Minority Rights Day in India 2025 भारतातील अल्पसंख्याक हक्क दिन
भारतात दरवर्षी १८ डिसेंबर हा दिवस 'अल्पसंख्याक हक्क दिन' म्हणून साजरा केला जातो. तसेच हा दिवस केवळ हक्कांची आठवण करून देणारा नसून, देशाच्या विकासात या समुदायांनी दिलेल्या योगदानाचा आदर करण्याचाही आहे. विविध सरकारी योजना आणि शिष्यवृत्तींमार्फत या समुदायातील तरुणांना शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी आजच्या दिवशी जनजागृती केली जाते.
भारतातील अल्पसंख्याक हक्क दिन महत्त्व आणि इतिहास
भारतात राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस हा दरवर्षी १८ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी १८ डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय किंवा जातीय, धार्मिक आणि भाषाई अल्पसंख्याकांशी संबंधित व्यक्तींच्या अधिकारांवरील घोषणापत्र स्वीकारले होते, त्याची आठवण करून देतो. भारतात राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग हा दिवस आयोजित करतो.
उद्देश
अल्पसंख्याक समुदायांना (मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी आणि जैन) भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधणे.
त्यांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करणे.
समाजात धार्मिक सौहार्द आणि विविधतेत एकता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.
अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तींना मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी प्रोत्साहन देणे.
भारतीय राज्यघटनेतील तरतुदी
भारतीय राज्यघटनेने अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी विशेष तरतुदी केल्या आहे.
कलम २९: अल्पसंख्याकांना स्वतःची भाषा, लिपी आणि संस्कृती जतन करण्याचा अधिकार देते.
कलम ३०: अल्पसंख्याकांना त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार देते.
भारतात मान्य असलेले अल्पसंख्याक समुदाय
भारत सरकारने प्रामुख्याने ६ समुदायांना 'राष्ट्रीय अल्पसंख्याक' म्हणून मान्यता दिली आहे. १. मुस्लिम २. ख्रिश्चन ३. शीख ४. बौद्ध ५. पारशी ६. जैन (२०१४ मध्ये समाविष्ट)
हा दिवस अल्पसंख्याकांच्या योगदानाचा सन्मान करण्याची आणि समाजात समता प्रस्थापित करण्याची संधी आहे.
Edited By- Dhanashri Naik