सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 जुलै 2021 (15:29 IST)

अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याच्या मुद्यावरून भाजपचे 12 आमदार निलंबित

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे.
 
संजय कुटे, आशिष शेलार, जयकुमार रावल, गिरीश महाजन अभिमन्यू पवार, हरिष पिंपळे, साम सातपुते, जयकुमार रावल, पराग अळवणी, नारायणे कुचे, बंटी बागाडीया, योगेश सागर या बारा आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एका वर्षासाठी हे निलंबन असेल.
 
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून अध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्की केल्याचा आरोप सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी केला होता.
 
भास्कर जाधव हे तालिका अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना हा प्रकार घडल्याचं सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं आहे. याविषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं, "तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की करण्यात आली. अध्यक्षांच्या चेंबरमध्ये ही घटना घडली. आमचा आग्रह राहिल की ज्यांनी असं केलं त्यांच्यावर कारवाई करावी. आता धमकी, गुंडगिरीचं काम भाजप नेते करत आहेत."
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, "अध्यक्षांना कुठलीही धक्काबुक्की झालेली नाही. पण काही मंत्री जाणीवपूर्वक कामकाज काढून देण्यासाठी आणि इतर कारणं देत अशा स्टोऱ्या काढत आहेत." अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळात ओबीसी आरक्षणासंदर्भातला ठराव संमत करण्यात आला आहे. हा ठराव संमत करत असताना विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या अध्यक्षांना घेरलं आणि त्यानंतर गोंधळातच ठराव संमत करण्यात आला आहे.