खेळाडूंच्या दुखापतीनी वाढवली फ्रँचायझींची डोकेदुखी
आयपीएल २०२६ सुरू होण्यास काहीच दिवस उरले आहे, परंतु अनेक खेळाडूंच्या दुखापतींमुळे फ्रँचायझींच्या अडचणींमध्ये भर पडत आहे. स्पर्धेची सुरुवात जसजशी जवळ येत आहे, तसतशी जखमी खेळाडूंची यादी वाढत आहे. आतापर्यंत सात खेळाडू जखमी झाल्याचे वृत्त आहे, त्यापैकी चौघांना स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले आहे. इतर तीन खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोलकाता नाईट रायडर्स भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे आयपीएल २०२६ चा संपूर्ण हंगाम खेळू शकणार नाही. ४ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० विश्वचषक २०२६ च्या सराव सामन्यादरम्यान त्याला ही दुखापत झाली. बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात तो कुबड्यांच्या साहाय्याने चालताना दिसला होता.
तसेच चेन्नई सुपर किंग्स ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज नॅथन एलिस हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२६ मधून बाहेर पडला आहे. सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी गुरुवार, १९ मार्च रोजी एलिसच्या दुखापतीला दुजोरा दिला. मात्र, त्याच्या बदली खेळाडूची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
राजस्थान रॉयल्स सॅम करन आरआरने गेल्या वर्षी सीएसकेसोबतच्या एका ट्रेड डीलमध्ये इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनला संघात घेतले होते, परंतु मांडीच्या दुखापतीमुळे तो २०२६ च्या या मोठ्या लीगमधून बाहेर पडला आहे.
सनरायझर्स हैदराबाद जॅक एडवर्ड्स युवा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू जॅक एडवर्ड्स, ज्याला २०२६ च्या लिलावात एसआरएचकडून ३ कोटी रुपयांना आपला पहिला आयपीएल करार मिळाला होता, तो एका अज्ञात दुखापतीमुळे आयपीएल २०२६ चा संपूर्ण हंगाम खेळू शकणार नाही.
सनरायझर्स हैदराबाद पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार पॅट कमिन्स आयपीएल २०२६ चे सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही. तो एका दुखापतीतून सावरत आहे, ज्यामुळे तो २०२६ च्या टी-२० विश्वचषकातून बाहेर होता. कमिन्सच्या अनुपस्थितीत, इशान किशन एसआरएचचे कर्णधारपद भूषवेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर जोश हेझलवूड ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ज्याने गेल्या वर्षी आरसीबीच्या पहिल्या आयपीएल विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली होती, तो आयपीएल २०२६ चे सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही. तो एका दुखापतीतून सावरत आहे, ज्यामुळे तो गेल्या चार महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे.
Edited By- Dhanashri Naik