रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 25 मे 2024 (19:44 IST)

T20 वर्ल्ड कप अमेरिकेत का खेळवला जातो आहे? क्रिकेटला यानं काय फायदा होईल? वाचा

क्रिकेट म्हटलं की कुणाला लगेच यूएसए म्हणजे अमेरिकेचा संघ आठवतही नाही. पण त्याच अमेरिकेत आता ट्वेन्टी20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं जात आहे. हे का आणि कसं घडलं?
 
“क्रिकेट नावाचा काही खेळ असतो, हे इथे काही जणांना माहिती असतं, पण ते तेवढंच. मी माझ्या काही शेजाऱ्यांशी बोलत होतो. क्रिकेटच्या सगळ्या मॅचेस आजही फक्त पांढऱ्या कपड्यांमध्ये पाच दिवस खेळवल्या जातात, असंच त्यांना वाटतं...” अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये काम करणारे उत्कर्ष सांगतात.
 
त्यांच्या ऑफिसपासून जवळच वर्ल्ड ट्रेड सेंटरनजीक ट्वेन्टी 20 वर्ल्ड कपची मोठी जाहिरात लावली आहे. वर्ल्ड कपचे सामने आपल्या देशात होणार आहेत आणि आपल्याला त्यासाठी, वेळी-अवेळी उठावं लागणार नाही, याचा त्यांना आनंद वाटतो आहे.
 
उत्कर्ष यांच्यासारखे अमेरिकेतले भारतीयच नाही तर दक्षिण आशियाई आणि कॅरेबियन वंशाचे लाखो लोक या स्पर्धेची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत.
खरं तर 2021 साली आयसीसीनं पुढच्या जागतिक स्पर्धांचं वेळापत्रक जाहीर केलं आणि त्यात 2024 च्या ट्वेन्टी20 ट्वेन्टी20 वर्ल्ड कपचे सहयजमानपद यूएसए आणि वेस्ट इंडीजला बहाल केलं, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या.
कारण अमेरिकेत ना क्रिकेटच्या कायमस्वरुपी सुविधा आहेत, ना तिथे भक्कम प्रथमश्रेणी क्रिकेट आहे. जेवढं क्रिकेट खेळलं जातं, तेही तुलनेनं मर्यादित स्वरुपातच आहे.
 
मग अमेरिकन क्रिकेट संघटना USA क्रिकेटनं यजमानपदासाठी अर्ज का केला आणि आयसीसीनं त्यांचा दावा मान्य का केला? असे प्रश्न उभे राहिले.
आयसीसीनं त्या निर्णयामागचं कारण अजूनही स्पष्ट केलेलं नाही, पण क्रिकेटला नव्या देशांत, नव्या बाजारपेठेत नेणं आणि ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश करणं या तीन उद्देशांनी हा निर्णय घेतला गेला असावा.
 
आयसीसीचं त्यातलं एक उद्दिष्ट पूर्णही झालं आहे.
 
क्रिकेट, ऑलिंपिक आणि मार्केटिंग
2028 साली अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये ट्वेन्टी20 क्रिकेटचा समावेश करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीनं ऑक्टोबर 2023 मध्ये मुंबईत झालेल्या बैठकीत घेतला.
 
ऑलिंपिकमध्ये क्रिकेट यावं यासाठी आयोजकांनी दिलेली कारणं अमेरिकेत या खेळाच्या प्रसाराची क्षमता आणि शक्यता काय असू शकते, ते दाखवतात.
 
ट्वेन्टी20 क्रिकेटचा वेगवान फॉरमॅट वेगानं लोकप्रिय होतो आहे, युवावर्गात या खेळाचे मोठे चाहते आहेत. लोकसंख्येचा विचार केला तर जगात 2 अब्ज 50 कोटी लोक हा खेळ पाहतात.
 
लॉस एंजेलिस ऑलिंपिक-पॅरालिंपिक स्पर्धांचे क्रीडा संचालक निकोलो कांप्रियानी यांनी त्यावेळी विराट कोहलीचं उदाहरण दिलं होतं.
 
निकोलो सांगतात, “आजच्या घडीला विराट कोहली सोशल मीडियावरचा तिसरा सर्वांत लोकप्रिय अ‍ॅथलिट आहे. त्याचे फॉलॉओर्स जवळपास 34 कोटींहून जास्त आहे.
 
“सोशल मीडियावर लब्रॉन जेम्स, टायगर वूड्स आणि टॉम ब्रॅडी या अमेरिकेतल्या तीन सुपरस्टार्सच्या फॉलोअर्सना एकत्र केलं, तरी विराटच्या फॉलोअर्सची संख्या त्यापेक्षा मोठी आहे.”
 
अमेरिकेतले क्रीडा प्रशासक, कंपन्या आणि काही माध्यमं क्रिकेटकडे मार्केटिंगची उत्तम संधी म्हणून पाहतात, असं तिथल्या क्रिकेट प्रशासनाशी निगडीत व्यक्तींनी आम्हाला सांगितलं.
 
विशेषतः तिथे असलेल्या भारतीय आणि दक्षिण भारतीय वंशाच्या लोकांची संख्या हाही महत्त्वाच पैलू आहे.
 
आजमितीला भारतीय वंशाच्या अमेरिकन्सची संख्या 44 लाखांवर गेली असल्याचं 2020-21 च्या अमेरिकन जनगणनेची आकडेवारी सांगते.
 
दक्षिण भारतीय वंशाच्या लोकांचं लोकसंख्येतलं प्रमाण वाढतंय तसा तिथला क्रिकेटमधला रस वाढत असल्याचं चित्र दिसतं. त्यातूनच ऑलिंपिक आयोजकांना क्रिकेट भावलं असावं.
 
क्रिकेटचा लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये सहभाग व्हावा यासाठीचा दावा भक्कम करण्यासाठी स्वतः आयसीसीनंही गेल्या काही वर्षांत अनेक पावलं उचलली होती.
आयसीसीनं नव्या देशांना 'असोसिएट' म्हणून सदस्यत्व दिलं आणि अमेरिकेत क्रिकेटच्या सामन्यांची संख्या वाढवली. ट्वेन्टी20 वर्ल्ड कपचं अमेरिकेत आयोजन हाही त्याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून घेतलेला निर्णय असल्याचं काही तज्ज्ञांना वाटतं.
 
त्याशिवाय क्रिकेटसाठी नवी बाजारपेठ म्हणून आयसीसी आजवर अमेरिकेकडे पाहात आली आहे, हेही नाकारता येणार नाही.
 
क्रिकेट वेस्ट इंडीज, USA क्रिकेटची भूमिका
एकेकाळी क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या वेस्ट इंडिज टीममध्ये गेल्या दशकभरात आलेली स्थित्यंतरं तुम्हाला आठवत असतील. अमेरिकेत क्रिकेटची लोकप्रियता वाढली, तर त्याचा फायदा वेस्ट इंडीजमधल्या खेळाडूंना आणि तिथल्या क्रिकेटला होईल असं अनेकांना वाटतं.
 
या विश्वचषकाच्या आयोजनासाठी प्रस्ताव मागवण्यात आले, तेव्हा USA क्रिकेटमध्ये पराग मराठे इंडिपेंडंट डिरेक्टर म्हणून काम करत होते. त्याशिवाय आयसीसीचे माजी सीओओ इयन हिगिन्स हे तेव्हा USA क्रिकेटमध्ये सीईओ पदावर होते.
 
या दोघांचं योगदान या स्पर्धेचे काही सामने अमेरिकेत भरवण्यासाठी महत्त्वाचं मानलं जातं.
 
पण केवळ वर्ल्ड कपचं आयोजन केलं, तर एखाद्या देशात क्रिकेटचा प्रसार होईल, अशी आशा ठेवता येणार नाही. त्यासाठी खेळाची पाळंमुळं अमेरिकेत रुजावी लागतील, ज्याला बराच वेळ लागू शकतो.
 
अमेरिकेतली नवी आव्हानं
यूएसए हा देश अस्तित्वात येण्यापूर्वी अमेरिकेतही ब्रिटनची वसाहत होती आणि ब्रिटिशांसोबतच क्रिकेटही अमेरिकेत गेलं.
 
पण एकेकाळी ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारत, पाकिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंकेत किंवा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेत जसा क्रिकेटचा प्रसार झाला, तसा अमेरिकेत मात्र झाला नाही.
 
इतिहासकारांच्या मते याचं कारण म्हणजे एक तर या खेळाकडे उच्चभ्रू लोकांचा खेळ म्हणून पाहिलं जायचं आणि दुसरं म्हणजे अमेरिकेतल्या यादवीदरम्यान इथे बेसबॉलची लोकप्रियता जास्त वाढली. तेव्हा पाच दिवस खेळलं जाणारं क्रिकेट इथे तग धरू शकलं नाही.
 
ट्वेन्टी20 क्रिकेट आल्यापासून मात्र गेल्या दोन दशकांत अमेरिकेतही हा खेळ रुजवण्याचे प्रयत्न नव्यानं सुरू झाले. मात्र यात अनेक अडचणीही आल्या.
 
अगदी अलीकडे, म्हणजे 2017 साली अमेरिकन क्रिकेटवर आयसीसीनं कारवाई केली होती. त्यावेळी USACA ही संघटना अमेरिकन क्रिकेटचा कारभार पाहायची. पण 2017 साली अनियमित कारभारामुळे आयसीसीनं ही संस्था बरखास्त केली होती. त्यानंतर USA Cricket या दुसऱ्या संस्थेची स्थापना करण्यात आली.
 
मात्र 2021 साली पुन्हा एकदा या संघटनेमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाले. पराग मराठे आणि इयन हिगिन्स या दोघांनी त्यानंतर राजीनामे दिले.
आयपीएल आणि बेसबॉलच्या लीगच्या धर्तीवर अमेरिकेत मेजर लीग क्रिकेटचं आयोजन करण्यात आलं होतं, पण त्यावरूनही वाद झाला.
 
प्रशासकीय अडचणींपलीकडेही समस्या आहेतच. या देशात क्रिकेटचं पुरेसं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं नाही. अगदी अबूधाबी, दुबई आणि शारजामध्येही क्रिकेट स्टेडियम्स आहेत. पण अमेरिकेत तसं नाही.
 
ट्वेन्टी20 वर्ल्ड कपचे सामने जिथे भरवले जात आहेत, ते फ्लोरिडातलं सेंट्रल ब्रोवार्ड पार्क आणि टेक्सासचं ग्रँड प्रायरी स्टेडियम यांचा वापर केला जातो. तर नासॉ कौंटीत मोड्यूलर स्टेडियमचा प्रयोग केला आहे.
 
सोयीसुविधा उभारल्या, तरी मुळात स्थानिक लोकांमध्ये क्रिकेट रुजवणं हे सर्वात मोठं आव्हान आहे.
 
न्यूयॉर्कमध्ये राहणारी समाजकार्यातली संशोधक कृशिका सांगते, “माझ्या आसपासचे दक्षिण आशियाई लोक सोडले, तर बहुतेकांना क्रिकेटविषयी फार माहिती नाही. मी त्यांना क्रिकेटविषयी सांगताना बेसबॉलमधली उदाहरणं देते.
 
“ट्वेन्टी20 वर्ल्ड कपमुळे अमेरिकेत क्रिकेट रुजण्यास मदत होऊ शकते, पण मला याची पुरेशी खात्री वाटतत नाही. अमेरिकेत खेळ हे देशाभोवती नाही तर राज्यांभोवती केंद्रित आहेत. अपवाद फक्त ऑलिंपिकचा.”
 
अमेरिकन संघात सध्या दक्षिण आशियाई आणि कॅरिबियन वंशाच्या तसंच स्थलांतरित खेळाडूंचं प्रमाण जास्त आहे. पण ट्वेन्टी20 वर्ल्ड कप आणि चार वर्षांनी ऑलिंपिकमध्ये होणारी क्रिकेट स्पर्धा हे चित्र बदलेल अशी आशा तिथल्या चाहत्यांना वाटते आहे.

Published By- Priya Dixit