रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (17:09 IST)

गरोदरपूर्व अवस्थेत परत येण्यासाठी महिलांवर किती ताण असतो? अशावेळेस काय करावं?

Dohale Jevan Songs Marathi
‘प्रसुती झालीय आता लवकर पूर्वीसारखी हो’, असं अनेक महिलांना ऐकून घ्यावं लागतं. गरोदरपणात आणि बाळंतपणाच्या काळात महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. हे बदल शारीरिक असतात तसे मानसिकही असतात.
 
2012 साली पहिली मुलगी जन्माला आल्यावर श्रेया सिंह (नाव बदललं आहे) यांनाही असेच सल्ले ऐकावे लागले होते. 'जास्त खाऊ नको', 'वजन वाढेल' वगैरे...
 
बाळंतपणानंतर त्यांचं वजन गरोदरपणाच्या आधीपेक्षा 25 किलोंनी वाढलं होतं. श्रेया आता दोन मुलांच्या आई आहेत.
 
त्यांची पहिली मुलगी 2012 साली तर दुसरी मुलगी 2021 साली जन्माला आली. ही दोन्ही बाळंतपणं सामान्य म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होती.
 
‘जास्त खाऊ नकोस, वजन वाढेल’
बीबीसी प्रतिनिधी पायल भुयान यांच्याशी बोलताना श्रेया यांनी पहिल्या मुलीच्या जन्मानंतर आपल्याला अनेक शारीरिक आणि इतर समस्यांना तोंड द्यावं लागलं असं म्हणाल्या.
 
त्या म्हणाल्या, “जर तुम्ही असं सहज पाहिलंत तर वरवर मी एकदम ठीक वाटते. पण असं नव्हतं. बाळंतपणाच्यावेळेस मला 'थर्ड डिग्री व्हजायनल टियर' झालं होतं. ते नीट होण्यास भरपूर काळ गेला. त्याचवेळेस मला फिशरचाही त्रास सुरू झाला. त्याचा फार त्रास होता. बाथरुममध्ये जायचं म्हटलं तरी थरकाप उडायचा अशा स्थितीपर्यंत मी गेले होते.”
 
(बाळाच्या जन्मावेळेस योनीजवळचा स्नायू फाटल्यास त्याला व्हजायनल टियर म्हणतात आणि थर्ड डिग्रीमध्ये हे स्नायू गुदद्वारापर्यंत तुटतात. फिशर म्हणजे गुदद्वारला चीर पडणे)
 
श्रेया यांना सर्व त्रासाबरोबरच पाठीच्या खाली दुखायचं. त्या सांगतात, “ या बरोबर आपण झगडत असताना लोक त्यांना कमी खा, वजन कमी कर असे सल्ले द्यायचे तेव्हा काय बोलावं हेच कळत नसे.”
 
“पण पहिल्या मुलीच्या जन्मावेळी जितका त्रास झाला तितका दुसऱ्या प्रसुतीच्यावेळेस झाला नाही असं त्या सांगतात. दुसऱ्यावेळेस आपली मानसिक तयारी झालेली होती”, असं त्या सांगतात.
 
शारीरिक आणि मानसिक त्रासाला तोंड द्यावं लागतं
परंतु एखाद्या महिलेला हे सगळे त्रास झाले नाहीत तरीही गरोदरपण आणि नंतरही तिच्यामध्ये अनेक बदल होतातच. 'आता मेदाचं म्हणजे फॅटचं संचयन करा', असं सांगणारे संप्रेरकांचे बदलही होत असतात.
 
गरोदर-बाळंत होणाऱ्या महिलेच्या 'पेल्व्हिक फ्लोअर'मध्ये ताण येतो, स्तनपान करताना शरीरातील पोषक घटक दुधाद्वारे बाळाला जातात.
 
या सर्वांमुळे प्रसुतीनंतर महिलेला पूर्णपणे नीट होण्यास वेळ लागतो. (पेल्व्हिक फ्लोअर म्हणजे ओटीपोटाला असलेला स्नायूंचा आधार, तो हाडांशी जोडलेला असतो.)
 
बीबीसी प्रतिनिधी पायल भुयान यांच्याशी नोएडा येथील मदरहूड रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ कर्निका तिवारी यांनी चर्चा केली. त्या सांगतात. “गरोदरपण आणि प्रसुतीनंतर अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं.”
 
त्या सांगतात, “गरोदरणात वाढत्या भ्रूणाला जागा तयार करण्यासाठी मूत्राशयावर ताण येतो. गर्भाशयाच्या पुढे मूत्राशय असतं आणि त्याच्या मागे आपली आतडी असतात. अनेकवेळा मूत्राशयावर ताण आल्यामुळे लघवीवर ताबा राहात नाही, अनेकवेळा मूळव्याधही होण्याची शक्यता असते.”
 
“आतड्यावर ताण आला तर अॅसिडिटी होते किंवा मलावरोध होतो.”
 
डॉ. कर्निका तिवारी सांगतात, “मुलाच्या जन्मानंतर गर्भाशयाला मूळ अवस्थेत यायला 6 ते 8 आठवड्यांचा काळ जातो. यावेळेस अनेकदा पोटातही दुखतं. अनेक वेळा महिलांमध्ये ताकद राहात नाही, लवकर थकवा येतो. गरोदरपणाच्या काळात शरीरातील हाडांची जागा बदलते. प्रसुतीनंतर हळूहळू हाडं आपल्या जागेवर येतात. यामुळे पाठ दुखते. काही महिलांना हा त्रास आयुष्यभर राहू शकतो.”
 
‘अरे वा, तू तर पहिल्यासारखी दिसायला लागलीस’
बीबीसी फ्युचरशी बोलताना युनायटेड किंग्डममध्ये यॉर्कशायरमध्ये राहाणाऱ्या शॅरन ओकल सांगतात,
 
“2018 साली माझी पहिली प्रसुती झाली, परंतु काही महिन्यांतच लोक मला अरे वा, तू तर पहिल्यासारखी दिसायला लागली आहेस असं म्हणू लागले. “
 
“बाहेरुन मी जरी पूर्वीसारखी दिसत असले तरी परिस्थिती वेगळीच होती. प्रसुतीनंतर माझं वजन कमी झालं होतं, पण शारीरिकबाबतीत मी अनेक समस्यांना तोंड देत होते.”
 
प्रसुतीनंतर सहा महिन्यांनी शॅरन आपल्या मुलाला बाबागाडीतून घेऊन चालायला जायची मात्र त्यावेळेस तिला युरिन लिक म्हणजे लघवीवरचा ताबा जाण्याचा त्रास वाढला.
 
ती सांगते, आपला समाज विचित्र आहे. प्रसुतीनंतर महिलेला बरं वाटतंय का याच्यापेक्षा ती कशी दिसते याचा विचार लोक करतात. प्रसुतीनंतर माझ्यामध्ये जे बदल झाले, जे त्रास सुरू झाले आजही मी त्यांच्याशी झगडत आहे.
 
काही महिने चाचण्या आणि डॉक्टरांच्या माहितीनुसार शॅरन यांच्या 'पेल्व्हिक फ्लोअर'च्या स्नायूंच्या पेशी कमकुवत झाल्याचं आणि त्या आपल्या नेहमीच्या जागी नसल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे त्यांना लघवीवर ताबा ठेवता येत नव्हता.
 
आता पाच वर्षांनी त्यांच्या स्थितीत सुधारणा झाली आहे. तरीही त्यांना अधूनमधून युरिन लिकचा त्रास होतो. त्यामुळे त्या आपल्याबरोबर नेहमी जादा अंतर्वस्त्रं ठेवतात. यामुळे नोकरी सोडण्याचा विचारही त्यांच्या मनात अनेकदा आला.
 
मोकळेपणाने बोललं जात नाही
हा त्रास मोठ्या प्रमाणात होत असला तरी याबद्दल मोकळेपणाने बोललं जात नाही. आपल्या आजूबाजूला श्रेया, शॅरनसारखी उदाहरणं अनेक सापडतील.
 
प्रसुतीनंतर होणाऱ्या त्रासाची काही लक्षणं दिसतीलच असं नाही. मात्र प्रसुतीनंतर 'पेल्व्हिक ऑर्गन प्रोलॅप्स'चा त्रास 90 टक्के महिलांना होतो. (पेल्व्हिक ऑर्गन प्रोलॅप्समध्ये गर्भाशय आपल्या मूळ जागेपासून खाली सरकते)
 
एक तृतियांश महिलांना लघवीवर ताबा ठेवण्यात त्रास होतो. यामागे पेल्व्हिक भागात ताण, स्नायूपेशींवर जखम, वाहिन्यांवर जखमा अशी कारणं असू शकतात.
 
तसेच 60 टक्के महिलांमध्ये 'डायास्टेसिस रेक्टाय' म्हणजे 'अब्डॉमिनल सेपरेशन' दिसून येतं. यात गरोदरपणात वाढत्या भ्रूणाला जागा करून देण्यासाठी अब्डॉमिनल स्नायूमध्ये ताण येतो आणि ते दूरदूर जातात आणि नंतर ते पुन्हा आपल्या जागेवर येऊ शकत नाहीत.
 
यामुळे बराच काळ महिलांचं पोट बाहेरच्या दिशेने वाढलेलं राहातं. चालताना, फिरताना, जड सामान उचलताना त्रास होतो.
 
गरोदरपूर्व काळातलं शरीर पुन्हा मिळवण्याचा ताण
बीबीसी प्रतिनिधी पायल भुयान यांनी दिल्लीतल्या फोर्टिस हार्ट इन्स्टिट्यूटमधील सिनिअर क्लिनिकल अँड चाइल्ड सायकॉलॉजिस्ट डॉ. भावना बार्मी यांनी चर्चा केली.
 
त्या म्हणाल्या, “असा बदल तात्काळ करण्याची अपेक्षा करणं त्या महिलांच्या मानसिक आरोग्यावर ताण आणणारं असतं.”
 
यामुळे महिलांवर विपरित भावनिक प्रभाव पडू शकतो. आपल्यात काहीतरी कमतरता आहे असं तिला वाटू लागतं. निराशा तसंच आत्मविश्वास कमी असणं, औदासिन्य आणि पोस्टपार्टम डिप्रेशनपर्यंत हा त्रास जाऊ शकतो.
 
गरोदरपूर्व शरीर मिळवण्यासाठी महिला अनेकदा भरपूर डाएटिंग करतात. भरपूर व्यायाम करू लागतात. याचा परिणाम त्यांच्या स्वतःच्या शरीराची झीज भरून काढण्यावर होतो. त्याचा परिणामी आई आणि मूल दोघांवरही होऊ शकतो.
 
याच्या अतिताणामुळे महिला समाजापासून लांब राहू लागण्याची शक्यता असते. त्यांना आपलंच शरीर पाहून लाज वाटायला लागते, त्या एकट्या पडू लागतात.
 
डॉ. बार्मी सांगतात, गरोदरपूर्व शरीर मिळवण्याच्या ताणामुळे नवमातांमध्ये तणाव वाढतो. प्रत्येक महिला दुसरीपेक्षा वेगळी असते हे समजून घेतलं पाहिजे. तसंच बरं होण्यात, पुन्हा रुळावर येण्याचा वेग प्रत्येकीचा वेगळा असतो.
 
काय करावं?
आता गरोदरपूर्व शरीर मिळवण्याच्या ताणातून बाहेर येण्यासाठी काय करावं याचा विचार करू.
 
डॉ. कर्निका तिवारी सांगतात, “तुम्हाला कसलीही शंका असेल तर डॉक्टरांशी बोला. आहार नीट ठेवा, जीवनशैलीत हालचाल असू द्या.
 
महिलांनी आपली मर्यादा ओळखली पाहिजे. आपली ताकद ओळखली पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजेत, स्वतःचं ज्ञान वाढवलं पाहिजे, एकटं वाटू नये म्हणून सपोर्ट नेटवर्क वाढवावं, शरीरातील बदलांना स्वीकारावं.”