गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (19:46 IST)

न्यूझीलंड क्रिकेट संघाने पाकिस्तान दौरा 'या' कारणामुळे केला रद्द

पाकिस्तान विरोधातील एकदिवसीय सामन्यापूर्वीच न्यूझीलंडनं त्यांचा दौरा रद्द केला आहे. न्यूझीलंडनं सुरक्षेच्या कारणावरून रावळपिंडी येथील मैदानात जाण्यास नकार दिला होता. याठिकाणीच पाकिस्तान विरोधात त्यांचा पहिला वन डे सामना खेळला जाणार होता.
 
न्यूझीलंडचा संघ 18 वर्षांनंतर पाकिस्तानच्या भूमीवर क्रिकेट खेळण्यासाठी आलेला आहे. या दोन्ही संघांमध्ये रावळपिंडीतील मैदानावर तीन वन डे सामने होणार होते. त्यानंतर लाहौरमध्ये पाच टी-20 सामन्यांची मालिकाही नियोजित होती.
 
"पाकिस्तानात धोक्यामध्ये झालेली वाढ आणि न्यूझीलंडच्या टीमच्या सुरक्षा सल्लागारांशी सल्लामसलत केल्यानंतर हा दौरा पुढं सुरू ठेवू शकणार नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे," असं न्यूझीलंड क्रिकेट असोसिएशननं एका ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 
आम्हाला मिळालेल्या माहितीचा विचार करता, हा दौरा सुरू ठेवणं शक्य नव्हतं, असं न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेवीड व्हाइट म्हणाले.
 
"पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी हा धक्का असेल, याची मला जाणीव आहे. कारण त्यांनी उत्तम प्रकारे आयोजन केलं. मात्र, आमच्यासाठी खेळाडूंची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे आणि हाच एकमात्र पर्याय आहे असं आम्हाला वाटतं," असंही ते म्हणाले.
 
आता क्रिकेटपटूंच्या परतण्याची तयारी केली जात असल्याचं न्यूझीलंड क्रिकेटकडून सांगण्यात आलं.
 
न्यूझीलंड क्रिकेट प्लेअर्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हीथ मिल्स यांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला. खेळाडू सुरक्षित आहेत आणि त्या सर्वांच्या भल्यासाठीच आम्ही काम करत आहोत, असं ते म्हणाले.
 
सुरक्षेच्या कारणावरून संघाला परत बोलावण्यासंदर्भात अधिक चर्चा करू शकत नाही, असंही न्यूझीलंड क्रिकेटनं म्हटलं आहे.
 
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनीही, खेळाडूंच्या सुरक्षिततेचा विचार करता पाकिस्तान दौरा रद्द करण्याच्या न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे.
 
"मी पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चा केली आणि आमच्या संघाची काळजी घेण्यासाठी त्यांचे आभार मानले," असं रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाल्या.
 
"स्पर्धा होऊ शकली नाही, है दुर्दैवी आहे. पण खेळाडूंच्या सुरक्षिततेचा मुद्दा सर्वांत महत्त्वाचा आहे. आम्ही या निर्णयाच्या पूर्णपणे पाठिशी आहोत," असंही त्यांनी म्हटलं.
 
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं काय म्हटलं?
दरम्यान, पाकिस्ताननं न्यूझीलंडचा हा निर्णय एकतर्फी आणि निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे. त्यांचा संघ सुरक्षेच्या बाबतीत समाधानी होता, असंही पाकिस्ताननं म्हटलं आहे.

"न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं त्यांना सुरक्षेसंदर्भात अलर्ट मिळाला असून, त्यांनी हा दौरा रद्द करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला असल्याचं, आम्हाला सांगितलं आहे," असं ट्विट पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं केलं.
 
"पीसीबी आणि पाकिस्तान सरकारनं येणाऱ्या सर्व संघांसाठी सुरक्षा पुरवण्याची पुरेशी तयारी केली आहे. न्यूझीलंडच्या संघाचे सुरक्षा अधिकारी याठिकाणी दौऱ्यादरम्यान करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेवर समाधानी होते."
 
"ठरलेले सामने व्हावे अशी पीसीबीची इच्छा होती. पाकिस्तान आणि जगभरातील क्रिकेटप्रेमी अखेरच्या क्षणाला दौरा रद्द केल्यानं निराश असतील," असंही पीसीबीनं म्हटलंय.
 
पाकिस्तानचा कर्णधारही नाराज
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमनंही दौरा रद्द झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. "अचानक मालिका स्थगित झाल्यानं निराश झालो आहे. यामुळे लाखो पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू येऊ शकलं असतं. मला आमच्या सुरक्षा यंत्रणांच्या क्षमता आणि कामगिरीवर विश्वास आहे. ते आमचा गौरव आहेत आणि राहतील," असं आझमनं म्हटलंय.
 
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीनंही हा निर्णय निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे. "मी गेल्या 6 वर्षांपासून पाकिस्तानात खेळत असून, मला पूर्णपणे सुरक्षित वाटतं. तिथं खेळण्याचा माझा अनुभव अत्यंत उत्तम आहे. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे," असं तो म्हणाला.
हर्षा भोगले यांनीही याबाबत ट्वीट केलं. पाकिस्तानातील क्रिकेट चाहत्यांप्रती माझी सहानुभूती आहे. पण सुरक्षेच्या कारणांवरून हा निर्णय घेतला असेल तर त्यामुळे इतर संघांच्या दौऱ्यांवरही त्याचा परिणाम होईल.
 
पुढच्याच महिन्यात इंग्लंडच्या महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांचेही रावळपिंडीमध्ये सामने होणार आहेत. श्रीलंकेच्या संघाच्या बसवर 2009 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानमध्ये 2019 मध्ये प्रथमच कसोटी सामना झाला होता.