पणजी :येत्या ऑगस्ट 2022 पासून मोपा-पेडणे येथील ग्रीन फिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होणार असून पहिले विमान उडणार असल्याची माहिती राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी विधानसभेत अभिभाषणातून बोलताना दिली. आगामी 25 वर्षाचा राज्याच्या सर्वांगिण विकासाचा रोड मॅप राज्य सरकारने तयार करावा, अशी सूचनाही पिल्लई यांनी केली.
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर 2022 सालातील पहिल्या अधिवेशनात अभिभाषण करताना पिल्लई बोलत होते. त्यांनी सरकारच्या एकंदरीत कार्याचा विस्ताराने आढावा घेतला.
राज्याचा महसूल वाढविण्याचा प्रयत्न
राज्यपाल पुढे म्हणाले की, 2021-22 या आर्थिक वर्षात गोवा राज्याला रु. 4412 कोटींचा महसूल प्राप्त झाला. तो वाढावा म्हणून सर्व ते प्रयत्न चालू असून त्यात हळूहळू यश येत आहे. दर्जात्मक शिक्षण वाढावे म्हणून भर देण्यात येत असून सरकार शिक्षणाच्या विविध सोयी सवलतीना प्राधान्य देत आहे. मोपा विमानतळाचे काम प्रगतीपथावर असून त्याचा पहिला ऑगस्ट 2022 पासून चालू करणार असल्याचे पिल्लई यांनी सांगितले.
खाण व्यवसाय सुरु करण्याकडे राज्य सरकारचे विशेष लक्ष
खाण व्यवसाय सुरू करण्याकडे सरकारचे विशेष लक्ष असून नोकऱयांसाठी तो व्यवसाय चालू करणे गरजेचे आहे. त्यामुळे गोव्याचा आर्थिक कणा मजबूत होण्यास मदत मिळेल. गोव्यातील अंमली पदार्थ व्यवसायावर वचक ठेवण्याचे आवाहन त्यांनी सरकारला केले असून राज्य नशामुक्त व अपघातमुक्त करण्यावर भर देण्यात यावा, असेही त्यांनी सुचवले आहे.
केंद्राच्या योजनांमध्ये सर्व आमदारांनी सहभागी व्हावे
केंद्र सरकारतर्फे चालू असलेल्या सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास सबका प्रयास या मोहिमेत गोव्यातील सर्व आमदारांनी सहभागी व्हावे आणि राज्यातही ती मोहीम पुढे न्यावी, असे आवाहन राज्यापालांनी केले.
कोरोना संकटकाळात सरकारची दर्जेदार कामगिरी
कोरोनाच्या संकटकाळात सरकारने दर्जेदार कामगिरी केली असून स्वयंपूर्ण गोवा, आत्मनिर्भर भारत या मोहिमेतून चांगली प्रगती केल्याचे पिल्लई यांनी सांगितले. कोविड जागृती व कोरोना लसीकरणात गोवा राज्य देशात नेहमीच अग्रेसर राहिले असून 18 वर्षावरील सर्व पुरुष महिला प्रौढ वर्गाचे 100 लसीकरण झाल्याचा दावा पिल्लई यांनी भाषणातून केला आहे. राज्यातील 15 ते 18 वर्षे वयोगटाचे लसीकरणही 80 टक्के झाल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना काळातही स्वयंपूर्ण गोव्याच्या माध्यमातून विकास साधण्यात सरकार यशस्वी ठरले असेही पिल्लई यांनी नमूद केले.
विधानसभा निवडणूक शांततेत
गोव्यातील विधानसभा निवडणूक शांततेत झाली, शिवाय सर्व पक्षीयांनी देखील सहकार्य केले म्हणून पिल्लई यांनी जनतेचे, इतर पक्षीयांचे आभार मानले. सरकार तुमच्या दारी या उपक्रमांतर्गत सरकार घरोघरी पोहोचले.
हीरक महोत्सवानिमित्त केंद्राकडून राज्याला आतापर्यंत 150 कोटी
गोवा मुक्तीच्या 60 वर्षानिमित्त केंद्र सरकारने जाहीर केलेल्या रु. 300 कोटी पैकी रु. 150 कोटी राज्याला मिळाले असून त्याचा विनियोग चांगल्या प्रकारे होत आहे. गोव्याने सर्व क्षेत्रात चौफेर प्रगती साधली असून गोवा हे इतर राज्यांसाठी आदर्श राज्य बनल्याचे निवेदन पिल्लई यांनी केले. आता गोव्यातील जनजीवन सुरळीत झाले असून कोरोनात बंद असलेले सर्व उद्योग पूर्ण क्षमतेने चालू असल्याची माहिती पिल्लई यांनी दिली.