शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (20:43 IST)

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या व्यक्तिकेंद्रित राजकारणाशी भाजपची तुलना करणे चुकीचेच

राष्ट्रवादी काँग्रेस अजून किती दिवस पवारांचे नाव चालवून राजकारण करणार? असा सवाल तीन दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाआघाडी सरकारमधील मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्याचे वृत्त आले होते. हे वृत्त बघून मी काँग्रेस अजून किती काळ नेहरु-गांधी घराण्याचा आधार घेऊन राजकारण करणार असा प्रतिप्रश्व करणारी पोस्ट समाज माध्यमावर व्हायरल केली. त्यावर मुंबई स्थित एका पत्रकार मित्राने मला प्रतिप्रश्न केला की भाजपही अजून किती काळ मोदी आणि शहा यांचा आधार घेऊन पुढे जाणार आहे?
 
या संवादाङ्कुळेच या विषयावर घ्या समजून राजेहो लिहावे अशी आज इच्छा झालेली आहे. काँग्रेसचा विचार करायचा झाल्यास देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशभरात एकमेव प्रमुख पक्ष असलेली काँग्रेस ही केवळ नेहरु आणि गांधी घराण्याच्या नावावरच राजकारण करत आलेली आहे. प्रत्येक निवडणूकीत पं. जवाहरलाल नेहरु हाच मुख्य चेहरा म्हणून समोर आणला जात होता. नेहरूंच्या निधनानंतर त्यांची कन्या इंदिरा गांधी यांचा चेहरा पक्षाने समोर केला. परिणामी देशात लोकशाही असली तरी काँग्रेसमध्ये मात्र एकाधिकारशाहीच आहे असा आरोप राजकीय अभ्यासक करत होते. नेहरुंच्या काळात त्यांचा शब्द पक्षात अंतिम मानला जात होता. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी स्वतंत्र देशाचा पंतप्रधान कोण असावा यावर काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये मतदान झाले. त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव बहुमताने निवडले गेले. तरीही नेहरुंजींच्या आग्रहामुळे सरदार पटेलांना नाकारत नेहरुंना पंतप्रधान करावे असा निर्णय महात्मा गांधींनी घेतल्याच्या नोंदी तत्कालिन इतिहासात सापडतात. हे बघता एकाधिकारशाही किती आणि कशी होती हे लक्षात येते.
 
नेहरु असेपर्यंत काँग्रेसमधील सर्व ज्येष्ठ हे नेहरुंना दबून होते. नंतर मात्र परिस्थिती बदलली. इंदिरा गांधी पंतप्रधान असल्या तरी पक्षाध्यक्षाचा दर्जा मोठा आहे हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न झाला. तिथेच तत्कालिन पक्षाध्यक्ष निजलिंगगप्पा आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यात संघर्ष उद्भवला. त्याचे पर्यवसान इंदिरा गांधींना पक्षातून निष्कासित करण्यात झाले. त्यावेळी मास्टर बहुसंख्य काँग्रेसजनांनी इंदिरा गांधींची साथ दिली. परिणामी एकसंघ कांग्रेसचे संघटन काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस असे दोन तुकडे झाले. हाच प्रकार १९७७ मध्येही झाला.
 
इंदिरा गांधींच्या आकस्मिक मृत्यूनंतर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्याला सूत्रे देण्याची परंपरा समोर मंडळी गेली. मात्र त्यावेळी काँग्रेसमध्ये गांधी घराण्याला पर्याय नाही असे म्हणणारा गट पुढे आला आणि काहीही अनुभव नसलेल्या राजीव गांधींना पंतप्रधान केले. राजीवजींच्या हत्येनंतर त्यांच्या विधवा पत्नी सोनियाजी गांधी यांनाही घोड्यावर बसवण्याचा प्रयत्न झाला. १९९१ पासून १९९७ पर्यंत सोनियाजी राजकारणापासून दूर राहिल्या. मात्र ९८ मध्ये त्यांना पुन्हा राजकारणात आणले गेले. त्यांच्यापाठोपाठ त्यांचे चिरंजीव राहूल गांधी यांनाही राजकारणात सक्रिय केले. आता तर राहूलच्या भगिनी प्रियांका वढेरा-गांधी यांनाही राजकारणात सक्रिय केले गेले आहे.
 
ही वाटचाल बघता काँग्रेसमध्ये नेहरु-गांधी परिवाराव्यतिरिक्त दुसरा कुणी नेता नाही काय असा प्रश्न निर्माण होतो. काँग्रेसचा सव्वाशे वर्षापेक्षा अधिक कालावधीचा प्रवास बघता या पक्षात अनेक मान्यवर नेते कार्यरत होते. मात्र त्यातील कोणताही नेता पक्षाला सक्षम नेतृत्व देण्यास का पुढे आला नाही असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. याचे उत्तर शोधायचे झाल्यास स्वातंत्र्योत्तर काळात नेहरु-गांधी परिवाराने पक्षावर जी पकड जमवली तिच्यात सापडते. त्या काळात नेहरु-गांधी परिवाराकडे काँग्रेसची आणि देशाची अर्निबंध सत्ता होती. त्यामुळे नेहरु-गांधी परिवार हाच देशाचा खरा तारणहार आहे असा आभास निर्माण करण्यास हे घराणे यशस्वी ठरले. परिणामी देशातील जनसामान्य अनेक वर्ष या आभासाला भूलत गेले. त्यातही पक्षातील गांधी-नेहरु परिवाराचे अंकित असणारे नेते हा आभास वाढता कसा राहील याची पद्धतशीर काळजी घेत गेले. गांधी-नेहरु परिवाराचा हा करिष्मा १९९५-९६ पर्यंत कायम होता. नंतर मात्र परिस्थिती बदलली. १९९६ नंतर काँग्रेसला इतरांच्या सत्तेला बाहेरुन पाठिंबा द्यावा लागला किंवा मग २००४ नंतर आघाडी करून सत्ता मिळवावी लागली. २०१४ पासून काँग्रेसला दोन आकड्यात आपले लोकसभेतील सदस्यत्व सांभाळावे लागते आहे. त्यातही ५०-५५ च्या आसपासच त्यांची गाडी थांबते आहे.
 
असे असले तरी पक्षातील एक वर्ग आजही पक्षाची सत्ता नेहर-गांधी परिवाराकडेच राहावी यासाठी आग्रही आहे. मध्यंतरी  काँग्रेसमधल्या काही ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी आग्रह धरला. मात्र त्यांना पक्षात एकाकी पाडले गेले.
 
काँग्रेसच्या या घराणेशाहीमुळेच गेल्या ५० वर्षांहून अधिक काळात अनेक दिग्गज काँग्रेसजन पक्ष सोडून जात आपला नवा पक्ष स्थापन करते झाले आहेत. त्यात अगदी सुरुवातीचे मोरारजी देसाई यांच्या पासून तर आजच्या ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत अनेक नावे सांगता येतील.  
 
काँग्रेसची आजची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. एका काळात संपूर्ण देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसला आज फक्त तीन राज्यात सत्ता राखता आली आहे. लोकसभेत ६० पेक्षा कमी खासदार घेऊन बसावे लागत आहे. तरीही पक्षाला नवा चेहरा मिळावा असा विचार ज्येष्ठ नेते कुणीच करत नाही. आजही बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्या सारखे नेते सोनियाजी आणि राहूलजींच्या नावाने निवडणूक लढवायची असे म्हणत रिंगणात उतरतात हे या पक्षाचे आणि पक्षातील कार्यकर्त्यांचे दुर्दैव म्हणावेच लागेल.
 
आता प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्माण होतो. राष्ट्रवादी काँग्रेस ही मुळातच काँग्रेस संस्कृतीतून पुढे आलेली संघटना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे मूळचे काँग्रेसचे नेते त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून १९७८ साली काँग्रेस सोडली. नंतर समाजवादी काँग्रेस या पक्षाच्या आधारे १० वर्ष राजकारण केले. १९८७ मध्ये ही समाजवादी काँग्रेस त्यांनी मूळ काँग्रेसमध्ये विलीन केली. नंतर १९९९ साली पंतप्रधानपदाचे स्वप्न बघत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. मात्र १० वर्ष केंद्रात कृषिमंत्रिपद घेऊन स्वस्थ बसावे लागले. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व आज महाराष्ट्राबाहेर कुठेही नाही. महाराष्ट्रातही पश्चिम महाराष्ट्राचा भाग सोडला तर पवारांचे फारसे वर्चस्व नाही. या पक्षात शरद पवार त्यांचे पुतणे अजित, मुलगी सुप्रिया आणि पार्थ तसेच रोहित हे दोन नातू हेच खरे चेहरे मानले जातात. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यावर शरद पवारांच्याच नावावर निवडणूका लढवल्या जात होत्या त्यांच्या सोबतीला अजितदादा होते. आज देखील तिच परिस्थिती आहे. २००७-०८ या कालखंडात सुप्रिया सुळे राजकारणात आल्या आणि त्याही पक्षातील सत्ता केंद्र बनल्या. म्हणजेच पवार घराण्यातील प्रमुख लोकच हा पक्ष चालवतात आणि त्यांच्या नावावरच मतदार मते देतात. अशी परिस्थिती आहे. आज महाराष्ट्राच्या विधानसभेतही पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ जागा आहेत. या पूर्वीही पक्षाच्या स्थापनेनंतर ७०-७५ च्या वर कधी राष्ट्रवादी काँग्रेस गेल्याचा दाखला नाही. मात्र तोडजोड करुन ते सत्तेत येतात आणि सत्तेची वैध अवैध मार्गाने फळे चाखत राहतात. बाळासाहेब थोरातांनी म्हटले त्याप्रमाणे पक्षाचे राजकारण हे पवारांच्याच नावावर चालते हे वास्तव कधीही नाकारता येणार नाही.
 
आता प्रश्न येतो भारतीय जनता पक्षाचा. भारतीय जनता पक्ष हा आजवर तरी कोणत्याही घराण्याचा पक्ष म्हणून ओळखला गेला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पडद्यामागचे पाठबळ असलेला हा पक्ष व्यक्तीकेंद्रीत नाही हे निश्चित. भाजपची स्थापना १९८० मध्ये झाली. त्या आधी १९५२ मध्ये संघ विचाराच्या मंडळींनी एकत्र येऊन भारतीय जनसंघ स्थापन केला होता. हा भारतीय जनसंघ 1977 मध्ये तत्कालिन जनता पक्षात विलिन केला होता. मात्र जनता पक्षातील समाजवाद्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विटाळ होत असल्याने तीन वर्षानंतर जुन्या जनसंघाची मंडळी वेगळी निघाली आणि त्यांनी भारतीय जनता पक्ष स्थापना केला. तेव्हापासून भाजपमध्ये सामूहिक नेतृत्वावर जास्त भर दिला गेला असल्याचे दिसून येते. सुरुवातीच्या काळात अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे प्रमुख चेहरे होते. वाजपेयी पंतप्रधान बनू शकले नंतर अडवाणींना पंतप्रधानपदी विराजमान करण्याचे स्वप्न होते. मात्र ते साध्य झाले नाही. तेव्हा पक्षाने नरेंद्र दामोदरदास मोदी हा नवा चेहरा समोर आणला. त्या आधी मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपले कर्तृत्व सिद्ध केले होते. ज्या वेळी मोदींचे नाव निश्चित झाले त्या वेळी भाजपजवळ राजनाथसिंह, मनोहर पर्रिकर, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी अशी काही वजनदार नावेही मैदानात तयार होती. त्यातील मोदींना निवडून पंतप्रधानपदाची जबाबदारी दिली गेली. आपले विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी अमित शहा यांना सोबत आणले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जोडगळी गत सात वर्षांपासून भाजपच्या राजकारणात महत्त्वाचा चेहरा म्हणून कार्यरत आहे.
 
असे असले तरी हे दोन्ही चेहरे काही कायम स्वरुपी भाजपचे प्रभावी चेहरे म्हणून राहतील असे नाही. तसाही विचार करता काँग्रेसची ७० वर्षे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची २२ वर्षे या तुलनेत भाजपची ७ वर्षे हा काही फार मोठा कालावधी नाही. तरीही भाजपला विरोध करायचाच असे ठरवून कामाला गलेल्या मंडळींना तेवढे एक कारण निश्चित सापडते हे वास्तव नाकारता येत नाही.
 
भारतीय जनता पक्ष किंवा ज्या संघटनेच्या आधाराने भाजप वाढतो आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी कधीही घराणेशाहीला किंवा व्यक्तीपूजनाला स्थान दिलेले नाही. व्यक्ती पेक्षा विचारांना महत्त्व देणारी संघटना म्हणून संघ ओळखला गेला आहे. त्यामुळे मोदी-करिष्मा पक्षात दिर्घकाळ चालेल असे आजतरी वाटत नाही. मोदींचा चेहरा वापरून भाजपला सत्ता मिळाली हे वास्तव नाकारता येत नाही. मात्र मिळालेल्या संधीचे सोने करत भाजप आपला जनाधर प्रस्थापित करताना दिसतो आहे. त्यामुळे मोदी असोत किंवा नसोत भाजपचा जनाधार कायम राहू शकेल असे राजकीय अभ्यासाकांचे ठाम मत झाले आहे.
 
या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यक्ती केंद्रीत राजकारणाची तुलना भाजपशी करणे हे चुकीचेच आहे. मात्र आपल्या देशात संघ आणि भाजपची कावीळ झालेला फार मोठा वर्ग सक्रिय आहे. ते अशी तुलना करत राहणारच मात्र त्याने फारसे काही सध्या होईल असे आज तरी वाटत नाही.
 
तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो....
 
ता.क. :  घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.
 
अविनाश पाठक