रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मार्च 2023 (07:51 IST)

पाच दिवसांपासून गोव्यात सुरू झालेले अग्नितांडव अद्याप सुरूच

fire
पणजी, वास्को, वाळपई, धारबांदोडा : गेल्या पाच दिवसांपासून गोव्यात सुरू झालेले अग्नितांडव अद्याप सुरूच असून परिस्थिती अग्निशामक दलाच्या आवाक्याबाहेर जात आहे. आगीमुळे अनेक डोंगर भस्मसात होऊन गेले आहेत. कोट्यावधी रुपयांची हानी झाली असून वनस्पतींच्या दुर्मीळ जाती आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. सत्तरीतील काही डोंगरांवरील आगी आटोक्यात आल्या आहेत, मात्र नावता-कुठ्ठाळी, पर्रा व साकोर्डे येथे नव्dयाने वणवा पेटला आहे. वनमंत्री विश्वजित राणे यांनी आगी नैसर्गिकरित्या असाव्यात असा अंदाज व्यक्त केला आहे, तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा घेतलेल्या आढावा बैठकीत कृत्रिम आगीची शक्यता फेटाळली नाही. दरम्यान बुधवारी पिसुर्ले येथील कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. कुठ्ठाळीत डोंगराला आग लागली.  पर्रा डोंगराला लागलेली आग आटोक्यात आली आहे. पारवाड कर्नाटकमार्गे लागून आलेली आग गोव्यातील स्थानिक नागरिकांच्या मदतीने विझविण्यात यश आल्याने काही डोंगर वाचले आहेत. वाघेरी डोंगराला लागलेली आगही आता नियंत्रणात आली आहे.
 
गोव्यात विशेषत: सत्तरीतील डोंगराना तीन दिवसात अनेक ठिकाणी ज्या आगी लागल्या त्यावरून संशय निर्माण झालेला आहे. काल बुधवारी आगीचे प्रकार अन्य तालुक्यांमध्ये म्हणजे धारबांदोडा, मुरगाव व बार्देश तालुक्यातही घडले. वनखात्याने नौदलाच्या हॅलिकॉप्टरचा वापर करून डोंगरावर पाण्याचे फवारे उडवून आग आटोक्यात आणली. आणखी विस्तारली जाऊ नये यासाठी नौदलाची दोन हॅलिकॉप्टर्स सज्ज ठेवण्यात आली आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor