शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (08:25 IST)

स्ट्रेस मॅनेजमेंट शिका

अलीकडे आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली बघायला मिळते. त्यातल्या बर्‍याच घटनांमध्ये कौटुंबिक कलह, ताणतणाव ही कारणं प्रामुख्याने बघायला मिळतात. त्यामुळेच सर्व उपाय संपल्याची अगतिकता, मनात सतत घोळणारी नकारात्मकता, ध्येयहिनता या मनाचं खधीकरण करणार्‍या भावभावनांचा गांभीर्याने विचार करणंगरजेचं आहे. यातली पहिली बाब म्हणजे नैराश्यासारख्या मानसिक आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीच्या मनात सकारात्मक विचार येणं खूप कठीण असतं. कारण या अथवा चिंतेसारख्या आजाराच्या प्रभावामुळे माणसाच्या मनात केवळ निराशाजनक विचारच येत असतात. साहजिकच, मनाची क्षमता चांगली असली तरी तो आजार नाहीसा होत नाही तोपर्यंत संबंधित व्यक्ती सकारात्मक दृष्टिकोन अंगिकारू शकत नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार दर पाच माणसांमधल्या एका माणसाला आयुष्यात कधी ना कधी निराशेचा आजार ग्रासतो. त्यामुळेच या आजारांप्रती सजग होणं ही मनात सकारात्मकता असण्याच्या दृष्टीने सर्वात आवश्यक बाब आहे. या मुदकडे लक्ष दिलं नाही तर मनात सकारात्मक विचार का येत नाहीत, या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळू शकणार नाही. 
 
एखाद्याचा पाय मोडला असेल तर कितीही इच्छा असली तरी तो चालू शकत नाही. त्याचप्रमाणे मन नैराश्य आणि चिंतेच्या आजाराने ग्रासलेलं असल्यास कितीही इच्छा असूनही संबंधित माणूस सकारात्मकतेने आयुष्याकडे बघू शकत नाही. म्हणूनच आधी मनावरील फ्रॅक्चरवर उपचार घेणं गरजेचं ठरतं. बरेचदा जवळच्या व्यक्तीपाशी निराशादायक विचार व्यक्त करुनही मनाच्या यारोगावर इलाज होऊ शकतो. पण आजार अधिक गंभीर असेल तर मानसोपचार तज्ज्ञांची गरज घेणं हा अधिक परिणामकारक उपाय ठरतो. प्रत्येक वेळी आपण स्वतः अथवा परिचित आपल्याला सकारात्मकतेपर्यंत नेऊ शकत नसल्यामुळे मानसिक आजार बरे करणार्‍या या तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि उपचार अत्यंत उपयोगी ठरतात. शीतल आमटे यांना हे माहीत नसेल असं समजणं अयोग्य होईल. पण तरीदेखील त्याकडे कानाडोळा केल्यामुळेच कदाचित त्यांचं नैराश्य वाढलं असावं.
 
या निमित्ताने हेदेखील लक्षात घ्यायला हवं की आपल्या दैनंदिन जीवनात येणारे ताणतणाव हे सकारात्मकतेच्या वाटेत अडसर आणणारे दुसरे मोठे शत्रू असतात. आजकाल आपणा सगळ्यांच्याच आयुष्यात या शत्रूंचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे आभाळ भरुन आलं असताना आपल्याला सूर्यप्रकाश मिळू शकत नाही त्याचप्रमाणे मनाचं आभाळ भरुन आलेल्या अवस्थेत सकारात्मक विचारही निर्माण होऊ शकत नाहीत. इतकंच नव्हे, तर आजूबाजूला कितीही सकारात्मक परिस्थिती असली तरी अशा झाकोळलेल्या मनामध्ये त्याचं प्रतिबिंब उमटू शकत नाही. मनावर दाटलेल्या काळ्या, नकारात्मक विचारांचे ढग त्यांच्या मार्गात मोठा अडथळा उत्पन्न करतात. अशा वेळी तो ताण योग्य पद्धतीने हाताळल्याखेरीज नकारात्मकता कमी होत नाही. म्हणूनच मनाची सकारात्मकता टिकवण्यासाठी या दोन शत्रूंचा सामना करुन विजय मिळवणं ही अत्यावश्यक बाब ठरते.
नितीन शिंदे