रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 28 डिसेंबर 2022 (20:32 IST)

खेळता खेळता कॅमेऱ्याने दिली धडक; खेळाडू जखमी

खेळाच्या मैदानावरचा थरार टिपण्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे बसवलेले असतात. अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यानंतर स्पायडरकॅम विविध खेळांच्या मैदानात विहरताना दिसतो. पण या कॅमेऱ्याने खेळाडूलाच धक्का देऊन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
 
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मेलबर्न इथे बॉक्सिंग डे टेस्ट सुरू आहे. दुसऱ्या दिवशी अंतिम सत्रात खेळ सुरू असताना हा विचित्र प्रकार घडला.
 
दिवसभर भन्नाट वेगाने बॉलिंग करुन बॅट्समन्सला जेरीस आणणाऱ्या अँनरिक नॉर्कियाला चक्क स्पायडरकॅमने धडक दिली.
 
नॉर्किया बॅकवर्ड स्क्वेअर या ठिकाणी फिल्डिंग करत होता. त्यावेळी फॉक्स स्पोर्ट्स चॅनेलचा फ्लाइंग फॉक्स कॅमेरा नॉर्कियावर जाऊन आदळला.
 
या धक्क्यामुळे नॉर्किया खाली पडला. सुदैवाने तो लगेचच पुन्हा खेळण्यासाठी सज्ज झाला.
 
“मला नेमकं काय येऊन लागलं मला खरंच कळलं नाही. तूर्तास मी बरा आहे. मी फिल्डिंग पोझिशनला जात असताना डाव्या खांद्यावर काहीतरी येऊन आदळलं. माझ्या कोपरालाही लागलं.
 
कोपराच्या जागी दुखत होतं. खांदा बरा आहे. मी स्पायडरकॅमच्या तारा पाहिल्या. वळायला गेलो, माझं डोकं बाजूला करायला गेलो तेव्हा मला कॅमेरा दिसला. पण असं करायला मला उशीरच झाला. अतिशय वेगात जे काही होतं ते माझ्यावर येऊन आदळलं. मला लागलं पण मी बॉलिंग करु शकलो.
 
अचानक घडलेल्या या प्रकारानंतरही मी एकाग्रचित्ताने खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला”, असं दुखापतग्रस्त अँनरिक नॉर्कियाने सांगितलं.
 
"हा कॅमेरा खूपच खालच्या बाजूने आहे यावर आम्ही बोललो होतो. ड्रिंक्स ब्रेकवेळी खेळाडूंशी बोलण्यासाठी कॅमेरा खाली येतो. पण एरव्ही तो इतक्या खाली असण्याची आवश्यकता नाही. आमच्या उंचीएवढ्या ठिकाणी तो असायला नको. असं माझं मत आहे.
 
खेळाडूंची उंचीही लक्षात घ्यायला हवी. आमच्या संघात मार्को यान्सनची उंची सहा फूटांपेक्षा जास्त आहे. त्यालाही याचा फटका बसू शकतो", असं नॉर्किया म्हणाला.
 
दरम्यान सामन्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या फॉक्स स्पोर्ट्स कंपनीने या अपघातासाठी अँनरिक नॉर्कियाची माफी मागितली आहे. फॉक्स स्पोर्ट्सने ही ऑपरेटरची चूक असल्याचं मान्य केलं आहे.
 
या अपघातानंतर उर्वरित दिवसासाठी स्पायडरकॅम बंद ठेवण्यात आला.
 
तिसऱ्या दिवशी स्पायडरकॅम सुरू असेल. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त काळजी घेण्यात येईल असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटलं आहे.
 
स्पायडरकॅमचं नियंत्रण करणाऱ्या ऑपरेटरला टेस्टच्या उर्वरित दिवसांसाठी कामावरुन कमी केलं आहे.
 
स्पायडरकॅम काय असतो?
खेळाचं थेट प्रक्षेपण करण्यासाठी मैदानात विविध ठिकाणा कॅमेरे बसवलेले असतात. हे कॅमेरे स्टेडियमच्या विविध भागांमध्ये असतात. एकाच जागी स्थिर असे हे कॅमेरे कॅमेरामनद्वारे ऑपरेट केले जातात.
 
खेळाचा थरार आणखी जवळून न्याहाळता यावा यासाठी टेलिव्हिजन कंपन्यांनी स्पायडरकॅम वापरणं सुरु केलं. हा कॅमेरा सतत फिरता असतो. मैदानात दोन दोरखंडांनी त्याला बांधलेलं असतं.
 
मैदानात खेळ सुरु असताना डोक्यावरुन तो चित्रीकरण करतो.
 
काही चॅनेल्स मैदानात ड्रिंक्स ब्रेक असताना या कॅमेऱ्याद्वारे एखाद्या खेळाडूची छोटी मुलाखतही घेतात. त्यावेळी हा कॅमेरा खाली येतो.
 
या कॅमेऱ्याला माईकही अटॅच केलेला असतो. बॅट्समनने मारलेला फटका बाऊंड्रीपार कसा गेला हे बारकाईने हा कॅमेरा टिपतो.
 
एखादा कॅच घेण्यासाठी किंवा बॉल अडवण्यासाठी फिल्डरने घेतलेली मेहनतही तो शिताफीने टिपतो. मैदानातला एक खेळाडूच बनून हा कॅमेरा चित्रीकरण करतो.
 
मैदानात सतत फिरता असल्याने ऑपरेटरद्वारे हा कॅमेरा चालवला जातो.
 
मैदानातल्या खेळाचा अंदाज घेत रिमोट अक्सेनने याचं कामकाज चालतं.
 
याआधीही दिला आहे त्रास
स्पायडरकॅम डोक्यावर तसंच आजूबाजूला फिरत असल्याने याआधीही खेळाडूंना त्रास झाला आहे. बॉलर रनअपमध्ये असताना स्पायडरकॅम मध्येच आल्याने अनेकदा बॅट्समन खेळ थांबवतात.
 
2015 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना स्पायडरकॅममुळे स्टीव्हन स्मिथच्या हातून कॅच सुटला होता.
 
ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनच्या बॉलिंगवर भारताच्या के.एल.राहुलने मारलेला पूलचा फटका स्मिथच्या दिशेने गेला.
 
स्मिथ तो कॅच घेण्यासाठी सरसावला. पण तेवढ्यात स्पायडरकॅम मध्ये आल्याने स्मिथची एकाग्रता भंगली आणि कॅच सुटला.
 
बॉल खाली पडताक्षणी स्मिथने कॅमेऱ्याच्या दिशेने खूण केली. हा काय प्रकार आहे असंही त्याने विचारलं.
 
स्मिथ जगातल्या चपळ फिल्डर्सपैकी एक आहे. त्याच्या हातून सहजी कॅच सुटत नाही पण स्पाडयरकॅमच्या अवेळी हालचालीमुळे स्मिथच्या हातून कॅच निसटला होता.
Published By -Smita Joshi