1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मे 2024 (17:58 IST)

टी-20 विश्वचषकानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक बदलणार? बीसीसीआयने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले

टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियामध्ये मोठा बदल होणार असून बीसीसीआय ने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले आहे. सोमवारी बीसीसीआयने एक्स वर ही माहिती दिली. बोर्डाचे सचिव जय शाह यांनी टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळेल. असे विधान केले होते. 

या पदासाठी राहुल द्रविड पुन्हा अर्ज करणार की नाही हे पाहावे लागणार आहे. त्यांनी अर्ज केले नाही तर भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळेल.गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकानंतर द्रविडचा करार संपला होता. मात्र, त्यानंतर बीसीसीआयने त्याच्याशी बोलून त्याला या वर्षीच्या टी-20 विश्वचषकापर्यंत आपल्या पदावर कायम राहण्यास सांगितले. 
 
टीम इंडिया नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा खेळणार असल्याचे बोर्डाने सांगितले. ख्य प्रशिक्षकपदासाठी 27 मे रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करता येतील. निवड प्रक्रियेमध्ये अर्जांचे सखोल पुनरावलोकन, त्यानंतर मुलाखती आणि निवडलेल्या उमेदवारांचे मूल्यांकन यांचा समावेश असेल. नवीन मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ 3.5 वर्षांचा असेल. ते 1 जुलै 2024 पासून सुरू होईल आणि 31 डिसेंबर 2027 रोजी संपेल. म्हणजेच नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 आणि 2027 च्या फायनल, T20 वर्ल्ड कप 2026 आणि एकदिवसीय वर्ल्ड कप 2027 खेळणार आहे.
 
यशस्वी उमेदवार जागतिक दर्जाचा भारतीय क्रिकेट संघ विकसित करण्यासाठी जबाबदार असेल. खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय पुरुष संघाची चांगली कामगिरी आणि व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी मुख्य प्रशिक्षकावर असेल. मुख्य प्रशिक्षक तज्ञ प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफच्या टीमचे नेतृत्व करेल आणि प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यासाठी जबाबदार असेल.  भारतीय पुरुष संघातील शिस्तबद्ध नियमांचे पुनरावलोकन, देखभाल आणि अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य प्रशिक्षक जबाबदार असेल.
 
पात्रता:
मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने किमान 30 कसोटी सामने किंवा 50 एकदिवसीय सामने खेळलेले असावेत. किंवा त्याला पूर्ण सदस्य असलेल्या कसोटी खेळणाऱ्या राष्ट्राचा मुख्य प्रशिक्षक म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव असावा. किंवा आयपीएल संघाचा असोसिएट सदस्य/मुख्य प्रशिक्षक किंवा समतुल्य आंतरराष्ट्रीय लीग/प्रथम-श्रेणी संघ/राष्ट्रीय अ संघांचे प्रशिक्षक म्हणून किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. किंवा अर्जदाराने बीसीसीआय लेव्हल 3 प्रमाणपत्र किंवा कोणतीही समकक्ष पदवी प्राप्त केलेली असावी. अर्जदाराचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असावे.
 
 बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले होते की, जर द्रविडला टी-20 विश्वचषकानंतरही पदावर राहायचे असेल तर त्यांना  पुन्हा अर्ज करावा लागेल. जय शाह म्हणाले होते, 'राहुल द्रविडचा कार्यकाळ संपत आहे. त्यांना या पदावर कायम राहायचे असल्यास त्यांना पुन्हा अर्ज करावा लागेल.द्रविडने नुकतेच सांगितले होते की तो त्याच्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. द्रविडची दोन्ही मुलंही क्रिकेट खेळतात आणि अशा परिस्थितीत द्रविडला काही वेळ कुटुंबासोबत घालवायला आवडेल.

Edited by - Priya Dixit