अनुभवी शॅक धारकांना 80 टक्के शॅक राखीव:नव्याना दहा टक्के, वयोमर्यादा शिथिल
पणजी : अलिकडेच मंत्रिमंडळाने संमत केलेल्या शॅक धोरणात सुधारणा करण्यात आली असून त्या सुधारित धोरणास सरकारने मान्यता दिली आहे. त्या धोरणातून आता वयोमर्यादा शिथिल करण्यात आली असून 80 टक्के शॅक हे अनुभवींसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वर्षाचा अनुभव असणाऱ्या शॅक धारकांना प्रथम प्राधान्य व आरक्षण मिळणार आहे. शॅक धोरण जाहीर केल्यानंतर त्यातील काही तरतुदींना शॅक मालकांनी विरोध दर्शवला होता.
तसेच त्याकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले होते. त्याची दखल घेऊन शॅक धोरणात बदल करण्यात आले आहेत. नवीन बदलानुसार पाच वर्षांपेक्षा कमी अनुभवी शॅक धारकांसाठी 10 टक्के तर अननुभवी शॅक धारकांसाठी (नवीन) 10 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आधीच्या शॅक धोरणात 2 वर्षापर्यंतचा अनुभव असणाऱ्यांना 10 टक्के तर 3 वर्षापेक्षा जास्त अनुभवी शॅकवाल्यांना 90 टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या. त्यास शॅक्समालक संघटनेने आक्षेप घेऊन विरोध दर्शवला होता. नवीन, कमी अनुभवीना सदर धोरणाचा लाक्ष मिळवून अनुभवी शॅकवाल्यांवर अन्याय होईल, अशी भीती वर्तवून धोरणात बदल करण्याची मागणी करण्यात आली होती, त सरकारने मान्य केली.