बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मराठी दिन
Written By
Last Modified: बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (13:35 IST)

मराठी राजभाषा दिन संपूर्ण माहिती

मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिन महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिनाला मराठी गौरव दिन असेही म्हटलं जातं. आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो.
 
कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. कुसुमाग्रज महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, थोर लेखक, नाटककार म्हणून ओळखले जातात. कुसुमाग्रजांनी अनेक सरस कथा, कांदबऱ्या, निबंध, लघुकथा, नाटक, कविता इ. यांचे कुशल लेखन केले. विशाखा हा कवितासंग्रह आणि नटसम्राट हे नाटक त्यांच्या दोन गाजलेल्या साहित्यकृती आहेत. 
 
कुसुमाग्रजांच्या कारकीर्दीत पाच दशके विस्तारली आणि या काळात त्यांनी कविता, लघुकथा, निबंध, नाटकं आणि कादंबर्‍या या रुपात सुंदर साहित्य तयार केलं. 1942 मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारी कवितासंग्रह, विशाखा ही त्यांच्या सर्वात प्रसिद्ध लेखणीपैकी एक आहे. मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे स्थापना केली. 
 
महान राष्ट्र अशी ओळख असलेले राज्य म्हणजेच महाराष्ट्र या राज्याची मातृभाषा मराठी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवशी विविध शाळांमध्ये भाषण, निबंध, नाटक, वकृत्व, कविता स्पर्धा आयोजित केल्या जातात. तसेच सरकारी कार्यालयात अनेक उपक्रमाद्वारे हा गौरव दिन साजरा केला जातो. 
 
मराठी ही सर्वांगसुंदर भाषा असून भारतातील अधिकृत 22 भाषांपैकी एक भाषा आहे. मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी 15 वी भाषा आहे तर भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा आहे. महाराष्ट्र तसेच गोवा या 2 राज्यांची मराठी ही अधिकृत राज भाषा आहे. मराठी भाषेची साहित्यसंपदा विपुल असून या भाषेला थोर परंपरा लाभली आहे.
 
मराठी भाषेचा उगम नवव्या शतकापासून झालेला समजतो. या भाषेची निर्मिती संस्कृत पासून झाली आहे. पैठण येथील सातवाहन साम्राज्याने प्रशासनात महाराष्ट्री भाषेचा सर्वप्रथम वापर केला. नंतर देवगिरीच्या यादव काळात मराठी भाषेची समृद्धी झाली. इसवीसन बाराशे अष्टोत्तर मध्ये म्हाईमभट यांनी लिळा चरित्र लिहिले आणि संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ते म्हणतात माझी मराठीची बोलू कौतुके, परी अमृताहे पैजा जिंके. अर्थात आपली मायबोली अमृतालाही पैंजेत जिंकेल. संत एकनाथ महाराजांनी मराठी भाषेतून भारुडे लिहिली. मराठी भाषा अनेक संताच्या कीर्तनांनी, ओव्यांनी तशीच भजनांनी सजली आहे. या भाषेला अनेक मराठी साहित्यिकांच्या लेखनींची समृध्दी आणि संपन्नता लाभलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेतून लिहिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे व संस्कृतीचे संरक्षण केले. महाराजांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोश तयार केला.
 
मराठी भाषा ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा असली तरी गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, छत्तीसगड तसेच दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशातील काही भागात सुद्धा मराठी भाषा बोलली जाते. भारताव्यतिरिक्त परदेशात देखील ही भाषा बोलली जाते कारण आपल्या देशातील अनेक लोक शिक्षणासाठी तसेच नोकरी-व्यवसायासाठी इतर देशात असल्यामुळे भाषा बोलली जाते.
 
आत्ताच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी मराठी भाषेसोबत  इतर भाषा येणे सुद्धा गरजेचे असलं तरी आपल्या मराठी भाषेचे महत्तव टिकवून ठेवणे देखील तेवढेच आवश्यक आहे. मराठी भाषेतील साहित्य समृद्ध असल्याने येणार्‍या पिढील मराठी साहित्याची ओळख करुन दिली पाहिजे. संतांनी, लेखकांनी, इतिहासकरांनी आपल्या भाषेत दिलेलं ज्ञान मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हाच आपल्या भाषेबद्दल आणि आपल्या मातीबद्दल अभिमान वाढेल.
 
आपण सर्वांनीही मराठीचा अभिमान बाळगावा. मराठी भाषा समृध्द करण्यासाठी तसेज जोपसण्यासाठी प्रयत्न करावेत. 
 
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी ।।