शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

या शाळेत शिक्षकच घेतात विद्यार्थ्यांचा आशीर्वाद

हिंदू धर्मात ज्येष्ठांना नमस्कार करून त्यांना सन्मान देण्याची पद्धत आहे. याबदल्यात ज्येष्ठांकडून आशीर्वादही मिळतात. याशिवाय शिक्षकांनाही गुरू मानत असल्याने त्यांच्याही पाया पडले जाते. मात्र, मुंबईतील एका शाळेत याच्या उलट घडताना दिसते. याठिकाणी शिक्षकच विद्यार्थ्यांना नमस्कार करत असल्याचे दिसते. ऋषिकुल गुरूकुल विद्यालयाचे हे चित्र रोज सकाळी पहायला मिळते. आता ही पद्धत कशामुळे पडली असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असेल. तर भारतात लहान मुलांना देवासमान मानले जात असल्याने त्यांना नमस्कार करणे म्हणजे देवाला नमस्कार केल्यासारखेच आहे. या पद्धतीमुळे मुलांच्या मनातही शिक्षकांबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे.
 
या शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांकडून आशीर्वाद मागतात. नकळत याचा परिणाम या लहानग्यांच्या मनावर होते आणि आपणही आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्‍यांबरोबरच लहानांचाही सन्मान केला पाहिजे ही भावना रूजते. मुंबईतील घाटकोपरमध्ये असणारी ही शाळा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न आहे. त्यामुळे केवळ विद्यार्थ्यांनीच शिक्षकांना आदर देऊन त्यांना नमस्कार केला पाहिजे या पारंपरिक संकल्पनेला छेद देत या शाळेने एक वेगळा उपक्रम राबविला असल्याचे या निर्णयावरून दिसून येत आहे.