1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन

सामान्य सामान्य राहिले म्हणून...

डॉ. द. भि. कुलकर्णी

सामान्य माणसाला ज्ञात नसलेल्या भाषेत कायदेकानू झाले, शासकीय व्यवहार झाले, शिक्षण झालं तर तो जाबही विचारू शकत नाही. त्यात सहभागीसुद्धा होऊ शकत नाही आणि लोकशाहीचा विकास होत नाही.      
१ मे, १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. गुजरात आणि महाराष्ट्र यांचं जे व्दिभाषिक होतं ते मोडून हा नवीन महाराष्ट्र अस्तित्वात आलेला आहे. एक- भाषिक राज्य का आवश्यक असतं तर त्या प्रदेशातल्या सामान्य माणसाची जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेतून सर्व प्रशासकीय, शैक्षणिक व्यवहार होणं गरजेचं आहे. कारण लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग सगळ्यात महत्त्वाचा असतो. लोकांच्या भाषेत शैक्षणिक, शासकीय व्यवहार झाला नाही तर राज्यकर्ते, शासनकर्ते, विद्वान काय करताहेत हे सामान्य माणसाला कळणारच नाही. हे सगळं सामान्य माणसाला नुसतंच कळून भागत नाही तर सामान्य माणसाचा सक्रिय सहभाग त्यामध्ये अपेक्षित असतो. त्यासाठी सामान्य माणसाच्या मातृभाषेच्या अनुषंगानं भाषिक राज्य अपेक्षित असतं. शासनाला आपल्या व्यवहारात पारदर्शकता ठेवावी लागते. त्यांना समाज जाब विचारू शकतो. सामान्य माणसाला ज्ञात नसलेल्या भाषेत कायदेकानू झाले, शासकीय व्यवहार झाले, शिक्षण झालं तर तो जाबही विचारू शकत नाही. त्यात सहभागीसुद्धा होऊ शकत नाही आणि लोकशाहीचा विकास होत नाही. अंतिमतः, सामान्य माणसाचा सहभाग आणि लोकशाहीचा विकास यासाठी भाषिक राज्य अपेक्षित असते.

संस्कृती म्हणजे काय तर मानवनिर्मित प्रत्येक घटक संस्कृतीचा अंश असतो. निसर्गातली झाडं, पाणी, नद्या, डोंगर वगैरे म्हणजे संस्कृती नाही. कारण ही मानवाची निर्मिती नाही. तर मानवानं निर्माण केलेला प्रत्येक घटक म्हणजे भाषा, साहित्य, संगीत, पोषाख, खाद्यपदार्थ हे सारं म्हणजे संस्कृती होय. महाराष्ट्रातल्या गेल्या पन्नास वर्षांतल्या स्कृतीचा लेखाजोखा घेताना पुढील काही मुद्यांचा प्रकर्षानं समावेश करावासा वाटतो. आता, साठ सालापासून आजपर्यंत महाराष्ट्राचं सांस्कृतिक अवलोकन केलं तर हा हेतू सफल झाला आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शासनात मराठी आली आहे, शिक्षणसंस्थांमध्ये आली आहे; पण या प्रक्रियेमुळे सामान्य माणसाची सांस्कृतिक जागृती आणि सहभाग यामुळे भाषा संपन्न होणं हे किती झालेलं आहे? माझं अवलोकन असं आहे की या दोन्ही गोष्टी घडलेल्या नाहीत. त्या घडल्या असत्या तर अनेक अण्णा हजारे निर्माण झाले असते. त्या जर घडल्या असत्या तर इंग्रजी माध्यमांच्या शाळांऐवजी मराठी माध्यमांच्या शाळा वृद्धिंगत झाल्या असत्या. ते घडलं असतं तर महाराष्ट्रातली वाचनसंस्कृती समृद्ध झाली असती. ते घडलं असतं तर पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण हे जे महाराष्ट्राचे 'उपविभाग' आहेत, हे शब्दही नाहीसे झाले असते आणि मग पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र म्हणतो तसं आपण विदर्भाला पूर्व महाराष्ट्र म्हटलं असतं. महाराष्ट्राचे हे जे पोटविभाग आहेत, त्या सगळ्या पोटविभागांचं विभागीकरण झालं असतं.

  एकभाषिक राज्य सामान्य माणसाच्या हितासाठी आहे, हे लक्षात न घेता उपप्रदेशांना विकसित होऊ द्यायचं आणि राष्ट्रीय जाणीव जपायची असं झालं नाही. मराठी अस्मिता महत्त्वाचीच आहे, पण ती राष्ट्रीय अस्मिता आणि उपप्रदेशाची अस्मिता यांची जोड करणारी असली पाहिजे.      
अविभागीकरण ही साहित्यशास्त्रातली एक संज्ञा आहे. कलेच्या क्षेत्रातली ती अशी की, सारख्या उंचीच्या, सारख्या रंगरूपाच्या दोन नर्तिका जेव्हा एकाच वेळी एकच नृत्य करतात तेव्हा त्या दोन दिसतात; पण त्यांचं रंगरूप आणि त्यांचं नृत्य, मुद्रा एकच असल्यामुळे त्या दोन मिळून एकच झाल्या आहेत, असं वाटत राहतं. पण त्या एक होत नाहीत, त्याला अविभागीकरण अशी पारिभाषिक संज्ञा आहे. महाराष्ट्राचे जे उपप्रदेश आहेत त्यांचं अविभागीकरण झालेलं नाही, तर ते अजून सुटे विभागच राहिलेले आहेत. विदर्भ आणि कोकण यांच्या संदर्भात सतत चर्चा होते आणि त्याचे लाभ त्या त्या प्रदेशाला मिळतात. या सगळ्या उपविभागांमध्ये खरोखर ज्याच्याकडे सगळ्यात जास्त दुर्लक्ष होत आहे तो उपविभाग म्हणजे खानदेश होय. सुधाकर गायधनी यांची एक कविता आहे, जी यशवंतराव चव्हाण आपल्या भाषणात नेहमी उद्धृत करत असत. ती म्हणजे, ''आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो तर गिर्‍हाईक येईना, आम्ही सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो तेव्हा गिर्‍हाईक संपता संपेना'' तर खानदेशातला मराठी समाज आरडाओरडा करत नाही, त्यामुळे त्याच्याकडे उर्वरित महाराष्ट्राचं पुरेसं लक्ष नाही. खानदेशी प्रादेशिक संस्कृती ही सातपुडाच्या कुशीत पोसलेली आहे. त्यामुळेच इथे राहणारे हिंदी कवी अभिमानानं स्वतःचा उल्लेख 'सातपुडा के आँचल के कवी' असा करतात. तसं काही मराठी साहित्यक्षेत्रात घडलेलं नाही. महाराष्ट्रातल्या या उपविभागांचं संम्मिलन (संम्मेलन नव्हे!) व्हायला पाहिजे होतं ते गेल्या पन्नास वर्षांत झालेलं नाही. एकभाषिक राज्य सामान्य माणसाच्या हितासाठी आहे, हे लक्षात न घेता उपप्रदेशांना विकसित होऊ द्यायचं आणि राष्ट्रीय जाणीव जपायची असं प्रत्यक्षात झालं नाही. मराठी अस्मिता महत्त्वाचीच आहे, पण ती राष्ट्रीय अस्मिता आणि उपप्रदेशाची अस्मिता यांची जोड करणारी असली पाहिजे. इकडेही आपल्याला लक्ष द्यावं लागेल.

दुसरा आणखी महत्त्वाचा मुद्दा असा, की मुख्य राष्ट्रीय प्रवाहाशी मराठी अस्मिता सुसंगत करण्याचा एक मार्ग- ज्याच्याकडे आपल्या सगळ्यांचं दुर्लक्ष झालं आहे तो मार्ग- म्हणजे बृहन्महाराष्ट्राकडे लक्ष देणं. महाराष्ट्राचं भौगोलिक स्थान असं आहे की, त्याच्या तीन बाजूंना वेगवेगळी भाषिक राज्यं आहेत. खानदेशच्या जवळ गुजरात आहे, विदर्भाला लागून हिंदी भाषिक मध्यप्रदेश आणि छत्तीसगड आहे, जवळपासच ओरिसा आहे, दक्षिणेकडे आंध्रप्रदेश आणि कर्नाटक आहे. या भाषांबद्दल आपल्या मनामध्ये आस्था असली पाहिजे. इंग्रजी, फ्रेंच, रशियन भाषांमध्ये काय चाललं आहे, त्यांच्या वाङ्मयामध्ये काय चाललं आहे ते आपण समजून घेतो, पण कन्नडमध्ये काय चाललं आहे, तेलुगूमध्ये काय चाललं आहे, उडियामध्ये काय चाललं आहे, हिंदीत काय चाललं आहे, गुजरातीमध्ये काय चाललं आहे इकडे आपण पुरेसं लक्ष देत नाही. त्यामुळे बृहन्महाराष्ट्रात जो मराठी समाज आहे, तो हे काम करू शकतो.
  मध्य- प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक इथे मराठी समाज आहे, त्यांच्याकडे सांस्कृतिक, वाङ्मयीन आणि भाषिकदृष्ट्या आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे. तसं लक्ष न दिल्यामुळे त्या त्या प्रांतात हे मराठी भाषिक उपरे होतात.      
या प्रदेशामध्ये, मध्य- प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक इथे मराठी समाज आहे, त्यांच्याकडे सांस्कृतिक, वाङ्मयीन आणि भाषिकदृष्ट्या आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे. तसं लक्ष न दिल्यामुळे त्या त्या प्रांतात हे मराठी भाषिक उपरे होतात. मग कोणी संघर्ष करतात, कोणी नमतं घेतात, कोणी उदास राहतं, आपापल्या स्वभावाप्रमाणे आणि परिस्थितीप्रमाणे भूमिका घेतात. पण मुख्य महाराष्ट्रानं त्यांच्याकडे लक्ष दिलं तर मराठीच्या सरहद्दीचं संरक्षण करणारी ही ठाणी आहेत हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे सामाजिक आणि शासकीय पातळीवर बृहन्महाराष्ट्रातील समाजाशी आपण जास्त संबंध प्रस्थापित केले पाहिजेत. त्या त्या प्रदेशातल्या भाषिक संस्कृतीशी आपली देवाणघेवाण वाढेल आणि आपली अस्मिता एकारलेली होणार नाही. तिथली मंडळी मराठी संस्कृतीचा परिचय करून देतील, तिथले लोक आपल्या प्रादेशिक भाषेत मराठी संस्कृतीचा परिचय करून घेतील. त्यामुळे बृहन्महाराष्ट्रातील मराठी लोक आपले सांस्कृतिक दूत म्हणून कामगिरी बजावू शकतील. तिथल्या लेखकांच्या मनामध्ये जो संकोचगंड आहे, तो दूर होईल. तिथे जे अभ्यासक्रम आहेत ते भाषांतरप्रधान आणि तौलनिक अभ्यासाशी संबंधित असतील. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर इथल्या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांचं अनुकरण त्यांनी करता कामा नये. त्यांनी अनुवादविद्या आणि तौलानिक साहित्याभ्यास यावर जोर दिला पाहिजे. यासाठी आपण त्यांना पाठबळ दिलं तर ते हे करू शकतील. मुख्य म्हणजे त्याला केवळ भाषिक आणि वाङ्मयीन परिमाण राहणार नाही तर मोठं सांस्कृतिक परिमाण मिळेल. बृहन्महाराष्ट्रातील मराठी केंद्रं सर्वतोपरी जपायला पाहिजेत. आपल्या व्यवहारात त्यांना जितका वाव देता येईल, तितका तो दिला गेला पाहिजे.

  सामान्य माणसाची शक्ती फार मोठी आहे पण; दुर्दैवानं त्या सामान्य माणसाच्या शक्तीची जाणीव त्या सामान्य माणसालाच नाही. भाषिक राज्यांनी सामान्य माणसाचा आत्मविश्वास वृद्धिंगत केला पाहिजे.      
सामान्य माणसाची शक्ती फार मोठी आहे पण; दुर्दैवानं त्या सामान्य माणसाच्या शक्तीची जाणीव त्या सामान्य माणसालाच नाही. भाषिक राज्यांनी सामान्य माणसाचा आत्मविश्वास वृद्धिंगत केला पाहिजे. आपण नेहमी सामाजिक दुराचाराबद्दल बोलतो. भ्रष्टाचार, जातीयता, अकर्मण्यता इत्यादी. मला नेहमी असं वाटतं की, सामान्य माणसाच्या इतर शक्ती कमी आहेत, असं आपण समजतो. हे खरं नाही. पण अनाचार करण्याची सामान्य माणसाची शक्ती कमी आहे, हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. सामान्य माणूस हा अल्पसंतुष्ट आहे त्यामुळे तो मोठे घोटाळे करत नाही. मोठे घोटाळे करणारी माणसं मोठीच असतात. उलट, सामान्य माणूस पापभीरू आहे. रास्त मार्गानं जे मिळेल त्याच्यात समाधान मानायचं. जे अतृप्त असतात ते भ्रष्टाचाराला प्रवृत्त होतात.

सामान्य माणूस भ्रष्टाचारी नाही. नाइलाजानं त्याला भ्रष्टाचारात ओढलं जातं. तो स्वतःहून करत नाही. सामान्य माणूस हा अंतरंगानं शुद्ध, नीती आणि कायदे, शिष्टाचार यांचा सत्कार करणारा आहे. तथाकथित मोठा माणसांपेक्षा तो निह्नस्वार्थी आहे. फक्त त्याला आपल्या शक्तीची जाणीव नाही. ती जाणीव त्याला कोणी करून दिली तर हा सामान्य माणूस या समाजाला दूरवर प्रगतिपथावर घेऊन जाऊ शकतो. इतिहासकाळात असं सतत घडलेलं आहे. वारकरीपंथानं सामान्यांची अस्मिता जागृत केली. शिवाजी महाराजांनी केली.म्हणून असं म्हणतात की नामदेव महाराजांनी तेराव्या शतकात आध्यात्मिक लोकशाही आणली. रामदासस्वामींनी समाजाला संघटित करून शक्तिमान केलं. अगदी तमासगीर, शाहीर यांच्यातही भिन्न जातिधर्माचे लोक होते. राम जोशी, अनंत फंदी ब्राह्मण होते, सगन- भाऊ मुस्लीम होते, परशुराम शिंपी होते. ''शब्द शक्तीची तरफ आमुच्या करी विधीने दिली असे, टेकुनिया ती जनता शिरशावरी जग उलथुनिया देऊ कसे '' हा विश्वास आधुनिक काळातील केशवसुतांनी व्यक्त केला आहे. मराठीतले दुसरे केशवसुत म्हणजे बा.सी.मर्ढेकर.यांनीसुद्धा हा विश्वास आपल्या काव्यातून प्रगट केलेला आहे, 'अखेर जरी मग टक्कर घेता, युगायुगाचे फुटेल भाल अशाश्वताच्या शमशेरीवर, शाश्वताचीही तुटेल ढाल'.इथेही सामान्य माणसाचा गौरव मर्ढेकरांनी केलेला आहे.

  सामान्य माणूस हा अंतरंगानं शुद्ध, नीती आणि कायदे, शिष्टाचार यांचा सत्कार करणारा आहे. तथाकथित मोठा माणसांपेक्षा तो निह्नस्वार्थी आहे. फक्त त्याला आपल्या शक्तीची जाणीव नाही.      
आपल्याला असं दिसेल की, ज्ञानेश्वर महाराज असोत, नामदेव महाराज असोत, तुकाराम महाराज असोत, समर्थ रामदास असो, शिवाजी महाराज असोत किंवा कोणतेही शाहीर असोत किंवा केशवसुतांपासून मर्ढेकरांपर्यंतचे आधुनिक कवी असोत, या सगळ्यांना सामान्य माणसाच्या शक्तीची जाणीव होती. आज सामान्यांना जागृत करण्याऐवजी त्यांना बहकावण्याचं काम समाजात सुरू आहे. राजकीय हेतूसाठी त्यांना वापरलं जातं. व्यापारी हेतूसाठी त्याला चंगळवादी केलं जात आहे, सामाजिक गैरहेतूंसाठी त्याला मनोरंजनाचं व्यसन लावलं जात आहे. समाजात मनोरंजनाचा जो अतिरेक झाला आहे, सकाळपासून रात्रीपर्यंत टीव्ही पाहणं, इतक्या मनोरंजनाची गरज नाही. हे म्हणजे तुमचं हलवायाचं दुकान आहे म्हणून रात्रंदिवस तुम्ही मिठाई खाणं! ही काही शहाणपणाची गोष्ट नाही. ती घातक आहे. त्यामुळे विज्ञानयुगात असून आपण वैज्ञानिक दृष्टी स्वीकारत नाही, तर मनोरंजनाची दृष्टी स्वीकारतो.

दूरदर्शनवर तुम्ही करमणुकीचा कार्यक्रम पाहत असाल तर त्याचा आनंद घेणं बरोबर आहे, मग ते नृत्य, संगीत असो किंवा नाटक, सिनेमा, क्रिकेटची मॅच काहीही. पण भूकंप, अवर्षण, अपघात, दहशती हल्ले यांची दृश्यंही तुम्ही करमणूक म्हणून पाहत असाल तर तुमची संवेदना बोथट झाली आहे, असं मी समजतो. मालिकांमधील प्रेमप्रकरण ज्या भूमिकांमधून पाहायचं त्याच भूमिकेतून तुम्ही मुंबईवरील हल्ल्याची दृश्यं पाहणं ही संवेदनहीनतेची वृत्ती आहे. सामान्य माणसाला फार पद्धतशीरपणे करमणूकवादी, संवेदनाशून्य, विचारशून्य आणि भावनाशून्य केलेलं आहे. पद्धतशीरपणे ही प्रक्रिया सुरू आहे.

मार्क्सवादी ज्याप्रमाणे धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हणत त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमं सर्वसामान्यांना मनोरंजनाची अफूची गोळी देत आहेत. या सामान्य माणसाची केवळ भाषाच व्यवहारात येऊन चालणार नाही तर या सामान्य माणसाचं वर्चस्व सगळ्या जीवनव्यवहारात आलं पाहिजे. १९४८ पासून महाराष्ट्राबद्दल उर्वरित भारतामध्ये फार मोठे गैरसमज आहेत. म्हणूनच मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकत नाही. यशवंतरावांसारखा कर्तबगार माणूसही पंतप्रधान झाला नाही, याचं एक कारण म्हणजे मराठी समाजाबद्दल उर्वरित देशात असलेले गैरसमज. आपण ही मराठी अस्मिता विकसित करत असताना महाराष्ट्राच्या उपप्रवाहांकडे लक्ष दिलं, राष्ट्रीय प्रवाहांशी संधान ठेवलं, बृहन्महाराष्ट्रातील समाजाला प्रोत्साहन दिलं आणि सामान्य माणसाला विचारप्रवृत्त केलं तर महाराष्ट्र ही भारतीय राजकारणातील महासत्ता होईल.
(शब्दांकन : ममता क्षेमकल्याणी)

(ग्रंथाली वाचक चळवळीचे मासिक 'रूची'मधून साभार)

About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा