बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (09:49 IST)

लाला लजपतराय जयंती विशेष

शेर.ए.पंजाब या उपाधीने सन्मानित लाला लजपत राय यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्यात आपली महत्वपुर्ण भुमिका बजावली. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील लाल – बाल – पाल या तीन प्रमुख नायकांपैकी ते एक होते. लाला लजपतराय निस्सिम देशभक्त, शुर स्वातंत्र्य सैनिक आणि एक चांगले नेता तर होतेच तसेच ते एक उत्तम लेखक, वकील, समाज – सुधारक आणि आर्य समाजी देखील होते.
 
लाला लजपत राय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 ला धुडिके या गावी एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री राधाकृष्ण जी आणि आईचे नाव श्रीमती गुलाब देवी जी असे होते. त्यांचे वडिल सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते. लालाजींच्या परिवारातील संस्कारांनीच त्यांना देशभक्तीच्या कार्याची प्रेरणा दिली होती.
 
शालेय शिक्षण पुर्ण केल्यानंतर 1880 साली कायद्याचे शिक्षण घेण्याकरीता लाहौर येथे सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि पदवी मिळवली. काही काळ त्यांनी वकीली देखील केली पण नंतर बॅंकिंग क्षेत्राकडे आपला मोर्चा वळविला. लाला लजपत रायांनी राष्ट्रीय कांग्रेस च्या 1888 आणि 1889 या वार्षिक सत्रा दरम्यान प्रतिनीधी म्हणुन सहभाग घेतला, पुढे 1892 साली न्यायालयात सराव करण्याकरीता ते लाहौर येथे गेले. या ठिकाणी त्यांनी पंजाब नॅशनल बॅंक व लक्ष्मी विमा कंपनी ची पायाभरणी केली. 1905 मधे ज्यावेळी बंगाल चे विभाजन करण्यात आले त्याचा त्यांनी कडाडुन विरोध केला आणि या आंदोलनात हिरीरीने सहभाग घेतला.
 
लाला लजपत राय हे 1882 साली पहिल्यांदा आर्य समाजाच्या लाहौर वार्षिक उत्सवामधे सहभागी झाले आणि त्यांनी आर्य समाजात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. 1920 साली त्यांना नॅशनल कांग्रेस चे प्रेसिडेंट म्हणुन नियुक्त करण्यात आले.
 
ब्रिटीश सरकार विरूध्द शक्तिशाली भाषण देत त्यांना हादरवुन सोडणारे लाला लजपतराय यांच्या देशाप्रती असलेल्या देशभक्ती आणि निष्ठेला पाहाता त्यांना ’पंजाब केसरी’ आणि ‘पंजाब चा सिंह’ देखील म्हंटल्या जाते.
 
गुलामगिरीत असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरीता लाला लजपतराय यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जोरदार संघर्ष केला आणि शहीद झाले.