मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : मंगळवार, 9 मे 2023 (11:38 IST)

Maharana Pratap महाराणा प्रतापची संघर्षमय जीवनगाथा..

Maharana Pratap
महाराणा प्रतापसिंह यांचा जन्म ९ मे इ.स.१५४० रोजी उदयपूरचे संस्थापक उदयसिंह द्वितीय आणि महाराणी जयवंता बाई यांच्या घरी कुंभलगड येथे झाला. महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील हिंदू पराक्रमी राजपूत होते.
 
तो महाराणा झाला त्यावेळी राजधानी चितोड शत्रूच्या हातात गेली होती. अनेक राजपूत अधिपतींनी अकबराचे स्वामित्व पतकरले होते व काहींनी आपल्या मुली त्यास देऊन शरीरसंबंध जोडला होता; पण राणाप्रतापने त्याच्यापुढे मान लवविली नाही. त्याने चितोड अकबराच्या हातून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आपले वास्तव्य अकबराच्या सैन्याच्या दृष्टिक्षेपापासून दूर ठिकाणी केले.
 
उदयसिंह रणवीर आनोसे दुसरे यांच्या चित्तोड राज्यावर मुघल सम्राट अकबर चाल करून आला. या हल्ल्यात राजे उदयसिंह आणि मेवाडचे राजघराणे किल्ल्यावर शत्रूला ताबा मिळण्याआधी निसटले. उदयसिंह यांनी १५५९ मध्ये उदयपूर शहराची स्थापना केली. महाराज उदयसिंह आणि त्यांची सर्वात प्रिय राणी भातियानी यांचा मुलगा जगमल याने त्यांच्या नंतर राज्यकारभार सांभाळावा अशी महाराजा उदयसिंह यांची इच्छा होती, पण राजे उदयसिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांचा ज्येष्ठ पुत्र प्रताप याने परंपरेनुसार राज्य कारभार सांभाळावा अशी सर्व वरिष्ठ मंत्र्यांची इच्छा होती. प्रताप यांच्या राज्याभिषेकाआधी मुख्यमंत्री चुंदावट आणि तोमर रामशाह यानी जगमलला राजवाड्याबाहेर घालवून दिले आणि प्रताप यांस मेवाडचा राजा म्हणून घोषित केले. प्रताप यांची त्यांच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध राजा होण्याची तयारी नव्हती पण राज्यातील मंत्र्यानी जगमल हा राज्य करण्यास असमर्थ असल्याचे प्रताप यांस पटवून दिले.
 
२१ जून १५७६ रोजी हळदीघाटच्या घनघोर लढाईत प्रतापसिंहाचा पराजय झाला, तरी तो तीतून निसटला आणि राजस्थानच्या दऱ्याखोऱ्यांतून त्याने मोगलांशी गनिमी काव्याने संघर्ष चालू ठेवला. त्यांच्या रसदा तोडल्या, खजिने लुटले. अकबर स्वतः त्याच्यावर चालून गेला पण त्याला प्रतापला न जिंकताच परत फिरावे लागले. त्याची पाठ वळताच प्रतापने आपले गेलेले सर्व किल्ले परत मिळविले. यानंतर त्याने पुढे १२ वर्षे शांततेने राज्य केले. ह्यावेळी अकबर हा पंजाब व दक्षिण भारत ह्या दोन ठिकाणी आपली सत्ता स्थिर करण्याच्या बेतात होता. त्यामुळे त्याने पुढे प्रतापकडे लक्ष दिले नसावे.
 
राणाप्रतापास परचक्राची फार चिंता होती. म्हणून त्याने आपल्या सरदारांकडून तुर्कांपासून आपल्या देशाचे रक्षण करण्याचे प्रथम वचन घेऊन नंतर आपल्या अमरसिंह ह्या पुत्राच्या हाती राज्य सोपविले व प्राण सोडला. अकबरानेही त्याची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. कर्नल टॉड म्हणतो, ‘प्रतापचे नाव अजूनही पूज्य मानले जाते आणि पुढेही एखाद्या नवीन जुलमी राजसत्तेकडून राजपुतांत शिल्लक असलेली देशाभिमानाची ठिणगी विझेपर्यंत ते नाव पूज्यच मानले जाईल.’
 
महाराणा प्रताप म्हणजे असे योद्धा होते ज्यांनी कधीही मुघलांच्या समोर गुडघे टेकले नाहीत. त्यांची संघर्षमय जीवनगाथा ही इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदली गेली.