सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: रविवार, 15 जानेवारी 2023 (12:54 IST)

Makar Sankranti 2023 :संक्रांतीसाठी खास काळ्या साडीची फॅशन

काळा रंग म्हणजे निषेध, काळा रंग म्हणजे अशुभ, काळा रंग म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा, काळा रंग म्हणजे याँव आणि काळा रंग म्हणजे त्याँव, अशी वाक्यं एरवी नेहमीच ऐकावी लागतात. कपाटातून काळ्या रंगाचा ड्रेस किंवा साडी काढली रे काढली की, घरातील मोठ्यांच्या कपाळावर लगेच आठ्या उमटतात, पण संक्रांत हा असा एक दिवस आहे, ज्या दिवशी काळ्या रंगातील ड्रेस घाला नाहीतर साडी नेसा, कुणी काही म्हणत नाही. उलट काळा रंग कसा शोभून दिसतोय याचंच कौतुक होतं. त्यात जर ती लग्नानंतरची पहिली संक्रांत असेल तर काळ्या रंगातील साडीची आवर्जून खरेदी केली जाते. काळ्या रंगातील कोणतीही साडक्ष या दिवशी विशेषत्वाने नेसली जाते आणि त्यावर हलव्याच्या दागिन्यांचा साज चढवला जातो. अर्थात, काळ्या रंगाला फॅशन इण्डस्ट्रीमध्ये बरंच महत्त्व असल्याने खास काळ्या रंगातील कलेक्शन निर्माण केली जातात, पण सर्वसामान्यांमध्ये काळ्या रंगाबाबत अजूनही बरेच समज-गैरसमज आहेत. त्यामुळे इतर रंगांच्या तुलनेत काळ्या रंगाला अजूनही थोडं मागे सारलं जातं, पण संक्रांत जवळ आली की, बाजारातही काळ्या रंगातील साड्या, ड्रेस दिसू लागतात आणि खास त्यांची खरेदी केली जाते.

काळा रंग उष्णता शोषून घेतो असं म्हटलं जातं म्हणूनही या दिवसात काळ्या रंगाचे कपडे वापरण्याचा संकेत आहे. लहान मुला-मुलींचे या दिवसात बोरन्हाण म्हणजेच चुरमुरे, बोरं, हलवा, चॉकलेट्स, तिळाच्या रेवड्या, पोपकोर्न, बत्तासे हे साहित्य एकत्र करून बाळावर त्याचा वर्षाव केला जातो. यावेळीही लहान मुलांना खास काळ्या रंगाचे कपडे घालण्याची परंपरा आहे.
 
आत्ताच्या फॅशननुसार या दिवशी केवळ नववधूच नव्हे तर सगळ्याच जणी 'ब्लॅक कॉश्च्युम डे' साजरा करत असतात. दुकानांमधून सध्या काळ्या रंगाच्या साड्या, ड्रेस आणि लहान मुलांच्या कपड्यांना प्रचंड मागणी आहे. लहान मुलींसाठी काळ्या रंगातील परकर-पोलका पुन्हा नव्या ढंगात, नव्या डिझाइन्समध्ये दाखल झाला आहे. परांपरिक सणांना आधुनिकतेची जोड देत हे साजरे करण्याची सध्याची पद्धत असल्याने काळ्या रंगातील साड्यांमध्येही प्रचंड व्हरायटी आहे.
 
संक्रांत हे एक निमित्त आहे, काळा रंग परिधान करण्याचे, पण आजकाल ब्लॅक रंगही कसा ब्युटीफूल दिसू शकतो हे सगळ्यांना उमजल्याने ब्लॅकची फॅशन नेहमीच राहणार आहे. त्यात संक्रांत म्हणजे  एक हक्काचा दिवस.

Edited By - Priya Dixit