लष्करालाही 'धर्म' असतो?
|
'हिंदूत्ववादी' लष्करी अधिकारी
आतापर्यंत लष्कराला धर्म नसतो असे आपण समजत आलो आहोत. पण हा समज चुकीचा होता. लष्करातल्या लोकांनाही धर्म असतो आणि त्या चष्म्यातूनच ते समाजाकडे बघत असतात हे या घटनेने पुढे आले आहे. मालेगाव बॉम्बस्फोट आपणच घडविल्याची कबुली लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांनी दिली असल्याचे समजते आहे. त्यांच्याबरोबर माजी लष्करी अधिकारी रमेश उपाध्याय यांनाही या स्फोटातील सहभागप्रकरणी अटक झाली आहे. शिवाय आणखीही काही अधिकार्यांची चौकशी होणार आहे, असे समजते. असे असेल तर लष्करांतही धर्म शिरल्याचेच स्पष्ट होते आहे. आणि हीच धोक्याची घंटा आहे.
कट ते अंमलबजावणीत सहभाग
या बॉम्बस्फोटात लष्करी अधिकार्यांचा सहभाग तर आहेच. शिवाय या स्फोटांसाठी लागणारे आरडीएक्स व इतर स्फोटके, शस्त्रे यांचा पुरवठा व प्रशिक्षणही या अधिकार्यांनीच दिल्याचेही पुढे येत आहे. ही बाब भयंकर आहे. उद्या लष्करी अधिकारी आपल्या अधिकारांचा दुरूपयोग करून अशी कृत्ये करू लागले तर या देशाचे काय होईल. आज या लष्करी अधिकार्यांचा 'हिंदूत्ववादी' दृष्टिकोन यातून पुढे येतो. उद्या इस्लामी दृष्टिकोन पुढे आला तर याहून भयानक स्थिती होईल.
लष्करी अधिकार्यांचा ओढा भाजपकडे
लष्करी अधिकार्यांचा हिंदूत्ववादी दृष्टिकोन याआधीही दिसला होता. पण त्याकडे आपले फारसे लक्ष नव्हते. त्यासाठी थोडे मागे वळावे लागेल. १९९७ नंतर भाजपमध्ये ९० हून अधिक लष्करी अधिकारी सामील झाले. वर वर पहाता ही छोटी गोष्ट वाटेल. पण या अधिकार्यांना भाजपमध्येच का सामील व्हावेसे वाटले असेल? भाजप हा हिंदूत्ववादी विचारधारेचा पक्ष आहे, हे सर्वमान्य आहे. हे माहित असतानाही हे अधिकारी या पक्षात सहभागी झाले. याचा अर्थ त्यांना एक विशिष्ट भूमिका होती. मग लष्करात असतानाही ते या भूमिकेला जागले असतील का? कदाचित नसतीलही. पण त्यांची भूमिका मात्र त्यांनी लष्करातून निवृत्त झाल्यानंतर स्पष्ट झाली.
| |
| |
लष्करांत विविध धर्माचे अधिकारी असले आणि त्यांना त्यांचा धार्मिक मार्ग अनुसरण्याची मुभा असली तरी त्यांची प्रार्थनास्थळे एकाच खोलीत असतात. आत गेल्यानंतर मंदिर, मशीद, चर्च वेगळे होतात. पण सगळ्यांना जावे लागते मात्र एकाच दरवाजातून. कोणत्याही जाती धर्माचे असलात तरी तुम्ही भारतीय जवान असता हे विसरून चालणार नाही हेच यातून सांगायचे असते. पण हा लष्करी उद्देश काही जणांमुळेच धुळीला मिळवला जातो असे लक्षात येऊ लागले आहे.
देशाचा भार लष्करावर
देशाच्या संरक्षणाची जबाबदारी लष्करावर आहे. पण लष्करातच धर्म घुसल्यास त्याचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात याची कल्पनाही करवत नाही. आपला देश पाकिस्तानशी छुपे युद्ध लढतो आहे. बांगलादेशही त्रास द्यायला बसला आहे. हा दोन्ही मुस्लिम देश आहेत. अशा वेळी लष्करातील मुस्लिम जवानांना फितवल्यास काय आफत ओढवली जाईल याचा विचार तरी मालेगाव बॉम्बस्फोटातील सहभागी लष्करी अधिकार्याचे समर्थन करणार्यांच्या लक्षात आली आहे का? अनेक मुस्लिम अधिकारी, जवानांनी भारतीय लष्करात निस्वार्थपणे सेवा बजावली आहे. अब्दूल हमीदचे पाकिस्तानविरोधी युद्धातील बलिदान तर सर्वश्रुत आहे. असे असताना त्या समाजावर दहशतवादाचे रोपण कसे काय केले जाऊ शकते? देशात कुठेही आपदग्रस्त परिस्थिती उद्बवल्यास लष्कराला पाचारण केले जाते. दंगलींसारख्या संवेदनशील ठिकाणीही लष्कर बोलावले जाते. अशावेळी लष्करी जवान आपल्या 'लष्करी धर्माला' न जागता अंगीकृत धर्माला जागू लागले तर अनावस्था प्रसंग ओढवेल?
त्यामुळेच लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांचा या स्फोटातील सहभाग ही धोक्याची घंटा आहे. दोन-पाच अधिकारी सापडले म्हणून पूर्ण लष्कर धर्मांध झाले असे म्हणता येणार नाही. पण जी गोष्ट यापूर्वी कधीही घडली नाही, ती घडू लागल्यास त्याचा धोकाही वेळीच ओळखला गेला पाहिजे. अन्यथा, यातून गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकेल.

