नवा सेफ्टी आयकॉन!
प्रत्येक पर्सध्ये बाकी काही असो नसो.. सेफ्टी पिन असतेच असते. उसवलेल्या शर्टापासून चापून नेसलेल्या पदरावर 'अंकुश' ठेवण्याचं काम ती करते. म्हणूनच ती तशी मल्टिटास्किंग. प्रत्येकाच्या वापरातली ही पिन सध्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये स्टाइल आयकॉन बनली आहे. सध्या बाजारात वेगवेगळ्या आकाराच्या, रंगेबिरंगी अशा डिझायनर सेफ्टी पिन मिळू लागल्या आहेत. आता तिचा वापर ज्वेलरीसाठीही केला जातो. तिच्या डिझायनिंगचा ट्रेंड सध्या इन आहे. स्प्रिंग समरसाठी स्पेशल असा हा सेफ्टी पिन ज्वेलरी ट्रेंड सध्या खूप गाजतोय.
छोट्या मोठ्या आकारातल्या सेफ्टी पिनांना एकत्र करून चेनमध्ये अडकवलेले सुंदर चोकर पीस सध्या मार्केटमध्ये मिळतायत. मोती, ग्लिटर्स, डायमंड, क्रिस्टलचा वापर केलेल्या सेफ्टी पिन्सना सध्या जास्त मागणी आहे. त्याशिवाय मोठ्या आकारातल्या डायमंड लावलेल्या सेफ्टी पिनना इअर कफ म्हणून घालता येतं. तसंचसेफ्टी पिनचे भन्नाट कानातलेही मिळू लागले आहेत. या पिनला आकार देऊन त्याची रिंगही सध्या मार्केटध्ये मिळते. ब्रेसलेट्समध्येही डिझाइन्स मिळतील. हार्टशेप, सर्कल, आयत अशा विविध आकारातल्या सेफ्टी पिन्स खूप प्रसिद्ध आहेत. चंदेरी, सोनेरी रंगात तसंच मॅटालिक रंगाच्या सेफ्टी पिन्सना जास्त मागणी आहे.
सेफ्टी पिन्सची फक्त ज्वेलरीच नाही, तर कपड्यावर नक्षीकाम करण्यासाठीही या सेफ्टी पिन्सचा वापर केला जातो. फॉर्मल ब्लेझरवर बो पिनऐवजी वेगवेगळ्या सेफ्टी पिन्स वापरून डिझाइन करता येते. अँजल विंग्स, फेदर पीस, शर्ट कॉलर डिझाइन्स, शर्टाला बटणाऐवजी डिझायनर सेफ्टी पिन्स लाऊन कूल लूक आणता येतो. कपड्याच्या शिलाईच्या जागी जीन्सना दोन-तीन सेफ्टी पिन्स लाऊन डिझाइन्स करता येतं.