गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : गुरूवार, 23 फेब्रुवारी 2023 (16:59 IST)

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर ही पदवी कोणी दिली , तर त्यांचे जन्मगाव भगूर बद्दल माहिती रिपोर्ट

भगूर गावात जन्मलेल्या विनायक दामोदर सावरकरांना संपूर्ण जग 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या नावाने ओळखते. सावरकरांना 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी येवल्यातील एका समारंभात नाशिकचे देशभक्त काशीनाथ रघुनाथ वैशंपायन यांनी बहाल केली होती.
 
नाशिकने स्वातंत्र्य लढ्यात अनेक देशभक्त दिले. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. जुलै १९२४ मध्ये रत्नागिरीस प्लेगचा प्रादुर्भाव झाल्याने सावरकरांना नाशिकमध्ये राहण्यास ब्रिटिशांनी परवानगी दिली. नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांची कवी गोविंद व अनेकांशी १८ वर्षांनी भेटी झाल्या. सावरकर आणि नाशिक शहरातील दातार कुटुंबीय यांचे अत्यंत घरोब्याचे संबंध होते. यामुळे दातार व भट या मित्रांशी त्यांच्या रोज भेटी होत असे. वामनशास्त्री दातारांनी त्यावेळी येवल्यात वैद्यकीय व्यवसाय सुरू केला होता. सावरकरांची सुश्रुषा करण्यात दातार नेहमी पुढे असत. नाशिक मुक्कामात वामनशास्त्री दातार व विष्णू महादेव भट या दोन मित्रांच्या निमंत्रणावरून सावरकर येवल्याला गेले. मित्रांच्या आग्रहाखातर सावरकरांनी येवल्यात मुक्काम केला. यावेळी येवल्यातील एका थिएटरमध्ये सावरकरांचे भाषण झाले.
 
'दोन तात्या' पुस्तकात उल्लेख
काही दिवसांनी येवल्यातील राष्ट्रीय शाळेचा वार्षिक समारंभ सावरकरांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी भाषण करताना नाशिकचे देशभक्त असलेल्या काशीनाथ रघुमाथ वैशंपायन यांनी सावरकारांचा उल्लेख 'स्वातंत्र्यवीर' हे बिरूद लावून केला. तेव्हापासून विनायक दामोदर सावरकरांचे नाव 'स्वातंत्र्यवीर सावरकर' असे संबोधले जाऊ लागले. पुढे राष्ट्रीय स्तरावरदेखील हे नाव सर्वश्रृत झाले. सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही पदवी कुणी बहाल केली या बद्दलचा उल्लेख प्रा. डॉ. बा. वा. दातार यांच्या 'दोन तात्या' या पुस्तकात करण्यात आला आहे.
 
शिवकाळ अन् पेशवाईतील कर्तृत्वाच्या कहाण्या अजूनही भगूरभोवती फिरतात
एखादे गाव त्या मातीतील बलिदानाने ओळखले जाते. मात्र त्यामुळे गावाच्या नावामागील शेकडो वर्षांचा इतिहास झाकोळला जातो. त्यांच्या स्मृती पुसट होतात, असेच काहीसे भगूर या गावाबद्दल घडले आहे. महर्षी भृगू ऋषींचा देदिप्यमान इतिहास, शिवकाळ अन् पेशवाईतील कर्तृत्वाच्या कहाण्या अजूनही भगूरभोवती फिरतात. मुगलांच्या ताब्यातून नाशिक पहिल्यांदा मराठ्यांच्या ताब्यात आल्याची आठवण भगूरच्या आठवणीशिवाय पुढे जात नाही. तर स्वातंत्र्यलक्ष्मीचे भगूर... स्वातंत्र्यवीरांचे भगूर... ही भगूरच्या स्मृतिपटलावर कोरलेली सोनेरी किनारच आहे. म्हणूनच स्मृत‌िपल्याड गेलेल्या ‘त्या’ आठवणींना म्हणावेसे वाटते ‘ने मजसी ने परत मातृभूमीला..!’
 
प्राचीन काळापासूनच प्रसिद्ध भगूर
दारणेच्या कुशीत वसलेले भगूर (जि. नाशिक) प्राचीन काळापासूनच प्रसिद्ध असे गाव आहे. भगूरला भगूर असे केव्हापासून म्हटले गेले असेल, याची आठवण महर्षी भृगू ऋषीच्या वास्तव्यातून जागी होते. महर्षी भृगू ऋषीबाबत अनेक अख्यायिका प्रचलित आहेत. भृगू ऋषींनी दंडकारण्यातील ज्या परिसरात साधना केली व गुरूकुल उभारले त्या परिसराला भगूर म्हणून ओळखले जाऊ लागले. भृगू ऋषी आद्य स्थापत्यशास्त्र तज्ज्ञ होते. नाशिकमधील काळाराम मंदिर भृगूवास्तुशास्त्रानुसार बांधले असल्याचे म्हटले जाते. भृगू ऋषींनी ऋग्वेद, अथर्ववेद, भृगूसंहिता, भृगू आयुर्वेदसंहिता, भृगूस्मृती (मनस्मृती), भृगू गीता (वेदान्तविषयक), भृगूसिद्धांत आणि भृगूसूत्र आदी ग्रंथ लिहिले. भृगूसिद्धांत हा मूळ ग्रंथ जम्मू येथील सरकारी ग्रंथालयात उपलब्ध आहे. भृगू ऋषींचा हा वारसा भगूरमध्ये आता स्मृती म्हणूनही जपला जात नसल्याचे दिसते. भृगू ऋषींमुळे भगूरला भार्गव असेही नाव पडले व नंतर ते भगूर झाले. एका बाजूला दारणा नदी आणि इतर दिशांना लष्कराचा परिसर अशा कवेत भगूर सामावले असल्याने त्याचे मूळ रूप अजूनही टिकून आहे. सावरकरांची भगूरवर लिहिलेली ‘भार्गव’ ही कविता गावाचे महात्म्य वर्णन करते. सावरकरांचे भगूर अनुभवायचे असेल तर करंजकर चौक अन् संभाजी चौकातील जुनी घरे पाहिली की त्यांच्या कवितेतील गाव अनुभवास येते. भगूरनंतरच्या काळात ओळखले जाऊ लागले ते सावरकर कुटुंबियांमुळे. सावरकर व त्यांच्या लढवय्या सहकाऱ्यांमुळे स्वातंत्र्य चळवळीत भगूरमध्ये नेहमीच इंग्रज पोलिसांचा बंदोबस्त असल्याने गाव नेहमीच छावणी वाटायची. सशस्त्र चळवळींमुळे भारतातील एक डॅम्बिस गाव म्हणून भगूरची ख्याती इंग्लंडमध्ये नोंदवली गेली होती.
Veer Savarkar
सावरकर कुटुंबीय भगूरला कसे आले
सावरकर कुटुंबीय भगूरला कसे आले, याबद्दल सांगताना खुद्द सावरकरांनी आपल्या आत्मचरित्रात या जन्मगावाविषयी भरभरून लिहिले आहे. सावरकर घराणे मूळचे रत्नागिरीतील गुहागर येथील सावर गावातील दीक्षित कुटुंब. सावर गावातील रहिवासी असल्याने त्यांना सावरकर म्हटले गेले. पेशव्यांच्या वसई मोहिमेनंतर नारायण दीक्षित (नारायण दीक्षित-सावरकर ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदरपंत सावरकर हे आठव्या पिढीतील वंशज होत.), राणोजी बलकवडे व सरदार धोपावकर यांच्यावर मुगलांच्या ताब्यातील नाशिक परिसर काबीज करण्याची मोहीम पेशवे बाळाजी बाजीरावांनी सोपवली. या तिघांचे सैन्य त्रिंगलवाडी किल्ला, कावनई किल्ला काबीज करीत नाशिक ताब्यात घेण्यासाठी शहरात दाखल झाले. काझीगडी येथे मुगलांविरोधात मोठी आघाडी उघडण्यात आली अन्‌ पहिल्यांदा नाशिक पेशव्यांच्या ताब्यात आले. या कामगिरीवर खूष होत पेशव्यांनी सावरकर व धोपावकरांना भगूरजवळचे राहुरी हे गाव जहागिरी म्हणून दिले तर बलकवडे यांना भगूर गाव जहागिरी म्हणून दिले. कालांतराने सावरकर कुटुंब भगूरमध्ये स्थलांतरित झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना राहुरीत लहानपणी जहागिरांचा मुलगा म्हणून मान मिळायचा, अशी आठवण ते आत्मचरित्रात सांगतात. स्वातंत्र्यवीराचे जुने घर म्हणजे सध्याचा सावरकर वाडा. त्यांचे वडील दामोदर सावकरकरांच्या वडिलांच्या आईंच्या वडिलांनी म्हणजेच पणजोबांनी लुटारूंना पिटाळून लावताना त्यांना अष्टभुजा भवानीची मूर्ती मिळाली. ही मूर्ती पुढे सावरकर कुटुंबियांची कुलदैवत झाली. या मूर्तीला बोकडाचा बळी दिला जाई म्हणून दिला खंडोबाच्या मंदिरात ठेवण्यात आले. मात्र दामोदरपंतांच्या स्वप्नात ‘मला घरी घेऊन जा’ असे देवीने म्हटल्याने ती मूर्ती पुढे सावरकरवाड्याची शान झाली.
 
‘सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन’
मात्र १८९८ मध्ये प्लेगच्या छळानंतर वि. दा. सावरकरांनी वयाच्या १५व्या वर्षी शंखचक्रगदाखड्गधारी अष्टभुजा देवीच्या मूर्तीसमोर ‘सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी शपथ घेतली. तेव्हापासून अष्टभुजा देवीला स्वातंत्र्यलक्ष्मी असेही म्हटले जाऊ लागले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान सर्वपरिचित आहे. तसेच सावकरकरांचे मोठे बंधू गणेश दामोदर सावरकर ऊर्फ बाबाराव सावरकर हेही स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय होते. त्यांनी स्वातंत्रचळवळीत तरुणांना सक्रिय करण्यासाठी मित्रमेळा ही संघटना स्थापन केली. स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ध्वज व गीतही बाबाराव सावरकरांची देन आहे. सावरकरांच्या स्वातंत्र्यशपथेनंतर देवीसाठी बळी द्यायला ही मूर्ती पुन्हा खंडोबा मंदिरात गेली ती अजूनही तिथेच आहे. खंडोबाच्या मंदिरातील पालखीचा मानही सावरकर कुटुंबियांकडे होता. भगूरला गेलात अन्‌ स्वातंत्र्यलक्ष्मीचे दर्शन घेतले नाहीत तर भगूर यात्रा पूर्ण होत नाही. त्यामुळे ही मूर्ती डोळ्यात साठवून घेण्यासाठी नक्की पहायला हवी.
 
राष्ट्रीय स्मारक
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जुने घर राष्ट्रीय स्मारक झाले आहे. हे घर सावरकरांनंतर मारुतीराव चव्हाण यांनी खरेदी केले. पुढे ते पांडूबा चव्हाण यांनी घेतले व त्यांच्याकडून केंद्र सरकारने २८ मे १९९८ रोजी सावरकर स्मारकात रुपांतरित केले. हा वाडा आवर्जून पाहण्यासारखा आहे. राज्य पुरातत्त्व खात्याकडून सध्या त्याची डागडूजी सुरू आहे. भगूरमध्ये सावरकरांच्या नावे उद्यानही आहे. जवळच सावरकर चौथीपर्यंत शिकले ती शाळा आहे. येथून जवळच भगूरच्या प्रसिद्ध रेणुका देवीचे मंदिर आहे. गावातील राम मंदिर, हनुमान मंदिर, महादेव मंदिर व लक्ष्मीनारायण मंदिरही पाहण्यासारखे आहेत. मुरलीधर मंदिरातील अखंड लाकडातील देवीची मूर्तीही मनमोहक आहे. गावातील शितळादेवी मंदिरामागे रेल्वेरूळ ओलांडून गेलात की खंडोबाचे प्राचीन मंदिरही पहायला मिळते. तेथील पुजारी दत्तू खैरे (७१) यांची आठवी पिढी येथे सेवेस आहे. त्यांच्याकडे एक ताम्रपट होता मात्र तो सध्या कोर्टात आहे.

Edited by: Ratnadeep Ranshoor