IPL 2022: आयपीएलच्या 15 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर, पहिला सामना CSK विरुद्ध KKR यांच्यात होणार
IPL 2022 च्या वेळापत्रकाची प्रतीक्षा संपली आहे. बीसीसीआयने नुकतेच स्पर्धेच्या सुरुवातीच्या तारखांसह ठिकाण जाहीर केले होते, परंतु आता हंगाम 15 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने IPL 2022 चे वेळापत्रक आज म्हणजेच 6 मार्च, रविवारी प्रसिद्ध केले आहे. या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. आयपीएल 2022 चा पहिला सामना 26 मार्च रोजी होणार आहे, तर स्पर्धेचा अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. यावेळी स्पर्धेत 8 ऐवजी 10 संघ सहभागी होतील. यावेळी लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांनी लीगमध्ये प्रवेश केला आहे.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 बदललेल्या फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल, ज्यामध्ये 10 संघ प्रत्येकी पाच संघांच्या दोन गटात विभागले गेले आहेत, परंतु असे असूनही, प्रत्येक संघ पूर्वीप्रमाणे 14 सामने खेळेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी संघाचा गट जाहीर केला.
मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स (KKR), राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपरजायंट्स अ गटात आहेत तर चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांना ब गटात ठेवण्यात आले आहे.
IPL 2022 चे आयोजन 26 मार्चपासून होणार आहे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए ) वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, ठाण्यातील एमसीए स्टेडियम, डॉ. डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी ग्राउंड, सीसीआई (क्रिकेट क्लब ऑफ इंडिया) आणि फुटबॉल ग्राउंड येथे होणार आहे.