India vs Zimbabwe: व्हीव्हीएस लक्ष्मण पुन्हा भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त
भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये प्रशिक्षकाची भूमिका साकारणार आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख असलेले लक्ष्मण यांची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाचे काळजीवाहू प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी याला दुजोरा दिला. भारतीय संघ 18, 20 आणि 22 ऑगस्ट रोजी हरारे, झिम्बाब्वे येथे तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.
जय शाह यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की,व्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वेमध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाचे प्रभारी असेल. राहुल द्रविड विश्रांती घेत आहे असे नाही. झिम्बाब्वेमधील एकदिवसीय मालिका 22 ऑगस्ट रोजी संपेल. आणि द्रविड 22 ऑगस्ट रोजी भारतीय संघासह आशिया कपसाठी UAE ला पोहोचेल. दोघांमध्ये फारच कमी फरक आहे, त्यामुळे लक्ष्मण झिम्बाब्वेमध्ये भारतीय संघाची धुरा सांभाळणार आहे.
यापूर्वी, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये मोठा बदल करण्यात आला होता. केएल राहुल संघात परतला आणि त्याला कर्णधारपद देण्यात आले. या दौऱ्यासाठी 15 जणांच्या संघात त्याचा यापूर्वी समावेश नव्हता. ३० जुलै रोजी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली तेव्हा राहुल त्या संघात नव्हता. त्यानंतर शिखर धवनकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. राहुलच्या पुनरागमनानंतर आता धवनला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध 3 वनडे सामन्यांसाठी टीम इंडिया: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.