1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
  4. Former West Indies all-rounder Sir Garfield Sobers passes away

वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू खेळाडू सर गार्फिल्ड सोबर्स यांचे निधन

क्रिकेटच्या इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक असलेले, वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू खेळाडू सर गार्फिल्ड सोबर्स यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी १९५४ ते १९७४ या काळात वेस्ट इंडिज संघासाठी उत्कृष्ट क्रिकेट खेळले आणि एकहाती संघाला अनेक विजय मिळवून दिले.
त्यांनी आपल्या कारकिर्दीत वेस्ट इंडिजसाठी ९३ कसोटी सामने खेळून ८०३२ धावा केल्या. या काळात त्यांची फलंदाजीची सरासरी ५७.७८ होती. त्यांनी या काळात २६ शतके आणि ३० अर्धशतके झळकावली. १९५८ मध्ये, त्यांनी पाकिस्तानविरुद्ध नाबाद ३६५ धावा केल्या, जो त्या काळातील एक मोठा विक्रम होता.

नंतर, १९९४ मध्ये, त्यांचे देशबांधव ब्रायन लारा यांनी ३७५ धावा करून हा विक्रम मोडला. फलंदाजीसोबतच त्यांनी गोलंदाजीतही प्रावीण्य मिळवले आणि आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण २३५ बळी घेतले. ते आपल्या कारकिर्दीत केवळ एकच एकदिवसीय सामना खेळू शकले.
२८ जुलै, १९३६ रोजी बार्बाडोसच्या सेंट मायकल येथे जन्मलेल्या गॅरी सोबर्सने १९५२ मध्ये प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर १९५४ मध्ये त्यांनी आपला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. पुढील २० वर्षे सोबर्सने आपल्या शानदार फलंदाजी आणि उत्कृष्ट गोलंदाजीने कसोटी क्रिकेटच्या विश्वावर वर्चस्व गाजवले. ते डावखुरे फलंदाज होते. ते केवळ मध्यमगतीच नव्हे, तर गरजेनुसार फिरकी गोलंदाजीही करत असत.

ते एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही होते. या गुणांमुळेच त्यांना क्रिकेटच्या इतिहासातील महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानले जाते. त्यांनी ३८३ प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये २८,००० हून अधिक धावा केल्या आणि १,००० हून अधिक बळी घेतले. आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात ते दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि नॉटिंगहॅमशायर संघांकडूनही खेळले.
सर सोबर्स यांनी १९६५ ते १९७२ या काळात वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे कर्णधारपदही भूषवले. या काळात त्यांनी ३९ सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. इतकेच नव्हे तर, प्रथम-श्रेणी क्रिकेट सामन्यात एकाच षटकात सलग सहा षटकार मारून ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित करणारे ते जगातील पहिले फलंदाज ठरले. त्यांनी कार्डिफ येथे झालेल्या काउंटी चॅम्पियनशिप सामन्यादरम्यान हा पराक्रम केला.
 
Edited By - Priya Dixit