बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 28 जुलै 2017 (12:31 IST)

दर्जा उंचावण्यासाठी अधिक कसोटी सामने खेळण्याची गरज- मिताली

एकदिवसीय किंवा टी-20 या झटपट प्रकारांमुळे क्रिकेटची लोकप्रियता वाढण्यास मदत होत असली, तरी कसोटी क्रिकेट हाच सर्वात आव्हानात्मक प्रकार असून महिला क्रिकेटचा दर्जा खऱ्या अर्थाने उंचावण्यासाठी आम्हाला अधिक संख्येने कसोटी सामने खेळायला मिळण्याची गरज आहे, अशी स्पष्टोक्‍ती विश्‍वचषक स्पर्धेत
 
उपविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने केली आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि बीसीसीआय यांच्या वतीने वेगवेगळ्या समारंभात भारतीय महिला संघाचा गौरव करण्यात आला, त्या वेळी ती बोलत होती. तब्बल 18 वर्षांच्या कारकिर्दीत आपल्याला केवळ 10 कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली, असे सांगून मिताली म्हणाली की, महिला क्रिकेटमध्येही इंग्लंड व ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेव्यतिरिक्‍त अन्य कोणतीही नियमित कसोटी मालिका अस्तित्वात नाही.
 
वास्तविक पाहता केवळ क्रिकेटमधील सर्वौच्च कौशल्यासाठीच नव्हे, तर टेम्परामेंट, स्टॅमिना, सांघिक कामगिरी या सगळ्यासाठीच कसोटी क्रिकेट हा सर्वोत्तम निकष आहे. मात्र वास्तवात विविध देशांच्या क्रिकेट मंडळांकडून केवळ वन डे किंवा टी-20 क्रिकेटचाच पुरस्कार केला जातो आहे. कारण त्याच प्रकारांना अधिक लोकप्रियता, पुरस्कर्ते किंवा प्रेक्षक लाभतात असे त्यांना वाटते. परंतु झटपट क्रिकेटकरिता दर्जेदार खेळाडू मिळण्याचा मार्ग कसोटी क्रिकेटमधूनच जातो हे त्यांना समजत नाही, असे मितालीने सांगितले.
 
विश्‍वचषक उपविजेत्या महिला संघाचा अनेक ठिकाणी सत्कार होतो आहे, त्यांच्या भोवती सातत्याने चाहत्यांचा, तसेच प्रसार माध्यमांना गराडा असतो. या सगळ्याची त्यांना सवय नसली, तरी त्याचा आनंद मात्र या साऱ्या खेळाडू घेत आहेत. आम्ही 2005मध्येही चांगली कामगिरी केली होती. परंतु आजच्यासारखी प्रशंसा आणि मागणी त्या वेळी मिळाली नव्हती, असे सांगून मिताली म्हणाली की, आमच्या प्रयत्नांचे चीज झालेले पाहून खरोखरीच आनंद होतो आहे. मोठ्या संख्येने महिला क्रिकेटपटूंना नोकऱ्या दिल्याबद्दल मितालीने भारतीय रेल्वे विभागाबद्दल कृतज्ञता व्यक्‍त केली. रेल्वेत एकूण 150 महिला क्रिकेटपटू नोकरीला आहेत.