सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (14:00 IST)

IndvsEng: टीम इंडिया हेडिंग्लेत 19 वर्षांनंतर खेळणार; अनोख्या हॅट्रिकची संधी

भारतीय संघाने क्रिकेटची पंढरी अर्थात लॉर्ड्सवर दिमाखदार विजय मिळवत इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली.
 
आजपासून तिसरी टेस्ट हेडिंग्ले, लीड्स इथं सुरू होत आहे. भारतीय संघ तब्बल 19 वर्षांनंतर या मैदानावर टेस्ट खेळतो आहे.
 
योगायोग म्हणजे 19 वर्षांपूर्वी झालेल्या त्या टेस्टमध्ये भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला होता.
 
त्याहून मोठा योगायोग म्हणजे याच मैदानावर भारतीय संघ आधीची टेस्ट 16 वर्षांपूर्वी खेळला होता. ती टेस्टही भारतीय संघाने जिंकली होती. 35 वर्षांनंतर हेडिंग्लेवर विजयाची हॅट्रिक साधण्याची संधी टीम इंडियासमोर आहे.
 
भारतीय संघाने या मैदानावर 6 टेस्ट खेळल्या आहेत. 1952, 1959,1967 या वर्षी झालेल्या टेस्ट्समध्ये भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
 
1979 मध्ये झालेली टेस्ट अनिर्णित झाली होती. त्यानंतर 1986 आणि 2002 मध्ये झालेल्या टेस्टमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे.
 
19 वर्षांनंतर इथे भारतीय संघ टेस्ट खेळत असल्याने त्या संघातील खेळाडू निवृत्त झाले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघासाठी हे मैदान सर्वस्वी नवं आव्हान असेल.
 
हेडिंग्लेवरील आधीच्या दोन संस्मरणीय विजयांचा घेतलेला आढावा.
 
वेंगसरकरांची हुकूमत आणि रॉजर बिन्नी यांची भन्नाट स्विंग गोलंदाजी (19 ते 23 जून 1986)
दिलीप वेंगसरकरांच्या दमदार खेळाच्या बळावर 1986 मध्ये भारतीय संघाने हेडिंग्ले काबीज केलं होतं.
 
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 272 धावांची मजल मारली. वेंगसरकरांनी सर्वाधिक 61 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडचा पहिला डाव 102 धावातच गडगडला. रॉजर बिन्नी यांनी 5 विकेट्स घेतल्या.
 
भारताने दुसऱ्या डावात 237 धावांची मजल मारली. वेंगसरकरांनी नाबाद 102 धावांची दिमाखदार खेळी केली.
 
बाकी फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडला 408 धावांचं लक्ष्य मिळालं. त्यांचा दुसरा डाव 128 धावातच आटोपला. मनिंदर सिंगने 4 तर कपिल देव आणि रॉजर बिन्नी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
 
त्रिमुर्तींचा शतकसोहळा आणि हेडिंग्लेवरचा जंगी विजय (22 ते 26 ऑगस्ट 2002)
या मैदानावर झालेल्या शेवटच्या टेस्टमध्ये भारतीय संघाने दिमाखदार विजय साकारला होता.
 
या विजयाचं वैशिष्ट्य म्हणजे राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी झळकावलेली शतकं. परदेशातील संस्मरणीय विजयांमध्ये हेडिंग्लेवरील विजयाचा समावेश होतो. भारताने चार सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली.
 
भारताने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ढगाळ वातावरण आणि स्विंग गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर संजय बांगर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी सुरुवात केली.
 
सेहवाग लवकर बाद झाला मात्र त्यानंतर बांगर-द्रविड जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 170 धावांची भागीदारी केली. बांगरने 68 धावांची खेळी केली.
 
सचिन तेंडुलकर आणि द्रविड जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी केली. द्रविड बाद झाल्यानंतर सचिन-सौरव जोडीने चौथ्या विकेटसाठी 249 धावांची भागीदारी केली.
 
राहुल द्रविडने 23 चौकारांसह 148 धावांची खेळी केली. सचिनने 19 चौकार आणि 3 षटकारांसह 193 धावांची मॅरेथॉन खेळी केली. गांगुलीनेही शर्यतीत मागे न राहता 14 चौकार आणि 3 षटकारांसह 128 धावांची सुरेख खेळी केली. भारतीय संघाने पहिला डाव 628/8 धावसंख्येवर घोषित केला.
 
इंग्लंडचा पहिला डाव 273 धावातच आटोपला. अॅलेक स्टुअर्टने 78 तर मायकेल वॉनने 61 धावांची खेळी केली. अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
 
प्रचंड आघाडी असल्याने भारताने इंग्लंडला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात इंग्लंडने प्रतिकार केला मात्र तरीही त्यांचा डाव 309 धावात आटोपला. नासिर हुसेनने 110 धावांची खेळी केली. अनिल कुंबळेने चार विकेट्स घेतल्या.
 
राहुल द्रविडला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.