गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 19 जून 2021 (15:49 IST)

WTC Final: न्यूझीलंडने टॉस जिंकला; भारताची सावध सुरुवात

साऊदॅम्प्टन, इंग्लंड इथे सुरू झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी आश्वासक सुरुवात केली आहे.
 
ढगाळ वातावरण कायम असून, चेंडू स्विंग होण्याची शक्यता असल्याने न्यूझीलंडने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
 
न्यूझीलंडने चार वेगवान गोलंदाजांसह एका अष्टपैलू खेळाडूला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूसंह खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
 
भारताचे ज्येष्ठ धावपटू मिल्खा सिंग यांचं शुक्रवारी निधन झालं. मिल्खा सिंग यांना आदरांजली म्हणून भारतीय खेळाडू दंडाला काळी फीत लावून खेळत आहेत.
 
दोन्ही संघ- भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह.
 
न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, काईल जेमिसन, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग.
 
सततच्या पावसामुळे पहिल्या दिवशी एकही चेंडू न टाकता खेळ रद्द करण्यात आला होता.
 
कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा स्वरुपाची स्पर्धा होत आहे.
 
फायनल ड्रॉ किंवा टाय झाली तर कोणत्या संघाला विजेतेपद मिळणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. फायनल ड्रॉ म्हणजे अनिर्णित किंवा टाय म्हणजे बरोबरीत सुटल्यास दोन्ही संघांना स्पर्धेचे संयुक्त विजेते म्हणून घोषित केलं जाईल असं आयसीसीने जाहीर केलं.
 
या फायनलसाठी 23 जून हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. पाच दिवसांच्या खेळात पावसामुळे किंवा कोणत्या अन्य कारणांमुळे अडथळा आला तर उर्वरित ओव्हर्स 23 जून रोजी खेळवण्यात येतील, असे आयसीसीने स्पष्ट केलं. मात्र पाच दिवस पूर्ण सामना झाल्यानंतरही निकाल न लागल्यास सहाव्या दिवशी खेळ होणार नाही.
 
हा सामना ग्रेड 1 ड्यूक बॉलने खेळवला जाणार आहे. याव्यतिरिक्त मैदानावरील अंपायरनी शॉर्ट रनच्या दिलेल्या निर्णयाचा रिव्ह्यू थर्ड अंपायर करणार आहे.
 
LBW चा निकाल दिल्यानंतर फिल्डिंग करणाऱ्या टीमचा कॅप्टन किंवा आऊट झालेल्या बॅट्समन बॉल खेळण्याचा प्रयत्न केला होता का? हे मैदानातील अंपायरला विचारणा करुन प्लेयर रिव्ह्यू घेऊ शकतो.
 
LBW च्या निर्णयाची समीक्षा करण्यासाठी स्टम्पवर आदळणाऱ्या बॉलची उंची आणि लांबी यावरुन अम्पायर्स कॉलचा निर्णय घेण्यात येईल.
 
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान आतापर्यंत एकूण ५९ कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी भारताने २१ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने १२ सामने जिंकले आहेत. अनिर्णीत सामन्यांची संख्या सर्वाधिक म्हणजेच २६ इतकी आहे.
 
भारताचा फायनलपर्यंतचा प्रवास
भारतीय संघाने वेस्ट इंडिजला त्यांच्याच भूमीवर 2-0 असा विजय मिळवत दणक्यात सुरुवात केली. भारताने पहिली कसोटी 318 तर दुसरी 257 धावांनी जिंकली होती.
 
इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनी भेदक गोलंदाजी करत विजयात निर्णायक भूमिका बजावली होती.
 
हनुमा विहारीने कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक झळकावलं होतं. विहारीला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
 
घरच्या मैदानावर खेळताना भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला 3-0 असं नमवलं. रोहित शर्माने या मालिकेदरम्यान कसोटीत सलामीवीर म्हणून पदार्पण केलं.
 
मयांक अगरवालने सलग दोन शतकं झळकावली. रोहित शर्मानेही दोन शतकांची लयलूट केली. कर्णधार विराट कोहलीने द्विशतकी खेळी साकारली.
 
यानंतर भारतीय संघाने बांगलादेशचा 2-0 असा धुव्वा उडवला. इशांत शर्माला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
 
न्यूझीलंडविरुद्ध मात्र भारतीय संघाला सपशेल पराभवाला सामोरं जावं लागलं. न्यूझीलंडने 2-0 असं हरवत दणदणीत विजय मिळवला. पहिल्या कसोटीत टीम साऊदीने तर दुसऱ्या कसोटीत कायले जेमिसनने भारतीय संघाची दाणादाण उडवली.
 
ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाला चीतपट करणं अतिशय अवघड समजलं जातं. सलामीच्या कसोटीत भारतीय संघाचा 36 धावात खुर्दा उडाला. पॅटर्निटी लिव्हसाठी विराट कोहली मायदेशी परतला.
 
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला दुखापतींनी बेजार केलं. अनुनभवी भारतीय संघाने सगळ्या अडथळ्यांना पार करत थरारक विजय साकारला.
 
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय मिळवला. अजिंक्य रहाणेच्या शतकाच्या बळावर भारतीय संघाने दुसरी कसोटी जिंकली. तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला विजयाची संधी होती. मात्र ऋषभ पंतने दमदार खेळी करत भारतीय संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. ऋषभ बाद झाल्यानंतर हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विन यांनी चिवटपणे खेळ करत सामना अनिर्णित राखली.
 
चौथ्या कसोटीत ऋषभच्या आणखी एक दिमाखदार खेळीच्या बळावर भारतीय संघाने संस्मरणीय विजय साकारला. वॉशिंग्टन सुंदर, टी.नटराजन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, शुभमन गिल या युवा खेळाडूंनी विजयात उल्लेखनीय योगदान दिलं.
 
यानंतर भारताने घरच्या मैदानावर इंग्लंडला 3-1 नमवलं. रवीचंद्रन अश्विनने 32विकेट्स पटकावत मालिकावीर पुरस्कार पटकावला.