ICC Women's World Cup : भारतीय टीमची पाकिस्तान मोहीम फत्ते; 107 धावांनी विजयी
राजेश्वरी गायकवाडच्या दमदार स्पेलच्या बळावर भारतीय संघाने महिला विश्वचषक स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 108 धावांनी विजय मिळवत पहिली मोहीम फत्ते केली.
विजयासाठी मिळालेल्या 245 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 137 धावातच आटोपला. पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. राजेश्वरीने 10 षटकात 31 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेत पाकिस्तानच्या डावाला खिंडार पाडलं. स्नेह राणा आणि झूलन गोस्वामी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. मेघना सिंग आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. पाकिस्तानच्या एकीलाही मोठी खेळी करता आली नाही.
तत्पूर्वी स्नेह राणा आणि पूजा वस्राकर यांनी साकारलेल्या महत्त्वपूर्ण भागीदारीच्या बळावर भारतीय संघाने महिला विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानसमोर 245 धावांचं लक्ष्य ठेवलं.
भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. धडाकेबाज सलामीवीर शफाली वर्मा भोपळाही फोडू शकली नाही.
स्मृती मंधाना आणि दिप्ती शर्मा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या दिप्तीला नशरा संधूने बाद केलं. तिने 40 धावांची खेळी केली. स्मृती मोठी खेळी करणार अशी चिन्हं होती. मात्र अर्धशतकानंतर लगेचच स्मृती तंबूत परतली. तिने 3 चौकार आणि एका षटकारासह 52 धावांची खेळी केली.
अनुभवी फलंदाज मिताली राज 9 धावा करून माघारी परतली. हरमनप्रीत कौरला लौकिलाला साजेसा खेळ करता आला नाही. तिने 5 धावा केल्या. रिचा घोषही मोठं योगदान देऊ शकलं नाही.
पूजा वस्राकर आणि स्नेह राणा जोडीने विकेट्सची पडझड थांबवली आणि सातव्या विकेटसाठी 122 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. 114/6 अशी घसरण झालेल्या भारतीय संघाचा डाव या दोघींनी सावरला. या दोघींच्या भागीदारीमुळे भारतीय संघाला दोनशेचा टप्पा ओलांडता आला.
पूजाने 8 चौकारांसह 67 धावांची खेळी केली. स्नेहने 4 चौकारांसह नाबाद 53 धावांची खेळी केली. पाकिस्तानतर्फे निडा धर आणि नशरा संधू यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. डिआना बेग, अनम अमिन आणि फातिमा साना यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतल्या.
भारतीय संघाच्या विश्वचषकातील लढती
8 मार्च-न्यूझीलंड- सकाळी 6.30 पासून
10 मार्च-वेस्ट इंडिज- सकाळी 6.30 पासून
16 मार्च- इंग्लंड- सकाळी 6.30 पासून
18 मार्च- ऑस्ट्रेलिया- सकाळी 6.30 पासून
22 मार्च- बांगलादेश- सकाळी 6.30 पासून
28 मार्च- दक्षिण आफ्रिका- सकाळी 6.30 पासून