यंदा मुंबईत रंगणार आयपीएलचा थरार, तीन मैदानात सर्व सामने होण्याची शक्यता
आयपीएलच्या 2022 च्या हंगामाची स्पर्धा ही मुंबईमध्ये रंगणार असल्याची बातमी समोर येत आहे. मुंबईमधल्या तीन स्टेडियममध्येच या हंगामाचे सर्व सामने होतील, असं सांगितलं जात आहे.
बीसीसीआयच्या सुत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार मुंबईतील वानखेडे स्टेडियम, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया म्हणजे सीसीआय आणि नवी मुंबईचं DY पाटील स्टेडियम याठिकाणी हे सामने होतील.
आणखी मैदानांवर सामने आयोजित करण्याची गरज भासल्यास पुण्यातही काही सामने आयोजित करण्याची शक्यता आहे. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळं यंदाही प्रेक्षकांविनाच ही स्पर्धा रंगणार आहे.
स्पर्धा सुरू होण्याच्या तारखबाबत अद्याप स्पष्ट माहिती नाही. यापूर्वी 2 एप्रिलपासून सामने सुरू होणार असं सांगितलं जात होतं, तर आता 27 मार्चपासून स्पर्धा सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 12 आणि 13 फेब्रुवारीला संघांसाठी खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे.