शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : शनिवार, 20 मे 2023 (08:21 IST)

मल्हारराव होळकर पुण्यतिथी विशेष : श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर ,जिगरबाज मराठा योद्धा

मल्हाररावांचा जन्म 16मार्च 1693 रोजी झाला. मल्हाररावांचा जन्म भटक्या धनगर मेंढपाळ कुटुंबातला होता. त्यांच्या वडिलांचा, खंडोजी वीरकर चौगुला यांचा, अशाच भटकंतीत पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातील होळ या गावी मुक्काम पडला होता. या गावी तांड्याचा मुक्काम असतानाच मल्हाररावांचा जन्म झाला.पुणे नजीकचं ‘होळ’. या गावावरून त्यांना होळकर हे नाव मिळालं. ते लहान असताना खंडुजीचा मृत्यू झाला. त्यांनी आपल्या आईसह सुलतानपूर परगण्यातील तळोदे येथे भोजराज बारगळ या मामाकडे आश्रय घेतला.

लहानपणापासून धोरणी, मुत्सद्दी व शिवरायांच्या गनिमी काव्याला अंगीकार करणाऱ्यांचे गुण त्यांच्यात होते. धनगर कुटुंबात जन्मलेले मल्हारराव हे कोणत्याही घराणेशाहीचा आधार न घेता आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठेशाहीचे आधारस्तंभ बनले. 
 
मल्हाररावांनी दाभाड्यांचा एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या पेंढारी टोळीतून आपली कारकीर्द सुरू केली. शिपाईगिरी करीत असताना तरुण बाजीराव पेशवे यांच्याबरोबर त्यांची खास मैत्री जुळून आली आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर इसवी सन 1729 च्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली.
 
1728 ची निजामाबरोबरची महत्वाची लढाई असो किंवा1737 ची दिल्लीची लढाई असो, तसेच 1738 सालची भोपाळची लढाई असो मल्हाररावांची प्रामुख्याची भूमिका होती. याच काळात इंदोरची रियासत होळकर घराण्याकडे आली.
 
भोजराजमामांची मुलगी गौतमी हिच्या बरोबर मल्हाररावांचा विवाह झाला आणि त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात आले. जेजुरीचा खंडेरायाच्या कृपादृष्टीमुळेच आपली प्रगती झाली असल्याची मल्हाररावांची धारणा होती, त्यामुळेच त्यांनी सुभेदारी मिळाल्याबरोबर जेजुरीला कुलोपाध्ये नेमले. मंदिराचे बांधकाम केले. 
 
उत्तरोत्तर मल्हाररावांची प्रगती होत होती, राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांच्यासोबत माळव्याची सुभेदारी समर्थपणे सांभाळीत होते. गनिमीकावा आणि मुत्सदेगीरीच्या जोरावर, उत्तर हिंदुस्थानातील राजकारणामध्ये मल्हाररावांचा मोठा दबदबा झाला होता. इसवी सन1733 मध्ये चौंडीच्या माणकोजी शिंदे यांची कन्या

अहिल्याबरोबर पुत्र खंडेरावचा विवाह लावून देण्यात आला. 17 मार्च 1754मध्ये कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला असताना भर दुपारी खंडेराव छावणीतून बाहेर पडले आणि किल्ल्यावरून सोडलेल्या तोफेचा गोळा लागून त्यांना वीरमरण प्राप्त झाले. अहिल्याबाई सती जाण्यास निघाली असताना मल्हाररावांना तिचा विचार बदलण्यात यश आले.
 
मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे हे आरंभी जिवलग मित्र होते. उत्तर हिंदुस्तान या दोघांनी गाजवून सोडला. जयाजी शिंदेंचा बिजोसिंगने केलेला खून आणि कुंभेरच्या लढ्यात खंडेराव होळकरांचा झालेला अपघाती मृत्यू या प्रकरणांमुळे शिंदे-होळकरांत जरी वैमनस्य निर्माण झाले. त्यांनी मराठी साम्राज्याच्या हितासाठी शिंदेंशी पुन्हा मैत्री करण्याचा प्रयत्न केला. 
 
16 जानेवारी 1761 साली पानिपतची लढाई झाली. त्या दिवशी खऱ्या अर्थाने संक्रांत कोसळली. या महत्वाच्या लढाईत मल्हारराव पळून गेल्याचा आरोप त्यांच्यावर अनेकांनी केला याया आरोपाबरोबर त्यांच्यावर आणखी एक आरोप केला जातो तो म्हणजे ज्या नजीब खानाने अहमदशहा अब्दालीला भारतात बोलावलं आणि पानिपत युद्द्ध घडलं.
पराभवाचे शल्य मनामध्ये बोचत असतानाच, आणखी एक दुःखद धक्का बसला, त्यांच्या पहिल्या पत्नी गौतमाबाई 29 सप्टेबर 1761 रोजी मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे ते आणखीनच खचले. अहिल्येची राजकारणातील समज पाहून मल्हारराव अनेकदा तिच्याशी सल्लामसलत करीत होते.  स्वतः मोहिमेवर असताना दौलतीची आणि खाजगीची दोन्ही जबाबदाऱ्या अहिल्येला पार पाडाव्या लागत होत्या.
 
पानिपतनंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हाररावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून ते स्वतःला कार्यमग्न ठेवू लागले. अशाच एका मोहिमेवर असताना 20 मे 1766 रोजी आलमपूर येथे मल्हारवांना वीरमरण आले.
 
पेशव्यांच्या घरात त्यांना वडीलकीचा मान होता. त्यांच्या पश्चात अहिल्याबाईंनी आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली. ते एक जिगरबाज मराठा योद्धा होते.