सोमवार, 14 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 17 डिसेंबर 2022 (08:16 IST)

राज्यस्तरीय १४ वर्षांखालील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा; नाशिकचा नंदुरबारवर मोठा विजय

* नैतिक घाटे व नील चंद्रात्रे यांची नाबाद शतके
* देवांश गवळी चे सामन्यात ७ बळी
 नाशिक मध्ये चालू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १४ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात , हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर नाशिक ने नंदुरबारवर १ डाव व १६७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. तर महात्मानगर क्रिकेट मैदानावर बीडने स्टार, पुणे विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवले.
 
गोल्फ क्लबवर पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी मिळालेल्या नाशिकने नंदुरबार विरुद्ध पहिल्या डावात नैतिक घाटे नाबाद १५९ व नील चंद्रात्रे नाबाद १०० यांच्या जोरावर केवळ ४८ षटकांत २ बाद २९० अशी धावसंख्या उभारली. दोन्ही गडी सोहम पाटिलने बाद केले. उत्तरदाखल नाशिकच्या देवांश गवळीचे ५ व व्यंकटेश बेहरेच्या ३ बळींमुळे नंदुरबारचा पहिला डाव २५.३ षटकांत ५६ धावांत आटोपला. हुजेफा मर्चंट व प्रिन्स पटेलने प्रत्येकी १ गडी बाद केला. फॉलोऑन नंतरही दुसऱ्या डावात नाशिकच्या गोलंदाजांनी नंदुरबारला ३१.१ षटकांत गुंडाळून मोठा विजय मिळवून दिला. दुसऱ्या डावातही देवांश गवळीने २ व व्यंकटेश बेहरेने ३ गडी बाद करण्याची कामगिरी केली. त्यांना हुजेफा मर्चंट व नील नील चंद्रात्रेने हि २ बळी घेत छान साथ दिली . ओल्या मैदानामुळे पहिल्या दिवशी केवळ २८ षटकांचाच खेळ होऊन देखील नाशिक संघाने हे उल्लेखनीय यश मिळवले.
 
तर महात्मानगर क्रिकेट मैदानावरील दुसर्‍या सामन्यात प्रथम फलंदाजी मिळालेल्या बीडच्या पहिल्या डावात स्टार , पुणे विरुद्ध १८९ धावा झाल्या. वेंकटेश हुरकुडेने ९५ व शौर्य जाधव ने ५२ धावा केल्या. स्टारच्या आर्यन घोडके ने ६ बळी घेतले. उत्तरदाखल स्टारने आर्यनने घोडके अष्टपैलू चमक दाखवत केलेल्या ५४ व आर्यन लोंढेच्या ४६ धावा यांच्या जोरावर १६६ पर्यंतच मजल मारल्यामुळे बीडला पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळाले. महाराष्ट्रात विविध ठिकाणी ए ते आय अशा ९ गटात एकूण ३६ संघांमध्ये सदर स्पर्धा रंगत आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor