कासवाच्या पोटातून काढली 915 नाणी
नदीत किंवा कारंज्यात नाणी टाकणे, हा अनेकांच्या श्रद्धेचा भाग असतो. मात्र अशाच श्रद्धेतून थायलंडमधील एका कासवावर बाका प्रसंग गुजरला. अखेर डॉक्टरांना त्याच्यावर शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातून शेकडो नाणी काढावी लागली.
बँगकॉकमधील पशूवैद्यकीय शल्यचिकीत्सकांनी सोमवारी या मादी कासवावर शस्त्रक्रिया केली. तिचे नाव बँक असे असून ती 25 वर्षांची आहे. थायलंडच्या पूर्वेकडील श्री राचा या शहरातील एका प्राणी संग्रहालयात ही मादी कासव होती. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांनी तिच्या पाणवठ्यात टाकलेले नाणे ती गिळत होती. त्यामुळे ती सगळी नाणी तिच्या पोटात जमा झाली होती.
कासवावर नाणी टाकल्याने नशीब उजळते, अशी थायलंडच्या नागरिकांची श्रद्धा आहे.
या नाण्यांचा बँकच्या पोटात गोळा झाला. त्याचे वजन 5 किलो एवढे होते. त्यामुळे तिच्या घशातील अस्तराला चीर पडली होती. त्यात तिचा जीव जाण्याचाही संभव होता. त्यामुळे चुलालोंगकॉम युनिव्हर्सिटीच्या पशुवैद्यकांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली. त्यासाठी डॉक्टरांनी 10 सेमीची चीर केली होती. मात्र त्यातून सगळी नाणी काढणे शक्य नसल्यामुळे एक-एक करून ती काढावी लागली. त्यातील अनेक नाणी गंजली किंवा वितळून गेली होती.
नाण्यांशिवाय तिच्या पोटातून डॉक्टरांनी माशांचे दोन गळही काढले. थायलंडच्या माध्यमात गेल्या महिन्यात बँकची माहिती आली होती. त्यानंतर लोकांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी 15,000 बाहट (428) गोळा केले होते.