शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 4 जुलै 2021 (11:25 IST)

ओबीसी आरक्षणासाठी आता जानकर मैदानात; उद्या राज्यात चक्काजाम

बीड: ओबीसी आरक्षणासाठी भाजपने एल्गार पुकारलेला असतानाच आता भाजपचा मित्र पक्ष असलेला रासपही ओबीसींसाठी मैदानात उतरणार आहे. रासप नेते महादेव जानकर यांनी उद्या रविवारी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जानकर यांच्या उद्या होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
 
महादेव जानकर यांनी रविवारी होणाऱ्या आंदोलनाची माहिती दिली. ओबीसी आरक्षणासाठी उद्या राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करतील. ओबीसींना लवकरात लवकर आरक्षण देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असून आंदोलनाद्वारे या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं जानकर यांनी सांगितलं. उद्या होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात स्वत: जानकरही सहभागी होणार आहेत. ते मुंबईतील मानखुर्द येथे शेकडो कार्यकर्त्यांसह चक्काजाम आंदोलन करणार आहेत.