भारतीय महिला संघाचा झूलन गोस्वामीला विजयी निरोप
भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या लढतीत विजय मिळवत मालिकेत निर्भेळ यश मिळवलं. या विजयासह भारतीय संघाने अनुभवी गोलंदाज झूलन गोस्वामीला विजयी निरोप दिला. 20 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर झूलन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाली.
इंग्लंडच्या भेदक गोलंदीजापुढे भारतीय संघाचा डाव 169 धावांतच आटोपला. दीप्ती शर्माने 68 तर स्मृती मन्धानाने 50 धावांची खेळी केली. इंग्लंडतर्फे केट क्रॉसने 4 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. रेणुका सिंगने 4 तर झूलन आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा डाव 153 धावांतच संपुष्टात आला आणि भारतीय संघाने 16 धावांनी विजय मिळवला.
रेणुका सिंगला मॅन ऑफ द मॅच तर कर्णधार हरमनप्रीत कौरला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं.