मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: चेन्नई , सोमवार, 18 सप्टेंबर 2017 (10:50 IST)

ऑस्ट्रेलियावर भारताचा दणदणीत विजय

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 26 धावांनी पराभव केला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाने खराब सुरुवातीनंतर धोनी आणि पंड्याच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर 7 विकेट्‌स गमावत 281 धावा ठोकल्या होत्या. सामन्यामध्ये पावसाचा व्यत्यय आल्याने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी डकवर्थ लुईस नियमानुसार 21 षटकांत 164 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 137 धावांवर गारद झाला.
 
डकवर्थ लुईस नियमानुसार मिळालेल्या 164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच धक्का दिला. हिल्टन कार्टराईटला त्याने बोल्ड केले. तर त्या पाठोपाठ हार्दीक पंड्याने कर्णधार स्टिवन स्मिथला चकमा देत बुमराहकडे झेलबाद केले. आपल्या दुसऱ्या षटकात पांड्याने आणखी एक बळी मिळवला. त्याने ट्रॅव्हीस हेडला धोनीकरवी झेलबाद केले. फिरकीपटू कुलदीप यादवनेही एक बळी टिपला. त्याने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला 25 धावांवर माघारी धाडले. यानंतर ग्रेन मॅक्‍सवेलने काही फटकेबाजी केली. मात्र त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मोठा फटका मारण्याच्या नादात यजुवेंद्र चहालच्या गोलंदाजीवर पंड्याने त्याचा झेल घेतला. भारतीय गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी नांग्या टाकल्या. 9 विकेट्‌सच्या मोबदल्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने 137 धावांचीच मजल मारली. भारताकडून यजुवेंद्र चहालने 3 , हार्दीक पंड्या आणि कुलदीप यादवने 3 तर भुवनेश्वर आणि बुमराहने प्रत्येकी एक गडी बाद केला.
 
तत्पुर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघाची एकवेळ 5 बाद 87 अशी घसरगुंडी झाली होती. मात्र धोनी व हार्दिक पांड्या यांनी शतकी भागीदारी करीत भारताचा डाव सावरला, तसेच धोनीने भुवनेश्‍वरच्या साथीतही अर्धशतकी भागीदारी केल्यामुळेच भारताला निर्धारित 50 षटकांत 7 बाद 281 धावांची मजल मारता आली.
 
धोनीने आपल्या कारकिर्दीतील 100वे आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावताना विक्रमी कामगिरी केली. त्यात कसोटी क्रिकेटमध्ये 33, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 66 व टी-20मध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्याआधी भारताने शिखर धवनच्या जागी अजिंक्‍य रहाणेची सलामीच्या जागी निवड केली. तर ऑस्ट्रेलियाने हिल्टन कार्टराईटला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी दिली. तसेच जेम्स फॉकनर व नॅथन कूल्टर नाईल यांचे ऑस्ट्रेलियाच्या वन डे संघात पुनरागमन झाले.
 
ऑस्ट्रेलियाकडून नॅथन कूल्टर नीलने 44 धावांत 3, तर मार्कस स्टॉइनिसने 54 धावांत 2 बळी घेताना सर्वोत्तम कामगिरी केली.