शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (08:09 IST)

पत्रिकेत मंगळ दोष म्हणजे नेमकं काय ?

जन्मपत्रिकेमध्ये लग्न म्हणजे प्रथम किंवा चतुर्थ किंवा सप्तम किंवा अष्टम स्थान यापैकी कोणत्याही स्थानात जर मंगळ असेल तर त्याला सामान्यत: मंगळदोष मानले जाते. मंगळदोष असणाऱ्या व्यक्तिला मांगलिक व्यक्ती असे म्हटले जाते. मंगळदोष असणाऱ्या व्यक्तीला गृहस्थाश्रमात अनेक कष्टांचा सामना करावा लागतो. मंगळी किंवा मांगलिक व्यक्तीबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. जसे की त्यांचा विवाह जर दुसऱ्या मागंलिक व्यक्तीशी झाला नाही तर त्याचे परिणाम वाईट होतो. पण खरी परिस्थिती अशी नाही. मंगळ हा अतिशय ऊर्जा देणारा,जीवनात शक्ती, साम्राज्य, शासन, आनंद, काम, पुत्र प्रदान करतो.
 
प्रथम स्थानातील मंगळ
लग्न म्हणजे प्रथम स्थानामध्ये मंगळ असल्याने व्यक्ती हट्टी किंवा उग्र स्वभावाची असते. या स्थानात उपस्थित मंगळाची चतुर्थ दृष्टी सुख स्थानावर असल्याने या व्यक्तींना गृहस्थसुखांना मुकावे लागते. सातव्या स्थानातील दृष्टी जोडीदाराशी संबंध बिघडण्यासाठी कारणीभूत ठरते. तर आठव्या स्थानावरील दृष्टी जोडीदारासाठी अडचणी निर्माण करते.
 
द्वितीय स्थानात मंगळ
द्वितीय स्थान धन व कुटंबाचे स्थान असते. हा मंगळ नातेवाईक व आप्तस्वकीयात वादविवाद निर्माण करतो, ज्याचा नकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या दांपत्यजीवनावर पडतो. या स्थानातील मंगळ पाचव्या, आठव्या व नवव्या स्थानावर प्रभाव टाकतो. त्याचा संततीवर वाईट परिणाम होऊ शकतो. यांना नशिबाचीही साथ मिळत नाही.
 
चतुर्थ स्थानातील मंगळ
चतुर्थस्थानातील मंगळ सातव्या, दहाव्या व अकराव्या स्थानावर परिणाम करतो. हा मंगळ स्थायी संपत्ती तर देतो पण जोडीदाराच्या अभावामुळे येणारे गृहस्थाश्रमातील क्लेशही देतो. मंगळाची दृष्टी सातव्या स्थानात असल्याने जीवनात प्रेमाची कमतरता जाणवते व वैचारिक मतभेद होऊ शकतात. या मंगळामुळे घटस्फोट किंवा जोडीदाराला शारीरिक त्रास होत नसला तरी वैवाहिक सुख मात्र निश्चित कमी होते.
 
सातव्या स्थानातील मंगळ
जोडीदाराच्या म्हणजेच सप्तम स्थानातील मंगळ विवाहासाठी सगळ्यात जास्त हानीकारक असतो. हा मंगळ जोडीदारच्या स्वभावात उग्रता व जोडीदाराच्या आरोग्याला मारक असतो. या मंगळाची प्रथमस्थान, धनस्थान व कर्मभावावर दृष्टी पडते त्यामुळे करिअरमध्ये समस्या, आर्थिक चणचण तसेच एखाद्या दुर्घटनेची शक्यता वाढते. या स्थानात मंगळ असणाऱ्या व्यक्ती विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करतात. याच्या अत्युच्च प्रभावामुळे पतीपत्नीमध्ये दुरावा येण्याचे प्रमाण वाढते.
 
आठव्या स्थानातील
आठव्या स्थानाचा संबंध कष्ट, भाव, संकट, दु:ख व आयुर्मानाशी येतो. हा मंगळ मानसिक कष्ट देतो, वैवाहिक आनंद नष्ट करतो. शारीरिक व लैंगिक तक्रारी संभवतात. या स्थानातील मंगळ जर वृषभ, कन्या किंवा मकर राशीला असेल तर अशुभ फलाची तीव्रता कमी होते. परंतु मकर राशीतील मंगळ संततीसंबंधी समस्या निर्माण करू शकतो. याशिवाय द्वितीय व बाराव्या स्थानातील मंगळ दांपत्य जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम करतो.
 
बाराव्या स्थानात मंगळ
जन्मपत्रिकेत बाराव्या स्थानाला व्ययस्थानही म्हटले जाते. हे स्थान निद्रेचेही आहे. या भावात मंगळ आल्याने दांपत्य सुखामध्ये बाधा येते. लैंगिक इच्छा प्रबळ होते. शुभ ग्रहांच्या अभावामुळे चारित्र्यावर डाग येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. असे लोक भावुक होऊन आपल्या जोडीदाराला त्रास देऊ शकतात. धनाची कमी वैवाहिक संबंधांवर परिणाम करते. या लोकांना गुप्तरोग व रक्तासंबंधी विकार होण्याची शक्यता असते.