शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (10:02 IST)

भारताने इंग्लंडला पराभूत करून टी-20 मालिकेत बरोबरी साधली, स्मृती मंधाना ने खेळली तुफानी खेळी

भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना यजमान इंग्लंड संघाने जिंकला होता, परंतु मंगळवारी 13 सप्टेंबर रोजी भारतीय महिला क्रिकेट संघाने मालिकेतील दुसरा सामना जिंकून तीन सामन्यांच्या T20I मालिकेत बरोबरी साधली.या सामन्यात स्मृती मंधाना ने तुफानी खेळी खेळली, ज्याच्या जोरावर भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला.
 
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.इंग्लंड संघाने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 142 धावा केल्या.यजमानांकडून फ्रेया केम्पने 51 धावा केल्या, तर माया बाउचियरने 34 धावा केल्या.याशिवाय इंग्लिश संघाकडून इतर कोणत्याही फलंदाजाने विशेष कामगिरी दाखवली नाही.भारताकडून स्नेह राणाने 3, तर रेणुका सिंग आणि दीप्ती शर्माने 1-1 विकेट घेतली. 
 
त्याचवेळी 143 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली.मात्र, शेफाली वर्मा 20 धावा करून बाद झाली, मात्र तोपर्यंत पॉवरप्लेमध्ये संघाच्या 55 धावा झाल्या होत्या.भारताची दुसरी विकेट 77 धावांवर पडली जेव्हा दयालन हेमलता 9 धावांवर बाद झाली.यानंतर सलामीवीर स्मृती  मंधाना  आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यात अतूट भागीदारी झाली आणि संघाने 16.4 षटकांत लक्ष्य गाठले. 
 
डावखुरी सलामीवीर स्मृती  मंधाना ने 53 चेंडूंत 13 चौकारांसह नाबाद 79 धावा केल्या, तर कर्णधार हरमनप्रीत कौर 22 चेंडूंत 29 धावा करून नाबाद परतली.इंग्लंड संघाने पहिला सामना 9 गडी राखून जिंकला होता.आता दोन्ही संघांमधील मालिकेतील निर्णायक सामना 15 सप्टेंबर रोजी ब्रिस्टलमध्ये खेळवला जाईल.त्याचवेळी, यानंतर दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल.