गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 16 डिसेंबर 2023 (18:54 IST)

धोनीवर आरोप करणाऱ्या IPS अधिकाऱ्याची तुरुंगात रवानगी, नेमकं काय घडलं?

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर मॅच फिक्सिंगचा आरोप करणं IPS अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे.मद्रास उच्च न्यायालयाने महेंद्रसिंग धोनीवर मॅच फिक्सिंगचा आरोप करणाऱ्या IPS अधिकारी जी. संपत कुमार यांना 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
 
या प्रकरणी महेंद्रसिंग धोनीने न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.
 
धोनीशी संबंधित प्रकरणात जी संपत कुमार यांनी सर्वोच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालयाचा अवमान करणाऱ्या टिप्पणी केल्या होत्या असं म्हटलं होतं.
 
मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. सुंदर आणि सुंदर मोहन यांनी आयपीएस अधिकारी जी संपत कुमार यांना या निकालाविरुद्ध अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे.
2014 मध्ये धोनीने संपत कुमार विरुद्ध 100 कोटी रुपयांच्या मानहानीचा खटला दाखल केला होता. आयपीएल सट्टेबाजारात धोनीचा सहभाग असल्याचा आरोप संपत कुमार यांनी केला होता. त्यावरून धोनीने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
 
संपत यांनी मानहानीचा दावा रद्द करण्याची लेखी मागणी करताना असं म्हटलं होतं की, न्यायालय कायद्याच्या मार्गापासून दूर जात आहे. आयपीएलमध्ये झालेल्या सट्टेबाजीच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती मुदगल समितीने अहवाल योग्य प्रकारे हाताळला नसल्याचंही संपत यांनी आपल्या मागणीत म्हटलं होतं. शिवाय सर्वोच्च न्यायालयाने काही कागदपत्रे सीबीआयला न दिल्याबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
 
धोनीने संपत कुमार यांच्या अर्जाचा वापर करून न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. संपत यांनी केलेल्या लेखी मागणीमध्ये नमूद मुद्यांमुळेही आपल्या मान-सन्मानाला हानी पोहचत आहे. हा न्यायालयाचाही अवमान मानावा, अशी अपेक्षा धोनीने याचिकेत व्यक्त केली होती.
 
वरिष्ठ अधिवक्ता पी. आर रमन यांनी दाखल केलेल्या याचिकेत संपत कुमार यांच्यावर कठोर कारवाई करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. या खटल्याची तपासणी करणारे तामिळनाडूचे मुख्य वकील आर. चुनमुगसुंदरम यांनी धोनीला अवमान याचिका दाखल करण्याची परवानगी दिली. त्या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने आज आदेश जारी केला आहे.
 
धोनीने 100 कोटींचा खटला दाखल केला
2013 च्या आयपीएल क्रिकेट सामन्यात स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीचा आरोप झाला होता. या संदर्भात दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना अटक केली.
त्यानंतर या प्रकरणात अनेक लोक गुंतले असल्याच्या तक्रारी आल्या आणि अनेक न्यायालयीन खटलेही दाखल झाले. मे 2014 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती मुकुल मुदगल समिती नेमली.
 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन, त्यांचे जावई गुरुनाथ मयप्पन, राजस्थान रॉयल्सचे सहमालक राज कुंद्रा आणि 12 खेळाडूंच्या भूमिकेची चौकशी करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली होती.
 
या समितीचा अहवाल ऑगस्ट 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला.
 
या प्रकरणाची चौकशी आयपीएस संपत कुमार यांनी केली होती. त्यांनी या प्रकरणावरून धोनीच्या विरोधात वक्तव्य केलं. स्पॉट फिक्सिंगमध्य धोनीचा समावेश होता, असा आरोप त्यांनी केला होता.
संपत कुमार यांच्या विधानानंतर धोनीने उच्च न्यायालयात धाव घेत 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला होता. एका खासगी वृत्तवाहिनीविरोधातही याचिका केली होती.
 
यावर प्रतिक्रिया देताना वृत्तवाहिनीने सांगितलं की, संपत कुमार यांनी दिलेला अहवाल त्यांनी समितीसमोर प्रसिद्ध केला आहे.
 
या याचिकेनंतर न्यायालयाने संपत आणि इतरांना धोनीविरोधात न बोलण्याची ताकीद दिली होती.
 
धोनीची दावा फेटाळण्यास न्यायालयाने नकार दिला
धोनीने दाखल केलेला मानहानीचा दावा फेटाळण्यासाठी आयपीएस अधिकारी संपत कुमार यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
 
संपत कुमार तेव्हा पोलिस अधीक्षक होते. या प्रकरणाची चौकशी आयपीएस संपत कुमार करत असल्याने प्रकरणाच्या तपासासाठी नियुक्त केलेले अधिकारी म्हणून त्यांच्यावरील खटला रद्द करावा अशी याचिका त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली होती.
 
पण खटला सुरू होणार तोपर्यंत उच्च न्यायालयाने 2021 मध्ये धोनीचा दावा फेटाळता येणार नाही असं सांगितलं.
 
त्यामुळे संपत कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात रिट याचिका दाखल केली होती. 2022 मध्ये धोनीने त्या याचिकेत न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल संपत कुमार विरुद्ध अवमान खटला दाखल केला.
 
न्यायालयाचा अवमान
आपल्या याचिकेत धोनीने असं म्हटलं होतं की, आयपीएस अधिकाऱ्याने 2014 मध्ये दाखल केलेल्या खटल्याला 2021 मध्येच उत्तर द्यायचे होतं. पण आता त्यांच्या विधानामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे.
 
धोनीने आपल्या याचिकेत पुढे म्हटलंय की, "सर्वोच्च न्यायालय कायद्याच्या मार्गापासून दूर जात असल्याचं संपत कुमार यांनी म्हटलं आहे."
 
याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटलंय की, आयपीएस अधिकाऱ्याने केलेल्या दाव्यात न्यायलायला विनाकारण ओढलं आहे. त्यामुळे धोनीने दाखल केलेल्या न्यायालयाच्या अवमानाच्या खटल्याची सुनावणी घेण्याचं ठरलं.
 
या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने आज आपला निकाल दिला आहे. न्यायालयाने आयपीएस अधिकारी जी. संपत कुमार यांना न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
 
Published By- Priya Dixit