गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By
Last Modified: शनिवार, 11 जून 2016 (12:08 IST)

20 म्हंजे 20 : शिक्षणव्यवस्थेवरील योग्य टिप्पणी

उदय भांडारकर दिग्दर्शित 20 म्हंजे 20 सिनेमा सशक्त कथे-पटकथेमुळे लक्षात राहतो. ग्रामीण भागातली ही कथा आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळालेले शिक्षक (राजन भिसे) आपल्या मूळ गावी आपल्या दिवंगत पत्नीच्या नावाने एक शाळा सुरू करतात. पण एक दिवस त्यांना अर्धागवायूचा झटका येतो. त्यामुळे अर्थातच शाळा बंद होते. आपलं स्वप्न अर्धवट राहण्याच्या दु:खाने आपल्या वडिलांना आजारपणात नैराश्य येऊ नये, म्हणून मग त्यांची मुलगी(मृण्मयी गोडबोले) गावात आपल्या घरी जाते. शाळा चालवण्यासाठी मुलं जमवते. पण शाळा सुरू ठेवायची असल्यास किमान 20 पटसंख्या असण्याचा नियम असल्याचं शिक्षण निरीक्षक तिला बजावतात. आणि तिची 20 मुलं शाळेसाठी जमवण्याची तारांबळ सुरू होते. 
 
खरं तर खूप साधा विषय. पण तो पटकथेतून फुलताना ग्रामीण भागातल्या अंधार्‍या खाचखळग्यांच्या रस्त्यांपासून, ते पाणी प्रश्नापर्यंत आणि आजही चालत असलेल्या बालविवाहाच्या रूढींपर्यंत अनेक प्रश्न समोर येत राहतात. एवढंच नाही तर, एखाद्या छोटय़ा स्पर्धेसाठी शिक्षक कशी दुसर्‍या शाळेतली मुलं चोरतात, ह्यासारखेही काही आजच्या ग्रामीण भागातल्या शिक्षणव्यवस्थेतले महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. जवळ जवळ 20-22 बालकलाकार ह्या सिनेमात आहेत. प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व सिनेमात उठून दिसलंय.