सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 16 एप्रिल 2020 (16:25 IST)

कोरोना व्हायरस: हॉटस्पॉट बनलेला वरळी कोळीवाडा नेमका कसा आहे?

जान्हवी मुळे,
 
कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्ती आढळल्यापासून मुंबईचा वरळी कोळीवाडा चर्चेत आहे. 'क्लस्टर कंटेनमेंट' योजनेअंतर्गत संसर्ग रोखण्यासाठी या परिसराच्या सीमा बंद करण्यात आल्या.
पोलिसांनी गेले दोन आठवडे तिथला संपूर्ण परिसरच सील केला आणि हा भाग कोव्हिड-19 या आजाराच्या साथीचा 'हॉटस्पॉट' म्हणून चर्चेत आला. तेव्हापासून एरवी गजबजलेला हा परिसर भीतीयुक्त शांतता आणि अनिश्चिततेच्या सावटाखाली आहे.
दाट लोकवस्ती आणि एकमेकांना जवळपास खेटून असलेली घरं पाहून अनेकजण वरळी कोळीवाड्याला झोपडपट्टी म्हणण्याची गल्लत करतात. पण हे मुंबईच्या मूळ गावठाणांपैकी एक असून, या कोळीवाड्याची स्वतःची वेगळी ओळख आहे.
मुंबई शहर अस्तित्वात येण्याआधीपासून हा कोळीवाडा उभा आहे. गेली अनेक शतकं समुद्राच्या लाटा अंगावर झेलतो आहे. त्यानं मुंबईचं बदलतं रूप पाहिलं आहे आणि आता हे गाव कोव्हिडच्या संकटाला तोंड देत आहे. वरळी कोळीवाड्यासाठी ही सगळीच परिस्थिती नवीन आहे.

मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार

तुम्ही मुंबईच्या सी-लिंकवरून वांद्रे ते वरळी असा प्रवास केला असेल, तर डाव्या बाजूला किनाऱ्याजवळ एक भूशीर समुद्रात घुसलेलं दिसतं. त्याच त्रिकोणी भूभागावर वरळी कोळीवाडा वसला आहे. तीन बाजूंनी पाणी आणि मागे उंच इमारतींच्या सान्निध्यात हा कोळीवाडा आणि त्यातही तिथला अगदी टोकावरचा वरळी किल्ला पटकन नजरेत भरतो.

जुन्या वरळी बेटाच्या एका टोकाचा हा सगळा भाग ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्ट्‍याही महत्त्वाचा आहे. पत्रकार आणि मुंबईच्या पुरातत्त्व इतिहासाचे अभ्यासक विनायक परब सांगतात, " वरळीत शेल प्रकारचा दगड आहे, जो मुंबईत फक्त याच परिसरात सापडतो. शेल तयार होण्यासाठी त्या भागात पाण्याचं अस्तित्व असावं लागतं आणि त्यात दगडात जीवाष्म सापडतात. मुंबईतले पहिले जीवाष्मही इथेच सापडले आहेत. त्यात कासव, मासा आणि बेडूक यांचा समावेश आहे."
वरळीतला कोळीवाडाही किमान नऊशे ते हजार वर्ष जुना असावा असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. "वरळीला कोळीवाडा खूप आधीपासून होता हे तिथल्या लोकदेवतांवरून हे लक्षात येतं. तिथं सापडलेले पुरावे हे दहाव्या-अकराव्या शतकातले आहेत. आता जिथे किल्ला आहे तिथे पूर्वी गढी असावी असा अंदाज आहे.'
तेव्हा मुंबई सात बेटांत विभागलेली होती आणि वरळी त्यातलं एक महत्त्वाचं बेट होतं. या सात बेटांच्या उत्तरेला 'साष्टी' बेटावर आजच्या मुंबईतली उपनगरं आणि ठाणे-मिरा भाईंदर ही शहरं वसली आहेत. आता ही सगळी बेटंच नाही, तर ही शहरंही एकजीव झाल्यासारखी दिसतात.

पण एका जमान्यात साष्टी बेटावरच्या वांद्रे इथला किल्ला आणि वरळीच्या कोळीवाड्यातला किल्ला असे दोन पहारेकरी माहीमच्या खाडीवर नजर ठेवून असायचे. आजही वरळी किल्ल्यातून एका बाजूला हाजीअली, दुसऱ्या बाजूला माहीमचा किनारा आणि समोर वांद्रे इथला किल्ला दृष्टीक्षेपात येतो.
या भागात येणाऱ्या नौका माहीमच्या खाडीत किनाऱ्याला लागायच्या. पोर्तुगीज आणि इंग्रज येण्याच्या आधीही या किल्ल्याच्या जागी एक गढी असावी असा पुरातत्व अभ्यासकांचा अंदाज आहे.
सोळाव्या शतकात हा भाग पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली आला. मग 1661 साली इंग्लंडचे राजे चार्ल्स द्वितीय आणि पोर्तुगीज राजकन्या कॅथरीन ऑफ ब्रॅगॅन्झा यांच्या लग्नात इंग्रजांना मुंबई आंदण म्हणून मिळाली. या बेटांचं रूप त्यानंतर झपाट्यानं बदलत गेलं आणि मुंबई शहर अस्तित्वात आलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावरही मुंबई कात टाकत राहीली. वरळीचा परिसरही बदलत गेला.
गिरणी कामगारांच्या चाळींपासून ते सी-फेसवरचे श्रीमंत बंगले आणि आता उभ्या राहात असलेल्या गगनचुंबी इमारतींपर्यंत वरळीनं अनेक स्थित्यंतरं पाहिली आहेत. पण वरळी कोळीवाड्यासारख्या ठिकाणांनी जुन्या मुंबईच्या खुणा अजूनही जपल्या आहेत. त्यात फक्त ऐतिहासिक इमारतीच नाही, तर प्रथा परंपरांचाही समावेश आहे.

कोळीवाड्याची सांस्कृतिक ओळख

वरळी कोळीवाड्याचे रहिवासी आणि नॅशनल फिशरीज असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय वरळीकर आपल्या गावाविषयी भरभरून बोलतात. सहा-सात दशकांत गावाचं रूप कसं बदललं, त्याविषयी सांगतात.
 

"आम्ही लहानपणी आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे, की बस वरळी सीफेसच्या कोपऱ्यापर्यंत यायची. आता जिथे बीपीटीची कॉलनी झाली आहे, तिथून बोटीतून वरळी कोळीवाड्यात यावं लागे."
इथले कोळी, आगरी, ख्रिश्चन कोळी आणि भंडारी असे मुंबईचे मूळ निवासी एकमेकांसोबत मिळून मिसळून कसे राहत आले आहेत. नारळी पौर्णिमा आणि होळी हे कोळीवाड्यातले दोन सर्वात महत्त्वाचे सण आहेत.

"समुद्रावर जगणारी आम्ही माणसं आलेला दिवस साजरा करतो. आमचे उत्सव आणि आमच्या परंपरांनुसारच साजरा करतो. नारळी पौर्णिमेला सगळेजण एकत्र येतात, वाजत-गाजत नाचत मिरवणूक निघते, नारळाचं पूजन होतं. सजवलेल्या होडीतून आम्ही समुद्रात जातो आणि तो नारळ समुद्रात टाकतो. आमच्याकडची होळीही विधिपूर्वक लावली जाते."
इथं गोल्फादेवीचं मंदिर आहे, ख्रिस्ताचा क्रॉस आहे आणि एक दर्गाही आहे. दरवर्षी या दर्ग्याच्या उरूसामध्ये कोळी समाजाचे लोकही सहभागी होतात. त्यावेळी दर्ग्याला लावायची संदल (चंदनाचा लेप) गावच्या पाटील लोकांचा स्पर्श झाल्याशिवाय निघत नाही, अशी माहिती विजय वरळीकर देतात.
कोळीवाड्यात आजही जुनी कौलारू घरं, वाडे उभे आहेत. काही जणांनी नवी दोन-एक मजल्यांची घरं बांधली आहेत. काही बैठ्या चाळीही आहेत. तिथे पिढ्यांपासून राहणारे भाडेकरू आजही भाडे नियंत्रण कायद्यानुसार अत्यल्प भाडं देऊन राहू शकतात.
पूर्वी इथं मर्यादित लोकवस्ती होती. पण हळूहळू चित्रं बदलत गेलं. मुंबईत वस्ती वाढत गेली तशी कोळीवाड्यातल्या मोकळ्या जागांवर अतिक्रमणं होत गेली.

विजय वरळीकर सांगतात, "सरकार कुणाचंही असो, कुठल्याही पक्षाचे राजकारणी असो, मुंबई बिल्‍डरांच्या घशात घातली आहे. मोक्याच्या जागी मोठ्या इमारती उभ्या राहिल्या, पण तिथल्या झोपडपट्ट्या उठल्यावर तिथे राहणारे अनेकजण वरळीकडे येऊन वसले. कारण कामाच्या दृष्टीनं हा भाग त्यांना सोयीचा होता."
कोरोना व्हायरसचं आव्हान
कोळीवाडा परिसराची लोकसंख्या सध्या तीस ते चाळीस हजारांच्या आसपास आहे. पण गावातील बाकीच्या वस्तीचा विचार केला, तर हा आकडा मोठाही असू शकतो, असं या भागात काम करणारे कार्यकर्ते सांगतात.
त्यामुळंच इथं कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त खबरदारी घेणं, हे मुंबई महापालिकेसमोरच मोठं आव्हान आहे
कोळीवाडा लॉकडाऊन झाला असला, तरी इथले अनेक रहिवासी अत्यावश्यक सेवांमध्ये आपलं कर्तव्य बजावत आहेत.
तसा संघर्ष कोळीवाड्याला नवा नाही. आता कोरोना विषाणूच्या संकटातही कोळीवाड्यातले लोक एकत्रितपणे मार्ग काढतील असा विश्वास विजय वरळीकरांना वाटतो.