शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. मैत्री दिन
Written By वेबदुनिया|

ऍस्टेरिक्स आणि ओबेलिक्स

अमोल कपोले

ही कहाणी आहे, दोन मित्रांची. एक आहे बलदंड शरीराचा, अदभुत शक्ती अंगी असलेला, तर दुसरा किरकोळ शरीरयष्टीचा ठेंगणा पण बुद्धीने सामर्थ्यवान. ऍस्टेरिक्स आणि ओबेलिक्स ही त्यांची नावं. 1961 पासून या जोडगोळीने आपल्या धमाल विनोदी कॉमिक्सने अख्ख्या युरोपसह जगाला वेड लावलं. मूळची फ्रेंच भूमीतली, आणि जगातल्या बहुतांश भाषांत भाषांतरित झालेली ही जोडगोळी म्हणजे मैत्रीची निराळी दास्तान आहे.

सन 1960च्या सुमारास रेनी गोस्किनो आणि अल्बर्टो उदेर्झो हे दोघे फ्रेंच मित्र एकत्र आले आणि त्यांनी ही अजरामर जोडगोळी जगाला बहाल केली. गोस्किनोने यातील बहुतांश कथांचं लेखन केलं, तर आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी उदेर्झोने या कहाण्या जिवंत केल्या. त्यापुर्वीही त्यांनी एकत्र निर्मिलेली एक कार्टून मालिका लोकप्रिय ठरली होती.

असं काय आहे या जोडगोळीत?
ऍस्टेरिक्स आणि ओबेलिक्स हे रहिवासी आहेत, प्राचीन गॉलचे. एका खेडेगावात हे दोघे राहतात. हे गाव काही असे-तसे नाही. या गावातील लोकांना मिळालंय एक जादुई द्रव्य. जे प्यायल्याने माणसाच्या अंगी हजार हत्तींचं बळ येतं. या द्रवाचा शोधही त्या गावात राहणाऱ्या गेटाफिक्स या वैदूने लावलाय. ऍस्टेरिक्स आणि ओबेलिक्स ही जोडगोळी या जादुई शक्तीच्या बळावर जगभरात आणि विशेषत: रोमन साम्राज्यात जो धूमाकूळ घालतात, त्याच्या या कहाण्या.

ओबेलिक्सच्या बलदंड शरीराचं आणि अंगभूत सामर्थ्याचं रहस्य म्हणजे, अगदी लहान असताना तो खेळता खेळता गेटाफिक्सच्या जादुई द्रव्याच्या पिंपातच पडला, त्याचा परिणाम त्याला प्रचंड बळ प्राप्त झालं, इतकं की आता आयुष्यभर त्याने त्या द्रव्याचा एकही थेंब घेतला नाही तरी चालेल. मात्र ओबेलिक्स महाशयांना हे द्रव प्रचंड आवडतं, त्यामुळे गेटाफिक्सची नजर चुकवून ते पिण्याचे त्याचे प्रयत्न आणि गेटाफिक्सने त्याला दाद न लागू देणं, या झटापटीतून निर्माण होणारे विनोद आबालवृद्धांची करमणूक करत आलेत.

ऍस्टेरिक्स आणि ओबेलिक्स या जोडगोळीनं केवळ मुलांनाच नाही, तर प्रौढांनाही आकर्षित केलंय, आणि या आकर्षणामागचं कारण आहे त्यातील कहाण्यांत लपलेला उपहास.

ऍस्टेरिक्स आणि ओबेलिक्सची कथानकं जरी प्राचीन काळात घडत असली, तरी त्यात वर्तमानातील घडामोडींशी साधर्म्य दाखवून तिरकस शैलीत चिमटे काढण्याची कामगिरी गोस्किनो -उदेर्झोने चोख पार पाडली. या राजकीय, सामाजिक उपहासामुळे ही कॉमिक सीरिज निव्वळ कॉमिक सीरिज न राहता एक राजकीय कॉमेंट्री बनली .

अनेक समकालिन राजकीय, सामाजिक, सेलिब्रिटींच्याही वृती- प्रवृत्तीचे विडंबन या कॉमिक सीरिजने केलं. त्यात एलिझाबेथ टेलर, बीटल्स, शॉन कॉनरी, जेम्स बॉंड, कर्क डग्लस, लॉरेन्स ऑलिव्हिए, अलेक गिनेस यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

ऍस्टेरिक्स-ओबेलिक्स जोडगोळीची एकूण जवळपास 33 साहसकथा खंड प्रकाशित झाले आहेत, आणि जगभरातल्या पुस्तकांच्या क्रमवारीत बेस्टसेलर ठरले आहेत. 1977 मध्ये गोस्किनोच्या मृत्यूनंतरही उदेर्झोने ही दास्तान चितारणे सुरू ठेवले . मात्र, गोस्किनोच्या लेखणीतला उपहास त्याला आपल्या शब्दांत उतरविणे जमले नाही, त्यामुळे ही नंतरची कथानकं जाणकारांच्या आणि वाचकांच्याही पसंतीस उतरली नाहीत.

ऍस्टेरिक्स आणि ओबेलिक्सच्या कथानकांवर चित्रपटही निघाले आहेत, ते झी स्टुडिओसारख्या इंग्रजी वाहिन्यांवर अधूनमधून पहायला मिळतात. मैत्रीदिनानिमित्त या आगळ्या-वेगळ्या जोडीचा हा अल्प परिचय. पूर्ण परिचय करून घ्यायचा असेल , तर आजच ऍस्टेरिक्स कॉमिक्स वाचा. तुम्ही या जोडगोळीचे फॅन व्हाल हे नक्की!