने मात्र ठाम भूमिका घेत नियमानुसार रनआऊट केल्याचं सांगितलं.
 
2019 वर्ल्डकप फायनलमध्ये काय घडलं होतं?
2019 वर्ल्डकप फायनल इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लॉर्ड्स इथे झाली होती. अतिशय अटीतटीचा हा मुकाबला सुपर ओव्हरमध्ये गेला. एका खास नियमाद्वारे इंग्लंडचा संघ विजयी ठरला. सामन्यात सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या संघाला विजयी घोषित करण्यात आलं.
 
न्यूझीलंडने पहिल्यांदा बॅटिंग करताना 241 धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडनेही 241 धावा केल्या. विजेता ठरवण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरही टाय झाली. सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं.
 
याच सामन्यात झालेला एक किस्सा खेळभावनेच्या दृष्टीने गाजला होता. इंग्लंडला शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावांची आवश्यकता होती. ट्रेंट बोल्टने दोन चेंडू निर्धाव टाकत न्यूझीलंडच्या आशा जागवल्या.
तिसऱ्या चेंडूवर स्टोक्सने खणखणीत षटकार खेचला. चौथ्या चेंडूवर जे झालं ते क्रिकेटचाहत्यांच्या कल्पनेपलीकडचं होतं. बोल्टचा चेंडू स्टोक्सने डीप मिडविकेटच्या दिशेने खेळला. मार्टिन गप्तीलने चेंडू अडवला आणि विकेटकीपरच्या दिशेने फेकला. पण हा थ्रो येताना अनवधानाने स्टोक्सच्या बॅटला लागला. स्टोक्स धाव पूर्ण करण्यासाठी डाईव्ह मारत होता.
 
स्टोक्सच्या बॅटला चेंडू लागला आणि भरकटून थर्डमॅनच्या दिशेने सीमापार गेला. नेमकं काय झालंय हे क्षणभर कोणालाच काही कळलं नाही. इंग्लंडला किती धावा द्यायच्या यावर अंपायर्समध्ये खलबतं झाली. कुमार धर्मसेना यांनी इंग्लंडला 6 धावा दिल्या. एका चेंडूवर 6 धावा मिळाल्याने इंग्लंडसाठी समीकरण 2 चेंडूत 3 धावा असं सोपं झालं.
 
पण पाचव्या चेंडूवर आदिल रशीद रनआऊट झाला. पुढच्या चेंडूवर मार्क वूडही रनआऊट झाला आणि मॅच टाय झाली.
 
स्टोक्सला म्हणजेच पर्यायाने इंग्लंडला 6 धावा देण्यावर न्यूझीलंडने आक्षेप घेतला नाही. तांत्रिक नियमांनुसार अंपायर्सनी त्या चेंडूवर इंग्लंडला 5 धावा देणं अपेक्षित होतं. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने खेळभावना दाखवत निर्णय मान्य केला. सामन्यात आणि सुपर ओव्हरमध्येही पराभूत न होऊनही न्यूझीलंडला जेतेपदापासून दूर राहावं लागलं.
 
या घटनेमुळे जगाला क्रिकेटची देणगी देणाऱ्या इंग्लंडने पहिल्यांदा 50 ओव्हर्सचा वर्ल्ड कप जिंकला. बेन स्टोक्सच्या बॅटला लागलेला चेंडू अनवधानाने लागला होता. डाईव्ह मारण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे स्टोक्सला नक्की काय झालं ते कळलंही नाही. कळल्यानंतर स्टोक्सने तातडीने माफी मागितली होती.
 
मंकडेड काय आहे?
जयपूर इथल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या बॉलर्सची यथेच्छ धुलाई करत होता. किंग्ज इलेव्हन पंजाबने सुरूवातीला बॅटिंग करताना 184 धावांची मजल मारली होती. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 12.4 ओव्हर्समध्ये 1 बाद 108 अशा सुस्थितीत होता. त्याक्षणी राजस्थानला जिंकण्यासाठी 7.2 ओव्हर्समध्ये म्हणजेच 43 चेंडूत 77 रन्स हव्या होत्या. हे करण्यासाठी त्यांच्या हातात 7 विकेट्स होत्या. विजयाचं पारडं राजस्थानच्या बाजूने झुकलेलं आहे असं चित्र होतं.
 
पाचव्या चेंडूवर अश्विनने रनअप सुरू केला. अंपायरच्या इथे येताच त्याने बाजूला बघितलं. त्यावेळी बटलर क्रीझच्या बाहेर असल्याचं त्याच्या लक्षात आलं. अश्विनने झटकन रनअप थांबवून बटलरला आऊट केलं.
 
अश्विसनह किंग्ज इलेव्हन पंजाबच्या खेळाडूंनी अपील केलं. तू खरंच अपील करतो आहेस का? असं बटलरने अश्विनला विचारलं. अश्विन तात्काळ हो म्हणाला. तू अपील कसं करू शकतोस असं बटलरने विचारलं. त्यावर इट्स माय स्पेस असं अश्विनने प्रत्युत्तर दिलं. अश्विनने मंकडेड आऊट केल्याने बटलर नाराज झाला.
 
मैदानावरील अंपायर्सनी निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवला. अश्विनने बेल्स उडवल्या त्यावेळी बटलर क्रीझमध्ये नसल्याचं स्पष्ट होताच थर्ड अंपायर ब्रुस ऑक्सनफर्ड यांनी बटलर बाद असल्याचा निर्णय दिला. नाराजी व्यक्त करत बटलर पॅव्हेलियनमध्ये परतला. बटलरने 43 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांसह 69 धावांची खेळी केली.
 
उत्तम सूर गवसलेला बटलर बाद होताच राजस्थान रॉयल्सची लय बिघडली. बटलर पिचवर असताना रनरेटचं आव्हान वाढतच होतं मात्र विकेट हातात असल्यामुळे बटलर राजस्थानला मॅच काढून देईल असं चित्र होतं. बटलर आऊट झाला आणि राजस्थानची घसरगुंडी उडाली.
 
बॉल टेंपरिंग प्रकरणात सहभागाची शिक्षा संपवून कमबॅक करणारा ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्हन स्मिथ 20 रन्स करून बाद झाला. त्यापाठोपाठ लगेचच संजू सॅमसन 30 धावांवर आऊट झाला. धोकादायक बेन स्टोक्सला आऊट करत मुजीब उर रहमानने राजस्थानच्या आशा धुळीस मिळवल्या. राजस्थानने 20 ओव्हर्समध्ये 170 धावा केल्या आणि किंग्ज इलेव्हन पंजाबने 14 रन्सने थरारक विजय मिळवला.
 
"युक्तिवाद करण्याचा प्रश्नच नाही. मी जे केलं ती प्रतिक्षिप्त क्रिया होती. मी जेमतेम रनअपला सुरुवात केली होती, त्याचवेळी त्याने क्रीझ सोडलं होतं. त्यामुळे आऊट करणं साहजिक होतं. तो माझ्याकडे बघत देखील नव्हता. तो सहज क्रीझ सोडून पुढे गेला होता", असं रवीचंद्रन अश्विनने म्हटलं होतं.
 
दरम्यान आऊट करण्याच्या या प्रकाराला मंकडेड म्हटलं जाऊ नये असं मत सुनील गावस्कर यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना व्यक्त केलं. "विनू मंकड हे भारताच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहेत. त्यांचं नाव बदनाम करण्याची काहीही आवश्यकता नाही. त्यांनी काहीही चूक केलेली नाही. चूक बिल ब्राऊन यांची होती. मंकड यांचं कृत्य नियमांना धरूनच होतं. या पद्धतीने आऊट करणं खेळभावनेला धरून नाही असं समजलं जातं. एका महान भारतीय खेळाडूचं नाव अशा प्रकारासाठी का घेण्यात यावं. ब्राऊन केलं असं नाव देण्यात यावं कारण चूक ब्राऊन यांची होती", असं गावस्कर यांनी म्हटलं आहे.