आरोग्य विभागात ८ हजार ५०० पदांसाठी आता भरती निघणार
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर सर्वांत मोठा ताण आरोग्य यंत्रणेवर पडला. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाली होती. मात्र, आता आरोग्य विभागात १७ हजार पदांची भरती होणार असून ८ हजार ५०० पदांसाठी आता भरती निघणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज अर्थात 18 जानेवारीला नोकर भरतीची जाहिरात निघेल. 15 फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं काम पूर्ण होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
कोरोना संकट काळात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे नोकरीचे कंत्राट संपले असले तरी त्यांना आगामी काळात आणि इतर नोकर भरती वेळी सामावून घेण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी नोकर भरती प्रक्रियेत बदल करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोना काळात कंत्राटी पद्धतीने काम केलेल्या आरोग्य कर्मचारी यांना कोरोना संकट कमी झाल्याने नोकारीतून काढून टाकले होते. त्यामुळे या लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. मात्र या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याने त्यांना दिलासा मिळला आहे.
17 हजार पैकी 8 हजार 500 पदे ही ग्रामविकास विभागशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आहेत. त्यामुळे 2 टप्प्यात ही नोकर भरती होणार आहे. 56 संवर्गात ही नोकर भरती होणार असून या सर्व पदासाठी परीक्षा प्रक्रिया होणार आहे. साधारण 15 फेब्रुवारीपर्यंत परिक्षा आणि त्यांनतर 2 ते 3 दिवसात निकाल लागणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
झिंझर नावाच्या आयटी कंपनीला नोकर भरती प्रक्रिया राबविण्याचे काम देण्यात आले आहे. या भरतीत क आणि ड वर्गातील पदे भरली जातील. यात नर्सेस, वॉर्ड बॉय, क्लर्क आणि टेक्निशियनसह क आणि ड वर्गातील पदांचा समावेश आहे. या नोकर भरतीवेळी कोरोना काळात कंत्राटी काम केलेल्यांना प्राधान्य दिले जाणार नाही. मात्र कोरोना संकट काळात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने काम केले. त्यांना नियमित नोकरीवर घेणे शक्य नसल्याने आणि सुप्रीम कोर्टाच्या अनेक निर्णयाप्रमाणे तसे करणे नियमबाह्य ठरणार आहे. तरीही त्यांना वेगवेगळ्या भरती तसेच राष्ट्रीय आरोग्य मिशन (NHM) मधील पदांची भरती करताना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी निवड प्रक्रियेतील नियमात आवश्यक ते बदल केले जातील, असे टोपे यांनी सांगितले.